कंपन्या फायद्यात तरी कर्मचार्‍यांवर कुर्‍हाड?

    29-Jul-2025   
Total Views |

बाजारातील ट्रेंड सातत्याने बदलत असतात. त्यामुळे ज्ञान अद्ययावत करत राहण्याला पर्याय नाही. असे असूनही अनेकदा नोकरकपात केली जाते. यामागे विविध कारणे असतात. ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनी’ने केलेली १२ हजार कर्मचार्‍यांची कपात ही भविष्यातील एका भयंकर संकटाचा इशारा तर देत नाही ना?

आपल्याला लहानपणापासून लाकूडतोड्याची गोष्ट चुकीची सांगितली जाते. ज्यामध्ये एका लाकूडतोड्याच्या प्रमाणिकपणामुळे, त्याला तिन्ही कुर्‍हाडी बक्षीस मिळतात वगैरे. आताच्या ‘टेक्नोसेव्ही’ युगात त्यातल्या त्यात आयटी क्षेत्रात तरी, या गोष्टीचा काहीही उपयोग नाही. कारण, इथे दुसर्‍या लाकूडतोड्याची गोष्ट लागू पडते. ही गोष्ट दोन लाकूडतोड्यांची आहे, दोघेही मित्रच. एकाच दिवशी कामावर रूजू होतात. मात्र, काही दिवसांनी त्यातल्या एकाला चांगला हुद्दा मिळतो, पण दुसरा मात्र, तेच काम रोज करत बसतो. काही दिवसांनी दोघेही भेटतात, तेव्हा पहिला मित्र दुसर्‍याला विचारतो ’आपण दोघे तर एकाच दिवशी रुजू झालो होतो; पण मग तुला चांगली मजुरी आणि मी मात्र अजून तिथेच. असं का?’

यावर दुसरा मित्र हसून विचारतो, ’तू कुर्‍हाडीला शेवटची धार कधी काढलीस आठवतंय का? त्यावर पहिला मित्र म्हणतो, ‘हो एक १५ दिवसांपूर्वी’. यावर दुसरा म्हणतो, ’मी आजही कुर्‍हाडीला रोज धार काढतो!’ तात्पर्य हेच की, ज्या प्रकारे जग एकत्र येऊ लागले आहे, त्यानुसार ज्यांनी आपल्या कुर्‍हाडींना दररोज धार काढली नाही, त्यांची गत ही या कथेतील पहिल्या लाकूडतोड्यासारखी होऊ शकते. हाच इशारा ‘टीसीएस’च्या इतक्या प्रचंड कर्मचारी कपातीतून दिसून येतो.

‘टीसीएस’ कंपनीची आकडेवारी पाहिली तर लक्षात येईल की, कंपनीने नवी नोकरभरती तर कमी करत आणलीच, शिवाय जे कर्मचारी आहेत त्यांनाही नारळ देण्याची प्रक्रिया सुरू केली. अर्थात कंपनी सांगताना जरी गोड बोलत आम्ही केवळ दोन टक्केच कपात केल्याचे जरी सांगत असली, तरीही हा आकडा १२ हजार इतका प्रचंड आहे. ‘विप्रो’सारख्या कंपनीलाही आपल्या नोकरभरतीच्या प्रक्रियेत बदल करावा लागला. अर्थात कंपन्यांचे अंतिम ध्येय नफा कमावणे असल्याने, ते कर्मचारी कपातीत कोणताही तमा बाळगत नाहीत. ‘कोविड’ काळात ही झळ सर्वच क्षेत्रांत अधिक तीव्रतेने जाणवली होती. काही कंपन्यांनी नोकरभरतीत हळूहळू कमी केली आहे. उपलब्ध मनुष्यबळात व्यवस्थापन करण्याचा कलही दिसून आला. काही कंपन्यांनी विद्यमान कर्मचार्‍यांकडे अधिकचा भार देऊन, काम पूर्ण करण्याची यंत्रणाही राबवली.

बर्‍याचदा कंपन्या तोट्यात असल्यानंतर कर्मचारी कपातीचा उपाय योजतात, असा प्रघात आहे. मात्र, आयटी कंपन्यांबद्दल तसे नाही. ‘टीसीएस’चा पहिल्या तिमाहीतील नफा ६३ हजार, ४३७ कोटी इतका होता. ‘इन्फोसिस’चा नफा ४२ हजार, २७९ कोटी इतका आहे. ‘टीसीएस’, ‘विप्रो’, ‘इन्फोसिस’, ‘एचसीएल टेक’ या कंपन्यांच्या नफ्याचा आलेख वाढताच आहे. कर्मचार्‍यांचा राबता जितका जास्त तितका पसारा मोठा आणि नफाही मोठा, असा काही वर्षांपूर्वी आयटी क्षेत्राचा समज होता. मात्र, तो आता बदलत चालला आहे.

संपूर्ण व्यवस्थापन खर्चाचा गांभीर्याने विचार करत असल्याचा कल यातून दिसतो. पाश्चिमात्य देशांमधून हा प्रघात आला. डोनाल्ड ट्रम्प जरी म्हणत असले की, आता ‘वर्क फ्रॉम होम’ बंद, तरीही कंपन्यांसाठी तीच फायद्याची गोष्ट आहे. त्यामुळे कंपन्यांच्या व्यावहारिक खर्चात कपात होते. भौतिक गोष्टींवर होणार्‍या खर्चात मोठीच बचतही होते. ‘वर्क फ्रॉम होम’मुळे जागा, भाडे, वीज, पाणी यावर होणार्‍या खर्चातही आपसूकच बचत झाली. त्यामुळे कंपन्या पुन्हा कर्मचार्‍यांना बोलावण्यास धजावत नाहीत.

‘एआय’चा उगमही या कर्मचार्‍यांसाठी कर्दनकाळ होत चालला असल्याचा आरोप होतो. अर्थात ज्यांनी ‘एआय’, ‘मशिन लर्निंग’ या गोष्टी शिकून घेतल्या, त्यांनी आपल्या नोकर्‍या सांभाळूनच ठेवल्या नाहीत, तर कंपन्यांनी चांगली वेतनवाढ देऊन नवी जबाबदारही दिली. मात्र, ज्यांनी याकडे दुर्लक्ष केले, त्यांच्या मानेवर चालवलेली ही कुर्‍हाड आहे, अशीही आवई उठली. ‘एआय’ ऑटोमेशनकडे वळताना, आयटी कंपन्यांनी त्यांचा कल ‘जेन-एआय’ आणि ‘ऑटोमेशन प्लॅटफॉर्म’कडे वळवला आहे. या क्षेत्रात मोठी गुंतवणूक होताना दिसत आहे. “आम्ही ‘एआय’मध्ये करत असलेल्या गुंतवणुकीमुळे आता कामाच्या पद्धतीत बदल होताना दिसतील,” असे मत, ‘टीसीएस’चे सीईओ के. कृष्णन रामानुजम कृतीवासन यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले होते. अर्थात “एआय’मुळेच १२ हजार नोकर्‍या गेल्या, हे साफ खोटे आहे” असे त्यांनी स्पष्ट केले.

“कामाच्या वातावरणाशी जुळवून न घेतलेल्या, स्वतःची कौशल्ये विकसित न केल्याने कंपनी अशा कर्मचार्‍यांना कायम ठेवू शकली नाही, असे त्यांनी सांगितले. “एआय’चा कामावर परिणाम आहे मात्र, तो २० टक्के इतकाच असेल. तरीही ‘टीसीएस’ने ‘एआय’मध्ये गुंतवणूक करून, सुमारे ५.५ लाख कर्मचार्‍यांना त्याचे प्रशिक्षण दिले आहे. तर एक लाख कर्मचार्‍यांना अद्ययावत कौशल्याचे प्रशिक्षणही दिले आहे,” असे कंपनीने सांगितले. काही उच्चपदस्थ कर्मचार्‍यांना, नवे तंत्रज्ञान आत्मसात करण्यात अडचणी येत आहेत. ‘वॉटरफॉल’ मॉडेल ऐवजी ‘प्रॉडक्ट सेंट्रल डिलिव्हरी’ ही संरचना स्वीकारत असल्याने, ‘टीसीएस’मध्ये वरिष्ठांवर अवलंबून राहण्याची गरज राहिली नाही. त्यामुळे अनेक उच्चपदस्थांची गरज संपुष्टात आली.

‘आयटी कंपन्यांची एकेकाळी आलेली बूम’ हा फुगा, केव्हातरी फूटणारच होता. त्याची ही सुरुवातसुद्धा असू शकते, असे अनेकांचे मत आहे. जागतिक अस्थिरतेमुळे, नव्या कंपन्या बाजारात तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक करण्यास धजावत नाहीत. नव्या प्रकल्पांवर अशा प्रकारच्या कर्मचार्‍यांचे भवितव्य अवलंबून असते. बर्‍याचदा कंपन्या कर्मचार्‍यांना बेंचवर ठेवतात. म्हणजे एखादा नवा प्रकल्प आल्यवर तिथे त्याचे कौशल्य वापरता येईल का? याचा विचार केला जातो. मात्र, तसे न झाल्यास कर्मचारी कपातीचा पर्याय दिला जातो. कर्मचार्‍यांची कपात केल्यानंतर, त्यांना ठराविक नोटीस पीरिअड, सेव्हरन्स पॅकेज, आरोग्य विमा, मानसिक तणाव कमी करण्यासाठी मदत अशा प्रकारच्या सेवाही दिल्या जातात. मात्र, इतक्या मोठ्या पगाराच्या नोकरीला तोडीस तोड नोकरी नव्याने शोधणे, कर्मचार्‍यांनाही कठीण जाते. ‘लाईफस्टाईल’ हा मुद्दाही महत्त्वाचा असल्याने, ती टिकवण्याचे आव्हानही त्यांच्यापुढे असते. परिणामी कर्मचार्‍यांवर मानसिक तणाव हा येतोच.

अर्थात कंपन्यांना नोकरकपात करताना काहीच गैर वाटत नाही. कर्मचारी कपात हे त्यांच्यासाठी संकट नसून, भविष्यात येणार्‍या नव्या आव्हानांची तयारीही असू शकते. पूर्वी आयटी कंपन्या महाविद्यालयांमध्ये नव्या कौशल्याच्या शोधात असत. मात्र, ही प्रक्रियाही मंद करण्यात आली. काहींनी भरती केल्यानंतर प्रशिक्षणादरम्यान जे त्या त्या कामासाठी पात्र नाहीत, त्यांनाही कामावरून तातडीने कमी केले. अर्थात या दरम्यान, कंपनीने व्यवस्थापन क्षेत्रातील मध्यम महत्त्वाच्या कर्मचार्‍यांनाही नारळ दिला आहे. त्यांच्यावर होणारा कंपनी खर्चही बर्‍यापैकी अधिकच असतो. त्यामुळे फक्त ‘एआय’ नाही, तर आणखी बर्‍याच गोष्टी या नोकर कपातीला कारणीभूत ठरणार आहेत.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.