एसटी महामंडळाच्या भांडार खरेदीत घोटाळा

    08-Jul-2025   
Total Views |

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) पुणे जिल्ह्यातील दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत भांडार खरेदीत मोठा आर्थिक अपहार उघडकीस आला आहे. विशेष लेखापरीक्षण पथकाने केलेल्या तपासणीत २२ कर्मचारी आणि अधिकारी दोषी आढळले आहेत. यापैकी १५ कर्मचारी आणि अधिकारी सध्या कार्यरत असून, उर्वरित ७ निवृत्त झाले आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांवर चौकशी करणे शक्य न झाल्याने कार्यरत १५ जणांची सखोल तपासणी करण्यात आली. या तपासणीत ते दोषी आढळले असून, त्यांच्याकडून मासिक वेतनाच्या १० टक्के रक्कम वसूल करण्यात आली आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंगळवार, दि. ८ जुलै रोजी विधानसभेत प्रश्नोत्तर तासात ही माहिती दिली. आ. संदीप क्षीरसागर यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना सरनाईक म्हणाले, “सभागृहातील सदस्यांच्या मागणीनुसार, राज्य परिवहन महामंडळामार्फत या प्रकरणाची पुन्हा सखोल चौकशी केली जाईल. दोषी आढळलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर निलंबनाची कठोर कारवाई करण्यात येईल.”

दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेत भांडार खरेदीमध्ये आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय होता. याची दखल घेत विशेष लेखापरीक्षण पथकाने तपासणी केली. या तपासणीत खरेदी प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन, बनावट कागदपत्रे आणि आर्थिक अनियमितता आढळली. दोषी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी संगनमताने हा अपहार केल्याचे प्राथमिक अहवालात नमूद आहे. सध्या दोषी आढळलेल्या १५ कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून वेतनाच्या १० टक्के रक्कम वसूल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र, सभागृहातील सदस्यांनी या कारवाईला अपुरे ठरवत अधिक कठोर पावले उचलण्याची मागणी केली. त्यानुसार, परिवहन मंत्र्यांनी पुन्हा चौकशीचे आदेश दिले.



सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.