मुंबई : मोठ्या त्यागातून देशाला स्वातंत्र्य मिळाले असून, ते टिकवायचे असेल तर जात-पात बाजूला सारून कार्य करणे आवश्यक आहे. नागरिकांना राजकीय, सामाजिक आणि आर्थिक न्याय देण्यासाठी राज्यघटना आहे आणि या राज्यघटनेमध्ये योग्य बदल करण्याची मुभा घटना समितीने दिली आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी मंगळवारी मुंबईत केले. महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
दि. ८ जुलै रोजी महाराष्ट्र विधानमंडळाच्या वतीने सरन्यायाधीश भूषण रामकृष्ण गवई यांचा विशेष सत्कार करण्यात आला. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांसह विधिमंडळातील दोन्ही सभागृहांचे गटनेते उपस्थित होते.
या वेळी 'भारताची राज्यघटना' या विषयावर मार्गदर्शन करताना सरन्यायाधीश भूषण गवई म्हणाले की, "महाराष्ट्र ही थोरांची जन्मभूमी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत जनाबाई आदी संतांनी आध्यात्मिक लोकशाहीचा पाया रचला आहे." डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा संदर्भ देत ते म्हणाले, "डॉ. बाबासाहेब राष्ट्रीयत्व असलेले व्यक्ती होते. 'मी प्रथम भारतीय आणि शेवटीही भारतीय आहे. जेव्हा देशाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न येतो तेव्हा व्यक्तीच्या प्रतिमा संपल्या पाहिजेत. देशाची प्रतिष्ठा हीच महत्त्वाची आहे,' असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत." राज्यकर्ते प्रामाणिक राहिले नाहीत, तर राज्यघटनेचा उद्देश साध्य होणार नाही, असेही गवई यांनी नमूद केले.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामशास्त्री प्रभुणे हे महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेचा आदर्श असल्याचे म्हटले. ते म्हणाले, "सरन्यायाधीश भूषण गवई यांचा सत्कार म्हणजे कुटुंबातील व्यक्ती देशाच्या सर्वोच्च स्थानावर असल्याचा हा आनंदसोहळा आहे." उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही गवई यांची कारकीर्द संस्मरणीय ठरेल, असे म्हटले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले, "शासन आणि न्यायपालिका यांचा सुसंवाद असायला हवा. प्राथमिक शिक्षण मराठीत घेऊनही देशाच्या सरन्यायाधीश पदावर पोहोचता येते, हे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी दाखवून दिले."
मराठी माणूस सर्वोच्च पदावर पोहोचल्याचा अभिमान: देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, "न्यायाधीश म्हणून काम करताना न्यायमूर्ती भूषण गवई यांनी समन्वयाने काम करण्याचा प्रयत्न केला. ज्या दिवशी ते सरन्यायाधीश पद सोडतील, तेव्हा त्यांनी एक इतिहास निर्माण केला असेल. एक सामान्य माणूस असामान्य असतो, हे त्यांनी दाखवून दिले. मराठी माणूस हा कष्टाने सर्वोच्च पदावर, सरन्यायाधीशपदी पोहोचला, याचा आम्हाला अभिमान आहे."