शास्त्रीय संगीताचं संचित सर्व भाषांमध्ये पोहोचायला हवं: कौशल इनामदार
मान्यवरांच्या उपस्थितीत अतिंद्र सरवडीकर यांच्या पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न.
27-Jul-2025
Total Views |
मुंबई : "अतिंद्र सरवडीकर यांच्या ग्रंथांचा विचार करायचा झाल्यास आपल्याला असं लक्षात येईल की प्राचीन परंपरेचे असलेलं नवं नातं यातून उलगडते. आपल्या शास्त्रीय संगीताचे हे संचित सर्व भाषांमध्ये, सगळीकडे पोहोचायला हवं" असे प्रतिपादन संगीतकार कौशल इनामदार यांनी केले. रवींद्र नाट्यमंदिर येथील पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्यात ते बोलत होते.
दि. २६ जुलै रोजी, प्रभादेवी इथल्या रवींद्र नाट्यमंदिरातील, लघु नाट्यगृहात सुप्रसिद्ध गायक डॉ. अतिंद्र सरवडीकर रचित २५५ रागदारी बंदिशींचा संग्रह , 'रागमुद्रा' आणि किराणा घराण्याच्या परंपरेवर आधारित 'Kirana Gharana Tradition evolution and changing trends' या दोन ग्रंथांचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. ज्येष्ठ गायक पंडित अरुण कशाळकर, संगीतकार कौशल इनामदार, प्राध्यापक कुणाल इंगळे, प्रकाशक प्रसाद कुलकर्णी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा आगळ्या वेगळ्या पुस्तकांच्या प्रकाशनाचा सोहळा संपन्न झाला. यावेळी अतिंद्र यांना पाठीवर कौतुकाची थाप देत पंडित अरुण कशाळकर म्हणाले की प्रत्येक गायकाने एकदा तरी किराणा घराण्याचं गाणं शिकावं, या घराण्याची गायकी सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवी. अतिंद्र याने केलेलं हे काम अतिशय कौतुकास्पद आहे. संस्कार प्रकाशनचे प्रसाद कुलकर्णी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की " अतिंद्र यांनी अत्यंत वेगवेगळ्या विषयांवर या बंदिशी रचले आहेत, या सर्व दूर पोहोचाव्यात असा आमचा विचार आहे. लेखकाबरोबरच भाषांतरकाराचे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे काम यामध्ये केले आहे." असे म्हणत त्यांनी किराणा घराण्याचे मूळ मराठीतील पुस्तक इंग्रजीत अनुवाद करणारे आशय गुणे यांचे सुद्धा कौतुक केले. मुंबई विद्यापीठातील संगीत विभागाचे प्राध्यापक कुणाल इंगळे म्हणाले की हा पुस्तकांचा एक अमूल्य ठेवा आहे, तू लोकांपर्यंत पोहोचायला हवा, त्यामुळे संगीताचा वारसा अजून समृद्ध होईल. संगीतकार कौशल इनामदार यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की " अभिजात संगीतामध्ये आपल्याला संगीताची प्रक्रिया ऐकायला मिळते. एका प्रकारे ही अतिंद्र यांची शोधयात्रा आहे, ज्यामध्ये त्यांना शास्त्रीय संगीतातील नवीन गोष्टी सापडल्या. आपल्या संस्कृतीचा, हा अमूल्य वारसा उत्तरोत्तर समृद्ध करणे, वेगवेगळ्या प्रदेशातील लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे" असं सुद्धा ते म्हणाले.