अतिरेकी मारून मेहरबानी केली का? राजन विचारेंचे वादग्रस्त विधान

    29-Jul-2025
Total Views |


मुंबई : अतिरेकी मारून मेहरबानी केली का? असे वादग्रस्त विधान उबाठा गटाचे माजी खासदार राजन विचारे यांनी केले आहे. यावरून त्यांच्यावर प्रचंड टीकाटिपण्णी करण्यात येत आहे. पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यानंतर सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांची ही दुटप्पी भूमिका आहे का? असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

सोमवार, २८ जुलै रोजी भारतीय लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त ‘ऑपरेशन महादेव’मध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरमधील लिडवास येथे पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी संबंधित ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. भारतीय लष्कराच्या चिनार कॉर्प्सने या संदर्भात माहिती दिली. लष्काराने दिलेल्या माहितीनुसार या कारवाईत पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार दहशतवादी हाशिम मुसा याचाही मृत्यू झाला आहे.


पहलगाममध्ये हल्ला करणारे अतिरेकी आतापर्यंत का सापडले नाहीत? असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत होता. मात्र, आता याच विरोधकांनी दुटप्पी भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. याबाबत बोलताना उबाठा गटाचे माजी खासदार राजन विचारे म्हणाले की, "अतिरेकी मारून तुम्ही मेहरबानी केली का? पहलगाम आपल्या देशातच आहे की, पाकिस्तानमध्ये आहे? त्या अतिरेक्यांनी २६ कुटुंब उध्वस्त केले. ते अतिरेकी आज पकडले गेले असतील तर त्याचा एवढा डंका वाजवण्याची गरज काय? आज संपूर्ण देश यावरून खवळलेला आहे," असे ते म्हणाले. राजन विचारेंच्या या वादग्रस्त विधानानंतर त्यांनी भारतीय सैन्यदलावर संशय घेतल्याचेही बोलले जात आहे.