
भाषा आणि भाषेवरून होणारे वाद हा सध्या सगळीकडे गाजणारा विषय. भाषा हे केवळ संवादाचे माध्यम नसून, भाषा ही संस्कृतीची वाहक आहे. साहित्य, संगीताच्या प्रांतापासून ते अस्मितेच्या राजकारणापर्यंत, भाषा ही सर्वव्यापी असते. परंतु, असं असूनसुद्धा भाषेच्या विचारविश्वाची खोली अद्याप आपल्याला गवसली नाही. भाषा म्हणजे केवळ शब्द नाही, त्या शब्दांच्या अंतरंगातसुद्धा अनेक पैलू आपल्याला सापडतात. भाषा विश्वात आपण जितके खोल जाऊ, तितका हा समुद्र आपल्या आकलनाच्या टप्प्यात येईल. यासाठीच भाषाशास्त्र शाखेचा विचार अत्यंत महत्त्वाचा असतो. या शाखेचा वारसा उत्तरोत्तर समृद्ध होत राहावा, म्हणून जगाच्या पाठीवर अनेक भाषाशास्त्रज्ञ कार्यरतही असतात. पुढच्या पिढीमध्येसुद्धा भाषेविषयी कुतूहल निर्माण होण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात, शिष्यवृत्तीसुद्धा दिली जाते. अशीच एक स्पर्धा म्हणजे ‘इंटरनॅशनल लिंग्विस्टिक ऑलिम्पियाड.’ यावर्षी पहिल्यांदाच ही स्पर्धा आयोजित करण्याचा मान तायवानला मिळाला आहे. या स्पर्धेत तब्बल ४३ राष्ट्रांनी भाग घेतला असून, जगभरातून ४०० पेक्षा अधिक विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. तैवान या देशामध्ये एक-दोन नव्हे, तर तब्बल १६ भाषा बोलल्या जातात. तैवानमधल्या शिक्षणमंत्र्यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, तिथे बहुभाषिकता आणि बहुसांस्कृतिकतेला उत्तेजन दिलं जातं. भाषेशी निगडित स्पर्धांच्या माध्यमातून, दोन वेगवेगळ्या संस्कृती एकत्र येतात, एकत्र नांदतात आणि विचारांची देवाणघेवाणही होते हे महत्त्वाचं.
‘इंटरनॅशनल लिंग्विस्टिक ऑलिम्पियाड’ची सुरुवात १९६५ साली रशिया येथे झाली. आल्फ्रेड झुरिन्स्की या भाषातज्ज्ञाच्या पुढाकाराने, हा उपक्रम सुरू करण्यात आला. १९८० दशकात या स्पर्धेने कात टाकली आणि सीमा ओलांडल्या. उत्तर युरोपातील वेगवेगळ्या राष्ट्रांच्या सहभागातून ही स्पर्धा मोठी होत गेली. विद्यार्थ्यांमध्ये भाषाविज्ञानाची आवड निर्माण करणे, विविध भाषांच्या रचनात्मक वैशिष्ट्यांविषयी विद्यार्थ्यांची समज वाढवणे आणि त्यांच्यातील विश्लेषणात्मक विचारसरणीचा विकास करणे, हा या स्पर्धेमागचा मूळ उद्देश.
भाषाशास्त्राला वेगवेगळे अंग असतात, ज्यांच्या माध्यमातून भाषेचा विचार आपल्यापर्यंत पोहोचतो. यातील काही प्रमुख भाग जसे की ध्वनिशास्त्र, आकारविज्ञान, शब्दार्थशास्त्र, वायरचना, समाजभाषाशास्त्र इत्यादी शाखांच्या माध्यमातून, काही खेळ तयार केले जातात. एका विशिष्ट कालावधीमध्ये स्पर्धकांना त्यातील कोडी सोडवायची असतात. वैयक्तिक आणि संघ अशा दोन्ही स्तरावर हे खेळ खेळले जातात. यातला गमतीचा भाग म्हणजे, २० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या स्पर्धकांना यामध्ये सहभागी होता येत नाही. ही स्पर्धा प्रमाणापेक्षा गुणवत्तेवर जास्त भर देते, म्हणूनच प्रत्येक राष्ट्रातून बर्याचदा एक किंवा दोनच विद्यार्थ्यांचीच या स्पर्धेसाठी निवड होते. ‘इंटरनॅशनल लिंग्विस्टिक ऑलिम्पियाड’च्या माध्यमातून भाषेतील विविधता, त्याचसोबत भाषाविषयक संधी नेमया कुठल्या आहेत, याची माहिती दिली जाते. किंबहुना अशा जागतिक स्पर्धेचा भाग झाल्यानंतर, आपसूकच भाषा विश्वाचे भलं मोठं दालन या विद्यार्थ्यांसाठी खुलं होतं. इथपर्यंत सगळ्या गोष्टी आपल्याला सकारात्मक जरी वाटत असल्या, तरी या स्पर्धेत सामील होणार्या लोकांच्या, समूहाच्या काही अडचणीसुद्धा आहेत. शैक्षणिकदृष्ट्या भाषेचं आकलन वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. यामुळे स्पर्धेत सहभागी झाल्यावर भाषाशास्त्राच्या दृष्टीने काही मुद्दे जरी प्राथमिक असले, तरीसुद्धा बर्याचजणांना ते ज्ञात नसतात. या अडचणी सोडल्यास, ही स्पर्धा भाषेविषयी एक वेगळा दृष्टिकोन आपल्याला देऊन जाते हे नक्की.
आपण जी भाषा बोलतो, ती आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग असते. आपल्या जन्मापासूनच आपली नाळ भाषेशी जोडली गेली आहे. आपल्या जीवनात ज्याप्रकारे स्थित्यंतरं येतात, अगदी त्याच प्रकारे आपल्या भाषेच्या आकलनाच्या प्रवासातसुद्धा अनेक वेगवेगळे टप्पे येतात. यातून आपला जीवनप्रवास अधिकाधिक समृद्ध होत जातो. मात्र, असे असूनसुद्धा भाषेच्या खोल डोहात आपण फारसे जात नाही. वास्तविक, आपली भाषा आपल्याला जेवढे तारून नेते, तेवढा अन्य कुठलाही घटक समाजजीवनाचे ओझं उचलत नाही. आज भाषा हा काहींसाठी राजकारणाचा विषय आहे, तर काहींसाठी नव्या शोधांचा आणि नव्या तंत्रांचा. अंतिमतः आपला उत्कर्ष नेमका कशात आहे, हे प्रत्येक व्यक्तीने ज्याचं त्याचं ठरवावं.