सिगारेटच्या धुरामुळे दादरमधील रहिवासी त्रस्त, शेवटी लावावे लागले 'नो स्मोकिंग'चे फलक

    28-Jul-2025
Total Views |

मुंबई : गेल्या दोन वर्षांपासून मुंबईतील दादर पश्चिम येथील इंद्रवदन को-ऑप. हाउसिंग सोसायटीच्या आजूबाजूला सतत धुम्रपान चालू असल्याने लोक त्रस्त झाले होते. सोसायटीशेजारी एक कार्यालय आणि मॉल असून तिथे काम करणारे लोक दिवसभर सिगारेट ओढण्यासाठी सोसायटीच्या कुंपणाजवळ येतात. त्यांच्या धुराचा त्रास सोसायटीच्या प्रत्येक घरात जाणवतो. खिडक्या बंद करूनही धूर घरात येतो, त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना विशेष त्रास होतो. त्यामुळे सोसायटीतील रहिवाशांनी आता आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे.

रहिवाशांनी सुरुवातीला संयम बाळगला. त्यांनी कोणताही वाद न करता हा त्रास सहन केला. मात्र, आता परिस्थिती असह्य झाली आहे. घरात ताजी हवा येतच नाही, खिडक्या उघडल्या की सिगारेटचा धूर आत शिरतो. लहान मुलांच्या श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत. काहींना फुफ्फुसांचे आणि हृदयाचे त्रास होण्याची भीती वाटते आहे. त्यामुळे सोसायटीने पुढाकार घेऊन इमारतीच्या बाहेरील भिंतीवर “नो स्मोकिंग झोन” असे रंगवून घ्यायला लागला आहे. आधी फक्त लहान सूचना लावण्यात आल्या होत्या, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही म्हणूनच आता कठोर पावले उचलली जात आहेत.

सोसायटीच्या सचिव अर्चना जोशी म्हणाल्या की, "आमच्या विनंतीकडे कोणीही लक्ष देत नाही. बाहेर काम करणारे कर्मचारी आमच्या सांगण्याकडे दुर्लक्ष करतात. त्याच सोसायटीचे सदस्य अशिष बापट यांनी सांगितले की, धूर रोज घरात येतो. त्यामुळे दरवाजे आणि खिडक्या सतत बंद ठेवाव्या लागतात. यामुळे घरात दमटपणा तयार होतो ज्यामुळे आजार पसरण्याची शक्याता वाढते आहे."

आता सोसायटीने बीएमसी आणि पोलिसांकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक जागेत धुम्रपान करण्यास बंदी असूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे. काही लोक चहा आणि सिगारेट घेण्यासाठी गॅस पाइपलाइनच्या जवळ उभे राहतात, ज्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते. रहिवाशांची मागणी आहे की पोलिसांनी या ठिकाणी तत्काळ कारवाई करून धुम्रपान रोखावे. बीएमसीने या परिसरात “नो स्मोकिंग” झोन घोषित करून दंडात्मक कारवाई सुरू करावी.