
‘देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, डोंबिवली’ ही संस्था भविष्यात युवकांच्या हातात धुरा कशी देता येईल, या दृष्टिकोनातून वाटचाल करत असून ज्ञातीतील सर्वाच्या उत्कर्षासाठी प्रयत्नशील असलेली ही संस्था इतरांसाठी ही आदर्शवत आहे. या संस्थेच्या वाटचालीवर टाकलेला हा प्रकाश...या संस्थेची स्थापना ही दि. २४ ऑक्टोबर १९६९ रोजी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी दत्तात्रय मांडवगणे यांच्या कार्यालयामध्ये वसंत दंडगे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. सुरुवातीला नगण्य सदस्य होते. हळूहळू संस्था वाढत गेली. बाळकृष्ण दंडगे, रमेश नंदुरकर, वेंकटेश जपे, भास्कर रत्नपारखी, श्रीकृष्ण देशपांडे, अरविंद हस्तेकर, रामचंद्र दिगवडेकर, रेडगांवकर अशा अनेक ज्येष्ठ सभासदांनी संस्थेसाठी अहोरात्र काम करून घरोघरी जाऊन सभासद मिळवून संस्था वाढविण्यासाठी प्रयत्न केले. अविनाश कुलकर्णी आणि दीपक देशपांडे यांनी त्यांच्या कार्यकालात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून संस्थेच्या प्रगतीचा आलेख उंचावला. विद्यमान अध्यक्ष जगन्नाथ जोशी यांनी संस्थेच्या प्रगतीचे चक्र गतिमान करून संस्था भरभराटीला आणली. २०१५ साली जे. के. जोशी यांच्या हाती संस्थेच्या अध्यक्षपदांची धुरा आली. त्यांनी अत्यंत कुशल आणि कार्यक्षमरित्या सांभाळली. सहकार, बँकिंग, राजकीय, सामाजिक अशा अनेक क्षेत्रांत असलेला दांडगा अनुभव, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य यांची मधुर वाणी, प्रचंड जनसंपर्क अशा अनेक गुणांमुळे जी. के. जोशी हे सतत अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून येत आहेत. संस्थेच्या वाढीसाठी महिला समिती, युवा समिती, त्रिमासिक समिती, वधुवर समिती, वाढदिवस शुभेच्छा समिती अशा विविध समित्या स्थापन करून संस्थेच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यात आली.
डोंबिवलीमध्ये असलेल्या अनेक संस्थांना ‘देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संस्था’ ही अपवाद आहे. कारण या संस्थेमध्ये कार्यकारिणी सदस्य, पदाधिकारी आणि विविध समितींमध्ये जवळजवळ ५० टक्के पदाधिकारी हे युवक आहेत. तसेच भविष्यात संस्थेच्या कामकाजाची संपूर्ण धुरा ही युवांना देण्यासाठी संस्था ही कटिबद्ध असून त्या दृष्टीने सर्व प्रकारे युवकांना कामकाजात मोकळीक देऊन त्यांना पुढे आणण्याचे काम हे जी. के. जोशी हे करत आहेत.
संस्थेसाठी मैलाचा दगड ठरले, ते म्हणजे २०१९ हे साल. दि. २४ नोव्हेंबर २०१९ रोजी संस्थेने सुवर्णमहोत्सवी वर्ष सोहळा थाटामाटात साजरा केला. संस्थेची खास वैशिष्ट्ये सांगायाची झाली, तर त्यात अत्यंत पारदर्शक कामकाज व व्यवहार हे प्रथम सांगावे लागेल. याशिवाय, युवकांचा मोठा सहभाग आणि विविध उपक्रमांची सुरुवात, वयवर्षे ७५ पूर्ण झालेल्या संस्थेच्या सभासदांचे सन्मान, सर्व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत आणि गुणवंतांचे सत्कार, दिवंगत सैनिकांच्या कुटुंबीयांना घरी जाऊन आर्थिक मदत करणे, वृद्धाश्रमांना मदत करणे आदी उपक्रम संस्थेतर्फे राबविले जातात. तसेच तिळगूळ समारंभ मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. मराठी भाषा दिन, दासनवमी, नाथषष्ठी, वसंतोत्सव, याचबरोबर कोजागिरी पौणिमेनिमित्त महिलांसाठी भोंडला आणि वार्षिक स्नेहसंमेलन आयोजित केले जाते. महिलाही मोठया उत्साहाने या कार्यक्रमात सहभागी होतात. समाजातील सर्व थरांतील लोकांना वैद्यकीय मदत देण्याचे काम ही संस्था करते. त्यामुळे अनेक कुटुंबांना वैद्यकीय मदतीसाठी ही संस्था आधार ठरली आहे. असे एक ना अनेक उपक्रम सभासदांसाठी राबविलेले जातात. अनेक नामवंत व्यक्ती या संस्थांमध्ये आपुलकीने येऊन विविध कार्यक्रमांतून मार्गदर्शन करून गेल्या आहेत. त्यामध्ये रविंद्र आवटी, प्रविण दवणे, मृदुला दाढे इत्यादी वक्त्यांची व्याख्याने व उत्तम सांगीतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. संस्थेतर्फे ‘ऋग्वेद’ नावाचे सुंदर त्रैमासिक काढले जाते. विनयकुमार काशीकर यांनी संस्थेचे त्रैमासिक सुरू केले. तसेच सभासदांची सूची करण्याची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षात आणली व सूची पुस्तक प्रसिद्ध केले आहे. त्रैमासिक हे जवळजवळ चार हजार ज्ञाती कुटुंबांना पाठविले जाते.
‘देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ’ ही संस्था आजच्या घडीला शहरातील नामवंत संस्था आहे. तीन हजारांपेक्षा जास्त सभासद संख्या आजमितीस आहे. संपूर्ण भारतात असलेल्या इतर देशस्थ ऋग्वेदी संस्थांमधून डोंबिवली संस्था ही सर्व बाबतीत अग्रगण्य आहे. ‘देशस्थ ऋग्वेदी संस्थे’चा आदर्श हा नक्कीच इतर संस्थांनी घ्यावा, असे संस्था सभासदांकडून सांगण्यात आले आहे. ‘देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण संघ, डोंबिवली’ संस्थेची संपूर्ण नवीन कार्यकारिणी वर्ष दि. १ जून २०२५ ते दि. ३१ मार्च २०२८ या कालवधीकरिता एकमताने बिनविरोध नियुक्त झाली आहे. नवीन कार्यकारिणीमध्ये ५० टक्के पदाधिकारी हे युवा सदस्य आहेत. जी. के. जोशी हे परत एकदा अध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. नवीन कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून ‘ब्राह्मण महासंघ डोंबिवली संस्थे’चे माजी अध्यक्ष आणि ‘देशस्थ ऋग्वेद संस्थे’चे युवा सदस्य मानस पिंगळे यांची बिनविरोध निवड झाली असून प्रकाश कुलकर्णी हे कार्यवाह, निलिमा चिंचणकर आणि जयंत कुलकर्णी हे सहकार्यवाह, धनंजय जोशी हे कोषाध्यक्ष आणि संजीवनी कर्डेकर सहकोषाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. संस्थेचे विश्वस्त अध्यक्ष म्हणून नारायण रत्नपारखी आणि विश्वस्त कार्यवाह म्हणून अनुराधा मोहिदेकर यांची सर्वानुमते निवड झाली आहे. संस्थेच्या महिला समिती प्रमुख म्हणून शुभदा कुलकर्णी, युवा समिती प्रमुख म्हणून महेश अराणके यांची निवड झाली आहे. या समितीत विकास महाशब्दे, नरेश कुलकर्णी, कृष्ण चिंचणकर, शुभदा कुलकर्णी, सीमा संत, प्रदीप बाजी, निरज देशपांडे, विवेक वामोरकर, मिलिंद गुळवणे, सुधीर ढोबळे, प्रकाश उपाध्ये, गोविंद जोशी, पल्लवी आंबेकर, वृंदा मोहिदेकर, महेश अराणके हे सदस्य पदांवर आहेत, तर स्वीकृत सदस्य म्हणून शिवकुमार इनामदार, साधना लोहकरे म्हणून काम पाहात आहेत.