केडीएमसी आयुक्तांनी केली रस्ते दुरुस्तीची पाहणी

    30-Jul-2025   
Total Views |

कल्याण : केडीएमसी हद्दीतील रस्त्यावर पावसामुळे खड्डे पडल्याने वाहन चालकांसह प्रवासी आणि सामान्य नागरीकांचे कंबरडे मोडले आहे. सध्या महापालिकेने रस्त्यावरील खड्डे भरण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाची पाहणी बुधवारी महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी केली. कामाचा दर्जा राखा अन्यथा ठेकेदाराची हयगय केली जाणार नाही असा सज्जड दम त्यांनी अधिकारी वर्गासह खड्डे बुजविणाऱ्या ठेकेदारांना दिला आहे.

आयुक्त गोयल यांनी कल्याण पश्चिम भागातील मिलिंद नगर, गौरीपाडा, योगी धाम तसेच कल्याण पूर्व भागातील पूना लिंक रोड, चक्की नाका, मलंग रोड या ठिकाणच्या कामांची पाहणी केली. या पाहणीच्या वेळी शहर अभियंता अनिता परदेशी, कार्यकारी अभियंता जगदीश कोरे , मनोज सांगळे आदी उपस्थित होते.

पाहणी दरम्यान आयुक्तांनी काही नागरिकांशी संवाद साधला. कामे योग्य पद्धतीने आणि दर्जेदार केली जावीत. तसेच कामाचा वेग वाढविण्यात यावा असे आदेश कनिष्ठ अभियंता , उपअभियंता आणि ठेकेदार यांना दिले आहे. महापालिका हद्दीतील रस्त्यावरील खड्डयांच्या अनेक तक्रारी महापालिका प्रशासनास प्राप्त झाल्याने आयुक्तांनी रस्त्यावरील खड्डे बुजविण्याच्या कामाची पाहणी केली.

खड्ड्यांची येथे नोंदवा तक्रार

महापालिकेकडून रस्ते दुरुस्तीच्या कामासाठी १९ ठेकेदारांची नेमणूक केली आहे. सर्व प्रभागात रस्ते दुरुस्तीची कामे सुरू आहेत. या कामासाठी जवळपास ३० कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारीसाठी महापालिकेने १८००२३३००४५ हा टोल फ्री नंबर २४ तास उपलब्ध ठेवला आहे. या नंबरवर नागरिकांनी रस्त्यांवरील खड्ड्यांविषयी आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असे आवाहन महापालिकेने केले आहे.