रेल्वे सुविधांचे जागतिक महत्त्व

Total Views |

जागतिक रेल्वे उद्योग सध्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर उभा आहे. रेल्वे क्षेत्रासमोर प्रवाशांच्या अपेक्षांचा डोंगर वाढतो आहे आणि तांत्रिक एकात्मतेची तीव्र गरज निर्माण होताना दिसते. रेल्वे ऑपरेशन्सचे स्वरूप बदलण्यात आणि प्रवाशांच्या अनुभवांमध्ये वाढ करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), ‘इंटरनेट ऑफ थिंग्ज’ (आयओटी), सेन्सर तंत्रज्ञान आणि ‘बिग डेटा’ यांसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान रेल्वे क्षेत्रात क्रांती घडवू शकते. रेल्वे उद्योग जुन्या पायाभूत सुविधा, वाढत्या मागणी आणि सुरक्षामानकांशी झुंजत असताना, या तंत्रज्ञानाचा वापर कार्यक्षमता आणि ग्राहक समाधानाच्या नवीन युगासाठी आशादायी ठरतो आहे.

‘एआय’, ‘आयओटी’ आणि ‘प्रेडिक्टिव्ह मेन्टेनन्स’सारखे तंत्रज्ञान रेल्वे क्षेत्रातील प्रमुख साधने म्हणून उदयास आले. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून रेल्वे उत्पादक प्रभावीपणे ‘ऑपरेशन्स ऑप्टिमाईझ’ करू शकतात. यातूनच प्रवाशांची सुरक्षितता वाढवू शकतात आणि प्रवाशांचे अनुभव सुधारू शकतात. विविध शक्यतांना आकार देत असताना नवीन आणि विकसनशील तंत्रज्ञानाचा वापर करणे, रेल्वे प्रवास अधिक कार्यक्षम आणि फायदेशीर बनवण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकते. डिस्प्ले सिस्टमसारख्या ऑनबोर्ड तंत्रज्ञानाची यामध्ये मोठी भूमिका आहे, ज्यामध्ये पारंपरिक ऑनबोर्ड मॉनिटर्सना पर्याय म्हणून उच्च ब्राईटनेस कॉम्पॅक्ट प्रोजेक्टर विकसित करण्यात येत आहेत.

जगभरातील सर्व सरकार रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक करत आहेत, जी विश्वासार्ह आणि सुरक्षित वाहतूक जाळ्यासाठी त्या देशांची सामायिक वचनबद्धता दर्शवते. विविध भार हाताळण्यासाठी सतत देखभाल आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणेदेखील आवश्यक आहे. पायाभूत सुविधांमधील बिघाडांमुळे लक्षणीय आर्थिक नुकसान होऊ शकते. यामुळे प्रवासी आणि मालवाहतूक सेवांमध्ये व्यत्यय निर्माण होऊ शकतो. यामुळे जगभरातील प्रवासी, व्यवसाय आणि अर्थव्यवस्था प्रभावित होतात. अशा व्यत्ययांमुळे रेल्वे सेवांवरील जनतेचा विश्वास कमी होतो. विश्वासार्हता आणि कार्यक्षमतेसाठी उद्योगाची प्रतिष्ठा कमी होते. ‘रेल डिलिव्हरी ग्रुप’च्या 2019 सालच्या अहवालात असे नमूद केले आहे की, पायाभूत सुविधांच्या बिघाडांमुळे युके रेल्वे उद्योगाला तब्बल एक अब्ज पौंडचे नुकसान झाले आहे. हे रेल्वे ट्रॅक चांगल्या स्थितीत ठेवण्याचे सार्वत्रिक महत्त्व अधोरेखित करते. म्हणून जगभरातील रेल्वे नेटवर्क सक्रिय देखभाल, पायाभूत सुविधांचे अपग्रेड आणि प्रगत देखरेख तंत्रज्ञानाचा अवलंब यांना प्राधान्य देताना दिसून येत आहे. व्यापक देखभाल कार्यक्रम आणि भविष्यसूचक देखभाल धोरणांमध्ये गुंतवणूक करून, जागतिक रेल्वे उद्योग भविष्यातील व्यत्यय कमी करू शकतो. ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवू शकतो आणि स्पर्धात्मकता वाढवू शकतो.

गेल्या दशकात रेल्वे नेटवर्कने रेल्वे नूतनीकरण करण्यासाठी विशेष ऑन-ट्रॅक प्लांट मशिनरीत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे उच्च दर्जाचे ट्रॅक बसवता येतात, ट्रॅकची स्थिरता सुधारते आणि एकूण सुरक्षितता आणि विश्वासार्हता वाढते. याव्यतिरिक्त, ट्रॅक नूतनीकरण पद्धती ट्रॅक लेआऊट सुधारून, संरेखन करून आणि वेग निर्बंध कमी करून वाढत्या प्रवासी आणि मालवाहतुकीच्या मागण्यांना सामावून घेऊन रेल्वेलाईनची क्षमता वाढवू शकतात. व्यस्त रेल्वे कॉरिडोर आणि शहरी भागांत जिथे व्यत्ययांचे महत्त्वपूर्ण आर्थिक आणि सामाजिक परिणाम होऊ शकतात, अशा ठिकाणी ट्रॅक नूतनीकरण प्रकल्प जलद पूर्ण केल्याने सेवा व्यत्यय कमी होतात. यामध्ये आणखी एक महत्त्वपूर्ण घटक म्हणजे, रेल्वेचे डबे जे थेट प्रवाशांशी संबंधित आहेत. रेल्वेच्या अंतर्गत सजावटीतील नवोपक्रम नेहमीच प्रवाशांच्या अनुभवाला अनुकूल असावा लागतो. परंतु, प्रवाशांच्या अनुभवातील गुंतवणूक आणि त्यामुळे वाढलेला प्रवास खर्च यामध्ये नेहमीच तडजोड असते. हे स्पष्ट आहे की, नवोपक्रम हा अजूनही या उद्योगाचा एक मोठा भाग आहे. जो सध्याच्या समस्या सोडवण्यासाठी आणि सुधारण्यासाठी तयार केल्या जाणार्‍या उपायांमधून दिसून येतो. तंत्रज्ञानातील प्रगती आणि बदलत्या प्रवाशांच्या अपेक्षांमुळे शाश्वतता आणि सुलभता रेल्वे प्रवास अधिक आरामदायी, पर्यावरणपूरक आणि सुलभ बनवत आहे. यातूनच जगभरात सोयीस्कर आणि शाश्वत वाहतूक पर्याय शोधणार्‍या प्रवाशांसाठी रेल्वे हा वाहतूक हा पसंतीचा मार्ग बनत आहे.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.