कीर्तनकार घडविणाऱ्या ‘अस्मिता’

    27-Jul-2025   
Total Views |

कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन आणि नैतिक शिक्षण दिले जाते. हीच कीर्तनपरंपरा जपण्याबरोबरच कीर्तनकार घडविण्याचे व्रत अंगीकारलेल्या अस्मिता देशपांडे यांच्याविषयी...

अस्मिता यांचा जन्म दि. २३ मे रोजी १९६० रोजी, अहिल्यानगर येथे झाला. त्यांची आई सुलभा या जुन्नरच्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षिका होत्या आणि वडील अनंत टाकळकर हे जुन्नर येथील हायस्कूलमध्ये शिक्षक होते. आईवडील आणि अस्मिता यांची एक बहीण आणि एक भाऊ, असे पाचजणांचे कुटुंब जुन्नर येथे राहत होते. अस्मिता यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण जुन्नर येथेच झाले. अस्मिता दहावीत असताना त्यांच्या डोयावरील वडिलांचे छत्र हरपले. त्यांच्या वडिलांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या कौटुंबिक आघातामुळे अस्मिता यांचे आयुष्यच बदलून गेले. आई नोकरी करत होती, त्यामुळे तिने मुलांचे पालनपोषण केले. पण, मुलीची जबाबदारी असल्याने त्यांनी अस्मिता यांचे लवकरच लग्न ठरविले. पण, लग्न ठरविताना त्यांच्या सासरच्या मंडळींना तिचे शिक्षण पूर्ण कराल, अशी अट घातली होती. सासरीही अस्मिता यांच्या शिक्षणाला पोषक असेच वातावरण होते. त्यामुळे त्यांनी लगेचच अट मान्य केली आणि १९७९ साली त्यांची अरूण देशपांडे यांच्याशी लग्नगाठ बांधली गेली. अरूण हे ‘बँक ऑफ इंडिया’मध्ये नोकरी करत होते. लग्नानंतर अस्मिता या डोंबिवलीकर झाल्या. अस्मिता यांनी बारावीनंतर संगमनेरमध्ये ’एफवायबीए’ पर्यंतचे शिक्षण घेतले होते पण, लग्नानंतर डोंबिवलीत आल्यावर त्यांना मुंबई विद्यापीठातून शिक्षण घ्यावे लागणार होते. त्यामुळे त्यांना पुन्हा ‘एफवायबीए’चे शिक्षण घ्यावे लागले. अस्मिता यांनी बारावीच्या गुणांवर पुन्हा ‘एफवायबीए’साठी प्रवेश घेतला. पुढे त्यांनी लग्नानंतर ‘बीएससी’चे शिक्षण उल्हासनगर आणि ठाणे महाविद्यालयातून पूर्ण केले. परळच्या शिरोडकर महाविद्यालयातून त्यांनी ‘बीएड’चेही शिक्षण घेतले. नागपूर विद्यापीठातून ‘बीए कीर्तनशास्त्र’ या विषयात पदवी घेताना, डोंबिवली केंद्रातून प्रथम येण्याचा मानही त्यांनी मिळविला. १९८५ मध्ये त्यांना. आंबिवलीतल्या विनाअनुदानित शाळेत नोकरी मिळाली. दोन वर्षे नोकरी केल्यानंतर त्यांनी, १९८७ मध्ये स्वामी विवेकानंद विद्यामंदिरात माध्यामिक विभागात शिकवण्यास सुरुवात केली. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना त्या गणित आणि विज्ञान विषय शिकवत होत्या. नोकरी करत असताना संस्थेच्या विविध कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम, व्याख्यान, कथाकथन, स्काऊट गाईड याशिवाय नाटकातून भूमिकाही त्यांनी पार पडल्या आहेत. तसेच, त्यांनी गाण्याच्याही दोन परीक्षाही दिल्या. दत्तनगर येथे स्काऊट गाईड ठाणे जिल्हा खजिनदार म्हणून, त्यांनी तीन वर्षे काम सांभाळले. शाळेच्या विष्णुनगर शाखेत असताना, शासनाकडून आदिवासी विभागातील विद्यार्थ्यांच्या गायन, समूहगायन इत्यादी स्पर्धांचे परीक्षक म्हणूनही त्यांनी काम केले. त्यामध्ये जव्हार, वाडा आणि मोखाडा इत्यादी आदिवासी पाड्यांचा समावेश होता. शाळेत नोकरी करत असतानाच ‘गीता धर्म मंडळां’ची गीतेची परीक्षाही त्यांनी दिली, त्यातही अस्मिता यांनी डोंबिवलीतून प्रथम व महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक प्राप्त केला. २०११ साली त्यांनी भागवताचा अभ्यास करण्यासाठी स्वेच्छा निवृत्ती घेतली. अस्मिता यांचे सासरे कीर्तनकार होते. अस्मिता यांचे वकृत्व चांगले असल्याने, सासर्यांनी अस्मिता यांना कीर्तन शिकण्याचा सल्ला दिला होता पण, तेव्हा अस्मिता यांनी ते फारसे मनावर घेतले नाही. तसेच, त्यांना गाण्याचीही भीती वाटत असे पण, ते गेल्यावर अस्मिता यांना कीर्तन करावेसे वाटू लागले आणि त्यांनी कीर्तनात ‘बीए’ पदवी घेतली. त्यांच्या सासर्यांची २१ वाड्मय पुस्तके होती, त्यांचाही अस्मिता यांनी अभ्यास केला. सासर्यांचे कीर्तनही त्यांनी अनेकदा ऐकले होतेच, त्यामुळे त्यांचा हा प्रवास सोपा झाला. कीर्तनात पदवी घेतल्यानंतर त्या कीर्तन करू लागल्या. दरम्यानच्या काळात त्यांनी भागवत सप्ताह ऐकला आणि त्यांना कीर्तनाची गोडी लागली. सध्या अस्मिता यांचा ३२वा भागवत सप्ताह डोंबिवलीतील साई मंदिरात सुरू आहे. डोंबिवलीतील ‘कीर्तन कूल संस्थे’च्या त्या अध्यक्षा आहेत. या संस्थेच्या माध्यमातून, कीर्तनकार घडविण्याचे काम अविरत सुरू आहे. याशिवाय संस्थेतर्फे अनेक महोत्सवांचेही आयोजन केले जाते. नुकताच आषाढी एकादशीनिमित्त त्यांनी ‘आषाढी महोत्सव’चे आयोजन केले होते. सासर्यांचा कीर्तन कलेचा हा वारसा अस्मिता पुढे चालवत असल्याने, त्यांच्या पतींनाही अस्मिता यांचा अभिमान वाटतो. त्यांच्या या कामात त्यांना घरातून पूर्णपणे सहकार्य मिळते. अनेकदा कार्यक्रमानिमित्त त्यांना आठ-आठ दिवस घराबाहेर राहावे लागते. त्यावेळी घराची जबाबदारी त्यांचे पती अरूण पाहतात. आता त्यांच्या दोन्ही मुलींची लग्न झाल्याने, त्यांच्यावर फारशी जबाबदारी नाही. त्यामुळे या वयात त्या आपला छंद जोपासत आहेत. आतापर्यंत त्यांनी कीर्तनाचे ६०० कार्यक्रम केले असून, प्रवचनांचे २०० हून अधिक कार्यक्रम झाले आहेत. कथाकथनांचे ३० ते ३५ कार्यक्रम अस्मिता यांनी केले आहेत. श्रीमद्भागवत सप्ताहाचा आता ३२वा कार्यक्रम सुरू आहे. भागवत सप्ताहाचे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर कार्यक्रम त्या करतात. त्यांना शाहिरी कीर्तन, उज्जैन येथे २००९ साली ‘कीर्तनरत्न’ आणि पुणे येथे २०१२ साली ‘कीर्तनालंकार’ याशिवाय २०२४ साली कोल्हापूर येथे शंकराचार्य यांच्या हस्ते ‘ज्येष्ठ महिला कीर्तनकार’ अशा अनेक पुरस्कारांनी गौरवान्वित करण्यात आले आहे. या पुढील काळात रामायणावर आधारित कार्यक्रम करण्याचा अस्मिता यांचा मानस आहे. अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा!