
नावात अंधार असल्यावर बुद्धीतही अंधार असावा, हा निव्वळ योगायोग मानायचा का? हो. पण, हिंदूंना शिव्याशाप देणार्या त्यांच्या श्रद्धांची टिंगलटवाळी करणार्या सुषमा अंधारेबद्दल हा योगायोग घडला आहे बरं. त्यांनी नुकताच प्रश्न विचारले, मद्यपान करणे हा गुन्हा आहे का? पुण्यातल्या रेव्ह पार्टीबद्दल त्यांनी म्हणे हा प्रश्न विचारला आहे. अंधारेंचे म्हणणे आहे की, ती हाऊस पार्टी होती, रेव्ह पार्टी नव्हती. अर्थात ती हाऊस पार्टी आहे का, रेव्ह पार्टी आहे, याचे अगाध ज्ञान अंधारेंना असणार, त्याशिवाय का त्या इतक्या अधिकारवाणीने बोलत आहेत.
असो! शोषित-वंचित समाजातून आले, हालअपेष्टा सहन केल्या, मला समाजाचे दुःख कळते, असे सदासर्वदा अंधारे बोलत असतात. पण, शोषित-वंचितच नव्हे, तर समाजातील सर्वच स्तरातील अनेक कुटुंब आज दारूच्या व्यसनापाई बर्बाद झाले, हे सत्य सुषमा यांना माहिती नाही का? दिवसभर घरचे आईबाबा मोलमजुरी करतात. त्याच पैशांवर मुलांच्या मुखी भाकर जाणार असते. पण, संध्याकाळी मजुरी हातात पडली की, बाप पहिला दारूचा गुत्ता गाठतो. त्या नशेत पत्नीच्या मजुरीचे पैसेही हिसकावतो. हे दृश्य पाहून मुलं रडतात, भीतीने उपाशीपोटी झोपतात. त्या आईची रात्र आसवांनी भिजते. हे दृश्य आजही वस्तीपातळीवर अनेक घरात आहे. तो बाप, तो पती वाईट नसतो. पण, दारूने तो सैतान होतो. त्या आईचे, त्या आईच्या मुलांचे, त्या कुटुंबाचे दुःख सुषमा अंधारे आणि त्यांच्या समविचार्यांना माहिती आहे का? तसेच, सुषमा यांचा समज असा तर नाही ना की, वस्तीत दारू पिणारा बेवडा, दारूडा मात्र सुखवस्तू फ्लॅटमध्ये दारू पिणारी व्यक्ती जंटलमन असते? हो आणखी एक त्या पार्टीसंदर्भात दारूसोबत अमली पदार्थांचा उपभोग घेणे हा गुन्हा आहे की नाही, याबाबत सुषमा काही म्हणाल्या नाहीत. यावर काही लोकांचे म्हणणे आहे की, सुषमा अंधारे या ‘हा’ राजकीय पक्ष सोड ‘तो’ राजकीय पक्ष पकड असे पक्ष पक्ष खेळत आल्या. त्यामुळे त्यांना रेव्ह पार्टी की हाऊस पार्टी याबाबत गोंधळ उडाला असावा. खरे तर रेव्ह पार्टी करावी की, हाऊस पार्टी करावी, हा ९५ टक्के समाजाचा जगण्याचा विषय नाही. त्यामुळेच दारू पिणे हा गुन्हा नाही म्हणणार्या सुषमा अंधारेची नाळ गोरगरीब वस्तीपासून तुटलेली आहे. त्यांनी त्यांचे राजकारण जरूर करावे. पण, यापुढे कष्टकरी समाजाशी नाते सांगू नये.
मोबाईल बहाद्दर:एक विकारगेल्याच आठवड्यातली घटना. त्या महिलेला प्रवासात किंवा चालताना मोबाईलवर बोलण्याची सवय होती. नेहमीप्रमाणे त्या महिलेने कानात हेडफोन लावले. बोलण्यात तल्लीन होत ती चालत होती. वाटेत रेल्वेचे रूळ पार करून जावे लागत असे. बोलण्यात गुंग असलेली ती महिला रेल्वेचे रूळ पार करू लागली. समोरून ट्रेन येत होती याकडे तिचे लक्षच नव्हते. तिच्या सहकार्याने ते पाहिले. त्या महिलेला वाचवण्यासाठी तो पुढे धावला. पण, रेल्वेने त्या दोघांनाही अक्षरशः चिरडले. नाहक दोघे मृत्युमुखी पडले. दोन कुटुंब उद्ध्वस्त झाली. मोबाईलशिवाय पानही हालत नाही, हेच आजचे दृश्य आहे.
बसमध्ये लिहिलेले असते की, बसमध्ये मोबाईलवर हेडफोनशिवाय ऑडियो व्हिडियो पाहणे, ऐकणे किंवा मोठ्याने बोलण्यास निर्बंध आहेत. पण, हा नियम न पाळणारा एक तरी प्रवासी असतो. (यात महिलावर्ग आघाडीवर आहे) जी कोणती मातृभाषा असेल, त्याद्वारे मोबाईलवर तासनतास गप्पा मारणार्यामध्ये सर्व स्तरातील व्यक्ती असतात. यात प्रांत, भाषा, जात, धर्म असा भेद नाहीच. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या सार्वजनिक वाहनामध्ये आपण एकटेच बसलो आहे, असे स्वतःच ठरवत मोबाईलवर मोठ्याने बोलणारे प्रवासी इतर प्रवाशांची डोकेदुखी असतात. सार्वजनिक वाहनात बसल्या बसल्या ती व्यक्ती मोबाईलवर संवाद सुरू करते. राग आल्यास संतपाने किंचाळणे, विनोद झाल्यास आजूबाजूच्या प्रवाशांचा विचार न करता भयंकर पद्धतीने हसणे किंवा द्वेषाने भांडणे, क्वचित हमरीतुमरीवर येत शिवीगाळही केली जाते. हा मोबाईलचा संवाद अगदी वाहनातून उतरल्यावरही सुरूच राहतो. या बोलण्यातून त्या व्यक्तीचे खासगी जीवन उघड्यावर पडते. पण, याचेही काही सोयरसुतक त्यांना नसते. आपल्याच मोबाईल संवादात ते गुरफटलेले असतात. वैयक्तिक स्वातंत्र्य आहे. पण, गप्पा मारताना आजूबाजूला काय घडते, याचे भान त्यांना राहत नाही. हावरेपणा हा एक निषेधात्मक शब्द आहे. पण, मोबाईलवर वेळकाळ विसरून तासनतास निरर्थक बोलणार्या प्रवाशांकडे पाहून वाटते की, हे लोक संवादासाठी हावरे आहेत का? किंवा त्यांचे कुणीतरी ऐकून घ्यावे, यासाठी भूकेले आहेत का? मोबाईलवर तासनतास निरर्थक बिनकामाचे बोलणे हासुद्धा एक नवीन विकार आहे का?