महावितरणचे ८६००० कर्मचारी आज संपावर; संपकाळातील सुरळीत वीजपुरवठ्यासाठी महावितरण सज्ज

Total Views |

मुंबई : महावितरणच्या २३ पैकी ६ कर्मचारी संघटनांनी बुधवार दि. ९ रोजी एका दिवसाचा संप पुकारला आहे. या संपकाळात ८६००० कर्मचारी संपात सहभागी होतील असा कर्मचारी संघटनांचा अंदाज आहे. या संपकाळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणकडून आपत्कालीन नियोजन पूर्ण झाले राज्यभरातील यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज राहणार आहे. वीजपुरवठ्याबाबत काही तक्रारी किंवा शंका असल्यास २४ तास सुरु असलेल्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा व संपाच्या कालावधीत सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या सहा संघटनांच्या संयुक्त कृती समितीने राज्यपातळीवरील विविध मागण्यांसाठी बुधवार,दि.९ रोजी २४ तासांचा संप जाहीर केला होता. हा संप होऊ नये यासाठी कृती समितीमधील संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत दोन वेळा बैठक झाली. महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र व संचालक (मानव संसाधन) राजेंद्र पवार यांनी प्रमुख मागण्यांबाबत बैठकीत सकारात्मक प्रतिसाद दिला. वीज ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी संप टाळण्याचे आवाहन केले.

गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळता इतर सर्व रजा रद्द

आपत्कालिन नियोजन व पर्यायी मनुष्यबळ उपलब्ध- या २४ तासांच्या संप काळासाठी महावितरणकडून आपत्कालीन व्यवस्था उभारण्यात आली आहे. यामध्ये मुख्यालय व क्षेत्रीय परिमंडल कार्यालयांमध्ये स्वतंत्र नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. दर तासाला राज्यातील वीजपुरवठ्याची स्थिती वरिष्ठ अधिकारी व मुख्यालयास कळविण्यात येणार आहे. संपकाळात संपात सहभागी नसलेले महावितरणचे कर्मचारी, बाह्य स्त्रोत कर्मचारी, महावितरणच्या निवड सूचीवरील कंत्राटदार व कर्मचारी यांची सुरळीत वीजपुरवठ्यासाठी स्थानिक कार्यालय, उपकेंद्र आदी ठिकाणी तात्पुरत्या नियुक्ती करण्यात आली आहे. आवश्यकतेनुसार बाह्यस्त्रोत कर्मचाऱ्यांच्या कंत्राटदारांना अतिरिक्त मनुष्यबळाची मागणी करण्यात आली आहे. या सर्वांसाठी वाहन व्यवस्था व इतर सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबतच्या लेखी सूचना क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. यासह गंभीर कारणास्तव घेतलेल्या रजा वगळून इतर अभियंते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत.

घरगुतीसह अत्यावश्यक क्षेत्रात वीजपुरवठ्याची खबरदारी

संपकाळात प्रामुख्याने घरगुती ग्राहकांसह पाणी पुरवठा योजना, रुग्णालये, मोबाईल टॉवर्स, शासकीय कार्यालये आदींचा वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. ज्या ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला त्या ठिकाणी सर्वप्रथम पर्यायी व्यवस्थेतून (बॅकफिड) वीजपुरवठा सुरू करण्यात येईल.

२४ तास टोल फ्री क्रमांक

संपकाळात वीजसेवा देणारे अभियंते व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. वीजपुरवठा संदर्भात काही तक्रारी असल्यास शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे १९१२ किंवा १८००-२१२-३४३५ किंवा १८००-२३३-३४३५ हे टोल फ्री क्रमांक २४ तास उपलब्ध आहेत.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.