‘स्वबोधातून स्वविकासाकडे...’ या ‘मनोवाटा’च्या मागील भागात आपण ‘स्व’चा शोध का गरजेचा आहे, ते जाणून घेतले. आजच्या लेखातून आत्मशांतीसाठीची ही अंतर्मुखता नेमकी कशी साधावी, याविषयी सविस्तर...आपला समाज अनेकदा आपल्याला फुकटचे सल्ले देत असतो की, आपण वेळ न घालवता पटकन गोष्टी शोधल्या पाहिजेत. एखादे मोठे क्षेत्र निवडावे, नोकरी करावी, व्यवसाय करावा, अधिक कमावावे, प्रगती करावी. अपेक्षांची ही ‘ट्रेडमिल’ बरेचदा थकवणारी असू शकते. जेव्हा आपल्याला कोणती दिशा निवडायची, हे सूचत नाही, तेव्हा येणारा दबाव हा चिंता किंवा निराशेच्या गर्तेत नेऊ शकतो. तेव्हा स्वतःचा पाठलाग करणे केवळ एक पर्याय उरत नाही, तर ती एक गरज बनते. कार्ल युंग या स्विस मानसशास्त्रज्ञाने उद्धृत केले आहे की, “जो बाहेर पाहतो, तो स्वप्न पाहतो, जो आत पाहतो, तो जागा होतो.”
एकूणच स्वतःचा पाठलाग करणे म्हणजे स्वतःला अंतर्मुख करणे. इतरांच्या स्वप्नांच्या मागे जाण्यापेक्षा स्वतःच्या वास्तवाकडे जागे होणे. स्वतःला अंतर्मुख करणे म्हणजे, स्वतःच्या वैयक्तिक वाढीसाठी आणि सर्वांगीण विकासासाठी वेळ, मनःपूर्वक प्रयत्न व श्रद्धा यांचे समर्पण. जेव्हा आपण आत्मविकासात गुंततो, तेव्हा आपण केवळ आपले जीवनच समृद्ध करत नाही, तर आपले अर्थपूर्ण ध्येय व दिशा शोधण्याचा पायादेखील रचतो.
आयुष्यात तुमचे काम परिपूर्ण असणे शक्य नाही. ते फक्त प्रामाणिक असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही स्वतःला समजून घेण्यात आपला अमूल्य वेळ गुंतवता, तेव्हाच ती प्रामाणिकता उदयास येते. त्या प्रामाणिकतेत, कधी तुमचे भय असेल, कधी तुमची स्वप्ने असतील, तुमचे सत्यही असेल. कदाचित ते सत्य तुमची ऊर्जा मर्यादित करेल, तर कधी तुम्हाला भरारी घेण्यास उद्युक्त करेल. आयुष्याचा संपूर्ण मार्ग लगेच उघड होईल, अशी अपेक्षा करणे वास्तवाशी फारकत घेणारे ठरते. खरं तर, जीवन हा एक अनेक चढ-उतारांनी, बर्या-वाईट अनुभवांनी आणि शिकवण्यांनी भरलेला प्रवास आहे. जेव्हा आपण स्वतःकडे वळतो, अंतर्मुख होतो, आत्मपरीक्षण करतो, आपली मूल्ये, प्रेरणा, कमकुवतपण व बलस्थानं समजून घेतो, तेव्हा एक अंतर्गत पाया घडवतो, जो आपल्याला दूरवर साथ देतो.
या सर्व प्रवासाला सविस्तर अर्थ आहे. जरी तुम्हाला अगदी उद्या तुमची स्वप्नातील नोकरी किंवा पुढच्या महिन्यात तुमचे जीवनाचे आवाहन सापडले नाही, तरीही तुम्ही स्वतःला समजून घेण्यात घालवलेला वेळ कधीही वाया जात नाही. खरं तर, तुम्ही केलेली ही अंतर्मुखतेची प्रक्रिया भविष्यासाठी एक मजबूत पाया घालत पुढे आपल्या निर्णयांना दिशा देतो, आपल्या आवडीनिवडी स्पष्ट करतो. कधी काळी अंधारात झाकोळलेले भविष्य निरभ्र आकाशासारखे आपोआप स्वच्छ होते. स्वतःवर केलेले हे शांत, पण सखोल संस्करण म्हणजे जणू बीजाची जमिनीतली पेरण्याची तयारी. जेव्हा वेळ येते, तेव्हा त्यातून अंकुर फुटतो, झाड फोफावते आणि फळही येते. पण, आधी त्या वैचारिक मातीची मशागत, आंतरिक गोंधळाची स्वच्छता आणि आस्थेने घेतलेली काळजी आवश्यक असते. तुमच्या हृदयातील न सुटलेल्या सर्व प्रश्नांबद्दल धीर धरा आणि प्रश्नांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करा. खरे तर, ते प्रश्न आत्ताच जगायला लागा. मग कधीतरी ते प्रश्न तुमच्यावर दबाव न आणता तुम्हाला हळूहळू उत्तराच्या दिशेने घेऊन जातील. जेव्हा तुम्ही तुमच्या गरजा, इच्छा आणि क्षमता यांच्याबाबत अधिक सुसंगत होता, तेव्हा योग्य मार्ग आपोआप उलगडू शकतो. या प्रक्रियेवर विश्वास ठेवा आणि संयम बाळगा. तुम्ही ज्या जीवनप्रवासाच्या स्पष्टतेचा शोध घेत आहात, ती बहुतांशी वेळा अनपेक्षित क्षणी प्रकट होते.
अनेक लोकांनी स्वतःवर लक्ष केंद्रित केल्यावर त्यांना नव्या आवडी आणि संधी उलगडल्या. माझ्या थेरपीतील एक तरुणी, कॉम्प्युटर सायन्स शिकत असूनही अस्वस्थ होती. एका जुन्या वहीतील स्वतःची रेखाचित्रं पाहून तिने पुन्हा स्केचिंग सुरू केलं, डिजिटल आर्ट शिकली आणि आता स्वतंत्र ग्राफिक डिझायनर झाली. दुसरा तरुण भविष्याच्या अनिश्चितीने सतत सोशल मीडियावर वेळ घालवायचा, पण एकदा गावात गेल्यावर त्याने टिपलेले निसर्गाचे सुंदर फोटो मित्रांनी इतरांना शेअर केले. त्यातून त्याला स्वतःचं फोटोग्राफीचं आकर्षण कळलं आणि आज तो समाधानाने छोटासा फोटोग्राफी व्यवसाय करतो. हे सगळ्यांनाच जमते असे नाही. कारण, त्यासाठी स्वतःचा पाठलाग करणे सूचायला आणि जमायला लागते. ते सर्वांना जमेल असे नाही, पण जमवून घेतल्यास आयुष्य बदलते.
महान मनाचे सर्वांत वैशिष्ट्यपूर्ण लक्षण म्हणजे, सृजनात्मक निवडणे आणि ते आयुष्यभर जोपासणे. शक्ती आणि दृढनिश्चयासह एका महान निर्णायक ध्येयाचा पाठलाग करणे. व्यापक वाचा-तत्त्वज्ञान, संस्मरणे, मानसशास्त्र यांचे वाचन केवळ इतरांबद्दलच नव्हे, तर स्वतःबद्दलही प्रगल्भ समज विकसित करण्यास मदत करते. सततच्या बाह्य गोंगाटापासून थोडा वेळ स्वतःला दूर ठेवा आणि अंतर्गत शांततेचा सराव करा. कारण, येथेच ती प्रभावी जागा आहे, जिथे तुमचे आंतरिक विचार आणि भावना स्पष्टपणे समोर येतात. स्वतःची इतरांशी तुलना करणे थांबवा. कारण, इतरांची ‘टाईमलाईन’ ही तुमच्या जीवनाच्या आराखड्याशी जुळत नाही. तुमचा प्रवास हा पूर्णपणे तुमचाच आहे आणि त्याला स्वतःच्या गतीने व दिशेनेच करावा लागतो. ऐहिक यशाच्या बाह्य मापदंडात हरवलेल्या आपल्याला खरे तर काय हवे आहे, हे जाणूनही ते मान्य करण्याची हिंमत नसते. त्यामुळे स्वतःशी प्रामाणिक राहणे, म्हणजेच खरी प्रगती. जेव्हा तुम्ही तुमच्या अस्सल अस्तित्वाशी जोडलेले असता, तेव्हा सर्जनशील आणि उचित निर्णय घेणे सुलभ होते. म्हणून, जर तुम्हाला आज काय करायचे हे माहीत नसेल, तर अंतर्मुख व्हा. आत्मचिंतन करा. या सगळ्याचे अंतिम बक्षीस म्हणजे, स्वतःवर विश्वास. मग तुम्हाला बाहेरून मान्यतेची गरज भासत नाही आणि तुम्ही स्वतःच्या मार्गावर आत्मविश्वासाने चालू लागता.
डॉ. शुभांगी पारकर