आकासाठी जेलमध्ये स्पेशल फोन! सुरेश धस यांची माहिती, म्हणाले...
30-Jul-2025
Total Views |
मुंबई : बीड न्यायालयात आका म्हणजेच वाल्मिक कराडसाठी एक स्पेशल फोन सापडला आहे, असा दावा भाजप नेते सुरेश धस यांनी केला आहे. तसेच त्यांनी या फोनचे डिटेल्स घेण्याचीही मागणी केली आहे. बुधवार, ३० जुलै रोजी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सुरेश धस म्हणाले की, "२१ ऑक्टोबर २०२३ ला महादेव मुंडेंची हत्या झाली. अद्यापही आरोपी सापडत नाही. त्यामुळे आता ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांचे गाऱ्हाणे मांडतील. त्यानंतर त्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. आका असलेल्या तुरुंगातून एक स्पेशल फोन सापडला आहे. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आका वापरत असलेल्या फोनचे डिटेल्स घेतल्यास सगळी माहिती बाहेर पडेल. महादेव मुंडेंचे प्रकरण मी स्वत:च काढले आहे. त्यापूर्वी कुणीही या प्रकरणावर बोलत नव्हते."
"संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आका आणि त्याचे सर्व साथीदार दोषमुक्तीचा अर्ज घेऊन न्यायालयाकडे गेले होते. परंतू, न्यायालयाने तो अर्ज फेटाळला. या केसमध्ये अडथळे निर्माण करून ती जास्तीत जास्त लांबवण्याचा यात प्रयत्न होता. पण न्यायालयाने तो अर्ज फेटाळून लावत काही निरीक्षणे नोंदवली आहेत. या संपूर्ण प्रकरणात खंडणीचा गुन्हा, ३०२ चा गुन्हा यासह सर्व गुन्हे एकत्रित करून मकोका अंतर्गत कारवाई झाली आहे. यात आकाच मुख्य सूत्रधार असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे. भविष्यात हे निरीक्षण उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि अगदी राष्ट्रपतींकडे केल्या जाणाऱ्या दयेच्या अर्जापर्यंत संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या बाजूने कामाला येणार आहे. आम्ही सगळे संतोष देशमुखांच्या कुटुंबाच्या बाजूने उभे असून त्यांना न्याय मिळण्याच्या दिशेने हे चांगले पाऊल पडले आहे," असेही ते म्हणाले.
आकाला खंडणी गोळा करण्याची सवय
"बीड जिल्ह्यात आलेल्या आवादा कंपनीसह पवन ऊर्जेशी संबंधित सगळ्याच कंपन्यांना धमक्या देणे, मोठ्या प्रमाणात खंडणी गोळा करण्याची सवय आकाला लागली होती. आकाच्या सांगण्यावरून याच आवादा कंपनीच्या दोन लोकांचे मे महिन्यात अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर आवादा कंपनीने गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे त्यांना पाथर्डी तालुक्यात सोडून देण्यात आले. त्यांच्याकडून खंडणी गोळा करणे हा एकमेव उद्देश होता. त्या खंडणीच्या आड संतोष देशमुख आल्याने त्यांचा खून करण्यात आला. ही सगळी बाब न्यायालयाच्या लक्षात आली आहे," असेही सुरेश धस यांनी सांगितले.