सन ही केवळ शारीरिक किंवा मानसिक बाब नसून, ती माणसाच्या आत्म्याशीही निगडित आहे. व्यसनात अडकलेले अनेक लोक एकप्रकारच्या अंतर्गत रितेपणाची भावना व्यक्त करतात, जणू आत्म्याला भोक पडले आहे, अशी ही अनुभूती. या अवस्थेत माणूस आपल्या जीवनातील उद्देश, आपले नातेवाईक, समाज, आणि ईश्वर किंवा उच्च शक्ती यांपासून खूप दूर गेलेला असतो. हे आध्यात्मिक शून्यपण फक्त भावनिकच नव्हे, तर मानसिक आणि सामाजिकदृष्ट्याही खूप त्रासदायक असते. या पोकळपणाला भरून काढण्यासाठी चरससारखे अमली पदार्थांचे सेवन केले जाते. पण ते व्यक्तीला अजून खोल गर्तेत ढकलतात. या लेखातून आपण आध्यात्मिक तुटवड्याची कारणं पाहूया आणि अध्यात्म कशा प्रकारे व्यसनमुक्तीच्या प्रवासात साहाय्यक ठरू शकते, हे समजावून घेऊया.
व्यसनाचा आध्यात्मिक स्वास्थ्यावर होणारा परिणाम
जेव्हा एखादी व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाते, तेव्हा तिचे मूल्य, श्रद्धा, आत्मसन्मान आणि आत्मभान हळूहळू कमी होऊ लागते. जबाबदारीची भावना कमी होऊ लागते. व्यसनजन्य पदार्थांचा वापर हा जीवनाचा केंद्रबिंदू बनतो आणि त्यामुळे नाती, जबाबदार्या आणि आध्यात्मिकता हळूहळू दुर्लक्षित होतात. हे टप्प्याटप्प्याने व्यक्तीला अपराधगंड, एकटेपणा आणि निरर्थकतेच्या भावनेत लोटते.
अनेक आध्यात्मिक विचारांनुसार, व्यसन हे आत्म्याच्या भंगलेल्या नात्याचं प्रतीक असतं, ते स्वतःशी, परमेश्वराशी किंवा जीवनाच्या उद्देशाशी असलेलं नातं तुटल्यामुळे निर्माण होतं. हा तुटलेपणा काही काळासाठी दारू, सिगारेट, ड्रग्ज यांसारख्या गोष्टींनी भरला जातो; पण त्या गोष्टी वरवरचा आनंद व तात्पुरते समाधान जरी देता असल्या, तरी आंतरिक समाधान न देता आणखी पोकळपणा निर्माण करतात.
व्यसन माणसाला आतून खचवतं, त्याच्या आत्म्याशी आणि उद्देशाशी ताटातूट करतं. पण, अध्यात्म त्या तुटलेल्या नात्यांना आत्म्याशी आणि जीवनाशी पुन्हा जोडू शकतं. अनेक व्यसनांतून बाहेर पडलेले लोक सांगतात की, व्यसनात त्यांची आध्यात्मिक भावना लोप पावली होती, पण पुनर्वसनाच्या काळात तीच भावना त्यांना आधार वाटली. प्रार्थना, ध्यान, सत्संग संवाद, निसर्गात वेळ घालवणे यांसारख्या अनेक आध्यात्मिक कृतींमुळे मनःशांती मिळते, दिशा दिसते आणि नवचैतन्य निर्माण होते.
आध्यात्मिकता व्यसनमुक्तीमध्ये कशी मदत करते?
आध्यात्मिक गुंतवणूक व्यक्तीला आत्मभान, उद्देश आणि शांततेकडे नेते. प्रार्थना, ध्यान, योग, आत्मचिंतन यांसारख्या कृतींमुळे व्यक्ती स्वतःशी आणि ‘काही तरी उच्च-दैवी’ याच्याशी पुन्हा जोडली जाते. या माध्यमातून ती व्यसनाची जडलेली वाईट सवय, तणाव आणि भावनिक चढउतार हाताळू शकते. जे लोक व्यसनमुक्तीत अध्यात्माला स्थान देतात, ते अधिक शांत, समतोल आणि निर्णयक्षम होतात. आत्मनिरीक्षण, कृतज्ञता, क्षमाशीलता या भावनांमुळे त्यांना जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहता येते. भावनिक संतुलन आणि विचारांमधील स्पष्टता सुधारते. त्यांना अंतर्गत नियंत्रण चांगले जमते. दीर्घकालीन संयम राखण्यास मदत होते. अनेक लोक आध्यात्मिक किंवा धार्मिक समूहांमध्ये (बैठकीला जाणे-इस्कॉन)सामील होऊन आपले पुनर्वसन सुलभ करतात. ‘12 स्टेप प्रोग्राम’ किंवा ‘अल्कोहोल अनॉनिमस’, ध्यान गट किंवा धर्मगृहे-ही ठिकाणं भावनिक आधार देतात, एकटेपण कमी करतात आणि सकारात्मक सवयी बळकट करतात. एकंदरीत श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढवतात.
अध्यात्म म्हणजे नेमकं काय?
अध्यात्म म्हणजे जीवनात अर्थ, शांती आणि दैवी संबंध शोधण्याची वैयक्तिक वाटचाल. हे धर्माशी किंवा धार्मिक कर्मकांडाशी संबंधित असू शकते, पण धर्माशिवायही अध्यात्म जगता येते. अध्यात्मामुळे अर्थपूर्ण आयुष्य जगात येते, अंतःशांती आणि आत्मसमाधान मिळते, कृतज्ञता आणि करुणा विकसित होते, उद्दिष्टपूर्ण जीवनाची भावना निर्माण होते, स्वतःशी, इतरांशी व निसर्गाशी सुसंवाद साधता येतो आणि दुःखात अर्थ शोधण्याची क्षमता प्राप्त होते. व्यसनमुक्तीच्या प्रक्रियेत अध्यात्म व्यक्तीला स्वतःला माफ करायला शिकवते, आशावाद देते आणि नव्या व्यसनमुक्त जीवनाला स्वीकारायला मदत करते.
मानसिक व भावनिक आरोग्यासाठी अध्यात्म अत्यंत उपयुक्त ठरते. शास्त्रीय संशोधनानुसार, जेव्हा माणूस नियमितपणे प्रार्थना, ध्यान, योग किंवा कृतज्ञतेसारख्या आध्यात्मिक साधनांचा उपयोग करतो, तेव्हा त्याच्या तणाव आणि चिंतेच्या पातळीत लक्षणीय घट होते. या साधनांमुळे भावनात्मक संतुलन आणि नियंत्रण राखणे सोपे जाते आणि मन अधिक संयमित राहते. त्याचप्रमाणे, जीवनाकडे सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याची ताकद वाढल्यामुळे आत्मविश्वास आणि सहनशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे अध्यात्माचा सराव करणारी व्यक्ती केवळ मानसिकदृष्ट्या बळकट होत नाही, तर भावनिक आव्हानांनाही अधिक समजून घेत आणि सामोरे जात, स्थिर आणि सशक्त जीवन जगू शकते.
व्यसनमुक्तीसाठी एक समग्र दृष्टिकोन
व्यसन म्हणजे शरीर, मन आणि आत्मा या तिन्हींचा र्हास. म्हणूनच उपचारही सर्वांगीण असावा. अध्यात्मामुळे तणाव व्यवस्थापन, झोपेचे नियोजन, आहार व व्यायाम या सवयी सुधारण्यावर भर दिला जातो.
शरीरासाठी : वैद्यकीय उपचार, डिटॉक्स, पोषण इत्यादी करावे, मनासाठी : समुपदेशन, मानसोपचार, वैचारिक कौशल्यांचा विकास करावा, आत्म्यासाठी : प्रार्थना, अर्थपूर्ण संवाद, आत्मभान, जीवनदृष्टी, सत्संग करावा. जेव्हा या तिन्ही अंगांवर एकत्रित काम केलं जातं, तेव्हा व्यसनमुक्ती खर्या अर्थाने फलदायी आणि टिकाऊ होते. दैनंदिन अध्यात्मिक सवयी व्यसनमुक्तीसाठी उपयुक्त ठरतात. अध्यात्म साधायला मोठे पूजापाठ लागतात, असं नाही. सर्वसाधारण, नियमित कृतीही खोल परिणामकारक ठरतात
प्रार्थना/ध्यान : दररोज पाच-दहा मिनिटे शांत बसणे
कृतज्ञता लेखन : रोजच्या दोन-तीन चांगल्या गोष्टी लिहिणे
योग/श्वसन : मनःशांती आणि शरीराशी संवाद वाढतो
निसर्गात वेळ घालवणे : चालणे, बागकाम, मोकळ्या हवेत बसणे
सर्जनशीलता : चित्रकला, संगीत, लेखनातून भावना व्यक्त होतात
समूह सहभाग : आध्यात्मिक किंवा व्यसनमुक्ती गटांमध्ये सामील होणे
व्यसन माणसाला आतून खचवतं, त्याच्या आत्म्याशी आणि उद्देशाशी ताटातूट करतं. पण, अध्यात्म त्या तुटलेल्या नात्यांना आत्म्याशी आणि जीवनाशी पुन्हा जोडू शकतं. प्रार्थना, ध्यान, आभार आणि सेवा या गोष्टींमुळे माणूस केवळ व्यसनांतून मुक्त होत नाही, तर तो स्वतःमध्ये पुन्हा नवा प्रकाश शोधतो. व्यसनमुक्ती म्हणजे केवळ संयम नव्हे, तर पुन्हा शांतता, आशा आणि अर्थपूर्ण जीवन जगण्याची संधी आहे आणि ती संधी अध्यात्म देते.
- डॉ. शुभांगी पारकर