मुंबई : नितेश तिवारी दिग्दर्शित आणि रणबीर कपूर-यश यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘रामायण’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून, तो सध्या सोशल मीडियावर आणि बॉलीवूडमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. ‘भारतीय सिनेमा इतिहासातील सर्वात मोठा चित्रपट’ असा उल्लेख मिळवणाऱ्या या महाकाव्यावर निर्मात्यांनी अफाट खर्च केला असून, त्यामुळेच हा चित्रपट ‘हिट’ ठरवण्यासाठीही त्याला तितक्याच मोठ्या संख्येने कमाई करावी लागणार आहे.
‘रामायण’ हा दोन भागांमध्ये तयार होणारा चित्रपट असून, याचा पहिला भाग ९०० कोटी रुपये बजेटवर तयार केला जात आहे. या चित्रपटाचे निर्माते नमित मल्होत्रा (DNEG आणि Prime Focus Studios) असून, यामध्ये यशची प्रोडक्शन कंपनी Monster Mind Creations देखील सहभागी आहे. ९०० कोटींच्या बजेटसह, ‘रामायण’ हा आतापर्यंतचा सर्वात महागडा भारतीय चित्रपट ठरतो.
हिट ठरण्यासाठी कमाई किती लागणार?
चित्रपट समीक्षक आणि बॉक्स ऑफिस ट्रॅकिंग साइट कोईमो च्या निकषांनुसार, कोणताही चित्रपट ‘हिट’ ठरण्यासाठी त्याने किमान १००% रिटर्न म्हणजेच बजेटच्या दुप्पट कमाई करणे आवश्यक असते. त्यामुळेच रामायणला ‘क्लीन हिट’ ठरण्यासाठी भारतात एकूण १८०० कोटी नेट कमाई करावी लागेल. हा आकडा ऐतिहासिक असून, आजवर कोणत्याही भारतीय चित्रपटाने इतकी कमाई केलेली नाही. ‘रामायण’ने रचावी लागणार इतिहास
सध्या भारतात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हणजे ‘पुष्पा २’, ज्याने १२६५.९७ कोटी नेट कमाई केली आहे. त्यामुळे, ‘रामायण’ने हिट ठरण्यासाठी ‘पुष्पा २’च्या तुलनेत सुमारे ४२.१८% अधिक कमाई करावी लागणार आहे. इतक्या मोठ्या कमाईसाठी, ‘रामायण’ला केवळ भव्य व्हिज्युअल्स नव्हे, तर मजबूत कथा, संगीत, आणि प्रेक्षकांची जबरदस्त पसंती आवश्यक ठरणार आहे.
चित्रपटाबाबत अधिक माहिती
‘रामायण’ चित्रपटाचा पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार असून, दुसरा भाग दिवाळी २०२७ ला रिलीज होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर भगवान श्रीराम, तर यश रावण या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय, साई पल्लवी (सीता), सनी देओल (हनुमान), रवि दुबे, लारा दत्ता आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत.
ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.