सदा विवेकानंदमय : डॉ. सुरेश शास्त्री

    26-Jul-2025   
Total Views |

रुग्णांचा केवळ दृष्टिदोषच दूर न करता, अनेकांना ‘विवेक दृष्टी’ देऊन मनुष्यनिर्माणाचे व राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे कार्य करणार्‍या डॉ. सुरेश शास्त्री यांच्याविषयी...

घरी रा.स्व. संघाचेच वातावरण! वडील भागानगर सत्याग्रहातील स्वातंत्र्यसैनिक. नागपूर नगराचे अनेक वर्षे घोषप्रमुख. गुळवणी महाराजांचे दिक्षित शिष्य. राष्ट्रीय आणि आध्यात्मिक असे दोन्हीही संस्कार घरातूनच झालेले. वैद्यकीय क्षेत्रातील त्या वेळची सर्वोच्च पदवी एम.एस (नेत्ररोगतज्ज्ञ), त्यावेळच्या मराठवाडा विद्यापीठातून सर्वोच्च गुण प्राप्त करून मिळवलेली. इतकी उच्च गुणवत्ता असतानाही, मोठ्या शहरात वैद्यकीय सेवा न करता छोट्या गावातच करायची, हे त्यांचे पहिल्यापासूनच ठरलेले. त्यानुसार 1983 साली मालेगावला नेत्रसेवा सुरू केली. अत्यंत सचोटीची आवश्यक सेवा आजपावेतो 42 वर्षे होत आहेत. गेल्या 42 वर्षांहून अधिक काळ वैद्यकीय सेवेतून त्यांनी रुग्णांचा केवळ दृष्टिदोषच नाहिसाच केला नाही, तर अनेकांना ‘विवेक दृष्टी’ देऊन मनुष्य निर्माणाचे व राष्ट्राच्या पुनरुत्थानाचे महान समाजिक कार्यही केले.

डॉ. सुरेश शास्त्री असे त्यांचे नाव असून, त्यांचे कार्य प्रतिपदेच्या चंद्रकलेप्रमाणे सतत वृद्धिंगत होत आहे. त्यांचं जीवन ध्येय रुग्णालयाच्या दर्शनी भागात कोरले आहे, ते म्हणजे “सर्वांसाठी दृष्टी, दृष्टीसाठी सर्व.” दृष्टीबरोबरच दृष्टिकोन देण्यावरही त्यांचा कटाक्ष असतो. रुग्णालयातील वार्डची नावे ‘धन्वंतरी कक्ष’, ‘चरक कक्ष’, ‘अश्विनी कक्ष’, तर ऑपरेशन थिएटरचा नामफलक ‘सुश्रुत शस्त्रक्रिया कक्ष’ असा आहेत. तपासणीच्या टेबलावर एक तिरंगी झेंडा ठेवलेला. डोळ्यांसाठी आहारात ‘:अ‘ जीवनसत्व आवश्यक आहे. ते कशात मिळेल हे सांगताना, ते या तिरंगी झेंड्याचा अत्यंत खुबीने उपयोग करून घेतात. केशरी रंग म्हणजे केशरी रसांची फळे, पांढरा रंग म्हणजे दुग्धजन्य पदार्थ आणि हिरवा रंग म्हणजे पालेभाज्या, इतकं सोपं करून ते प्रबोधन करत असतात. त्याचवेळी ते तिरंगी झेंड्याचे महत्त्वही अधोरेखित करून टाकतात. मालेगावात गरिबांच्या डोळ्यांचे डॉक्टर म्हणूनच ते ओळखले जातात. मालेगाव येथील ‘रोटरी आय हॉस्पिटल’च्या माध्यमातून त्यांनी हजारो रुग्णांवर शस्त्रक्रिया करून, त्यांना दृष्टिलाभ करून दिला आहे. मालेगावातील पहिली नेत्रदान शस्त्रक्रिया त्यांच्याच नावावर आहे. नेत्रदानाच्या जनजागृतीसाठी त्यांना ‘महाराष्ट्र नेत्रसंघटने’चा ‘टॅलेन्ट बियॉन्ड आप्थॉलमॉलॉजी’ हा सन्मानही मिळाला आहे.

अमेरिकेच्या मासिकातूनही त्यांचे नेत्रदानाचे लेख प्रकाशित झाले आणि लोकप्रियही ठरले. ‘शिवभावे जीवसेवा’ ही मालेगावातली पहिली ‘माणुसकीची भिंत’ त्यांनी 2017 साली सुरू केली. या प्रयत्नांची दखल डॉक्टरर्सच्या ‘अखिल भारतीय जर्नल’मधून घेतली गेली. सामाजिक कामातही त्यांचा नेहमीच सहभाग असतो. संघाचे विचार घराघरात व प्रत्येकाच्या मनामनात रुजवण्यासाठी, मालेगावात कार्यरत ‘भारतीय विचार मंच’ या संस्थेचे ते संस्थापक सदस्य आहेत. भारतीय कलाप्रकारांना वाहिलेली अभिजात शास्त्रीय प्रबोधिनी त्यांनी मालेगावात स्थापन केली. वैद्यकीय सेवा आणि सामाजिक काम सोडले, तर शास्त्रींचे बाकी सारे जीवनच ‘विवेकानंदमय’ राहिले आहे. ‘एमबीबीएस’ पदवी संपादन केल्यावर त्यांनी, त्यांच्या वडिलांचे संघातील सहकारी, विवेकानंद केंद्राचे शिल्पकार एकनाथ रानडे यांच्याशी पत्रव्यवहार करून, काही वर्षांसाठी विवेकानंद केंद्रात काम करण्याची मनिषा व्यक्त केली होती. त्यावेळी काही वर्षांसाठी सेवा देण्याची ‘सेवाव्रती’ ही योजनाच नव्हती. (ती आता विवेकानंद केंद्रात आहे.) केंद्राचे उत्तर आले, केंद्रात पूर्णवेळ जीवनव्रती ही पद्धत आहे, त्यामुळे तशी तयारी असल्यासच यावे. घरच्या जबाबदार्‍यांमुळे त्यांना ते शक्य नव्हते. मनात असूनही आपण विवेकानंद केंद्राला वाहून घेऊ शकत नाही, ही खंत होती. तशातच सप्टेंबर 1992 साली विवेकानंद भारत परिक्रमा मालेगावात आली, तो दिवस कर्मधर्म संयोगाने दि. 11 सप्टेंबर, विश्वबंधुत्व दिन, याच दिवशी स्वामीजींनी शिकागो सर्वधर्मपरिषदेत ते ऐतिहासिक भाषण दिले होते. परिक्रमेबरोबर आलेल्या, तेव्हाच्या विवेकानंद केंद्राच्या अध्यक्षा लक्ष्मीदीदी यांच्या उपस्थितीतच, आपल्या चार सहकार्‍यांसोबत शास्त्री डॉक्टरांनी मालेगावात विवेकानंद केंद्राची मुहूर्तमेढ रोवली. गेल्या 33 वर्षांत त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले. त्यातील काही आज अरुणाचल प्रदेशातील केंद्राच्या विद्यालयात, अध्यापनाची सेवा देत आहेत. विवेकानंद केंद्रात एस 4, सर्वांचा सर्वांशी सतत संपर्क, सेल्फ असेसमेंट सिस्टम, कोरोना काळात ‘विवेकानंद विचारदूत योजना’ या अभिनव योजना त्यांनी राबवल्या. देशातल्या विविध भागांत त्यांचे विवेकानंदांवर व्याख्याने होत असतात. लेखनाच्या माध्यमातून त्यांचे लेख देशविदेशात प्रसिद्ध झालेले आहेत.

‘कर्मयोगिनी निवेदिता’ आणि ‘विवेकानंद शोध शाश्वताचा’ ही दोन पुस्तके ‘विवेकानंद केंद्रा’तर्फे प्रकाशित करण्यात आलेली आहेत. वय 73 तरी तरुणालाही लाजवेल, असा त्यांचा उत्साह आहे. अजून बरंच काही करायच आहे. ‘सो मच टू डू, सो लिटील डन’ हीच त्यांची भावना. त्यांना पाहिले की, केंद्राच्याच एका गीताच्या ओळी आठवतात, “दिव्य ध्येय की ओर तपस्वी, जीवनभर अविचल चलता हैं!” डॉ. सुरेश शास्त्री यांना आगामी वाटचालीसाठी आणि दिर्घायुष्यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा!

9921976422

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.