आरोपी गोकूल झा याला २ दिवसांची पोलिस कोठडी -  रिसेप्शनीस्ट मारहाण प्रकरण

    26-Jul-2025   
Total Views |

कल्याण, रिसेप्शनीस्ट मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी गोकूळ झा याला मानपाडा पोलिस ठाण्यातील जुन्या गुन्ह्यात कल्याण न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

कल्याण पूर्वेतील एका रिसेप्शनीस्ट तरुणीला आरोपी गोकूळ झा याने बेदम मारहाण केली होती. त्याला प्रथम मानपाडा पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याला कल्याण न्यायालयात हजर केले गेले. न्यायालयाने प्रथम २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. ही पोलिस कोठडी संपूष्टात आल्यावर त्याला पुन्हा शुक्रवारी कल्याण न्यायालयात हजर केले गेले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. या घटनेपूर्वी मानपाडा पोलीस स्टेशन परिसरात एका तरुणावर चाकूने हल्ला केला होता. या प्रकरणी झा याच्या विराेधात मानपाडा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या प्रकरणात झा फरार होता. या गुन्ह्यामध्ये झा हा पोलिसांना हवा होता. मानपाडा पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याचा तपास करणयासाठी पोलिसांनी झा याचा ताबा न्यायालयाकडे मागितला होता.

१५ मे च्या मध्यरात्री आडिवली-ढोकळी भागातील तिरूपती भवन या बिल्डींगमध्ये पाणी सोडण्याचे काम करणा-या पिंटया डेव्हिड ( वय ४० ) याच्यावर क्षुल्लक कारणावरून गोकुळ आणि त्याच्या साथीदारांनी धारदार हत्याराने प्राणघातक हल्ला केला होता. या गुन्हयात गोकुळ हा फरार होता. जेव्हा गोकूळ याला रिसेप्शनीस्ट मारहाण प्रकरणात न्यायालयीन कोठडी मिळाली. तेव्हा मानपाड्यातील पिंट्या डेव्हीड याच्यावरील चाकू हल्ला प्रकरणातील तपास कामी मानपाडा पोलिसांनी झा याचा ताबा घेतला होता. त्याला या प्रकरणात शनिवारी पुन्हा कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या पोलिस कोठडी दरम्यान झा याच्या विरोधात आणखीन काही गुन्हे आहेत का ? याचा तपास केला जाणार आहे.