‘श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे’ बालकवींच्या या ओळी, आपल्या सगळ्यांनाच अगदी तोंडपाठ आहेत. श्रावण मास म्हटलं की, निसर्गाचं चैतन्यमय रूप आपल्याला अनुभवायाला मिळतं. दुसर्या बाजूला शक्तीची, भक्तीची आराधना करणारे उत्सव यावेळी समाजात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करतात. अशाच या चैतन्यमय ऋतूचे विधिधांगी पैलू उलगडणारी ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांची विशेष मुलाखत...
श्रावण या शब्दाचा मूळ अर्थ काय? ऋतूचक्राच्या दृष्टीने श्रावणाचे महत्त्व काय?आपला ज्या महिन्यांचा आकाशाशी संबंध आहे उदाहरणार्थ, चैत्र महिन्यात ’चित्रा’ नक्षत्र आकाशात पूर्वेला आपल्याला बघायला मिळते, त्याचप्रकारे श्रावण महिन्यात ’श्रवण’ नक्षत्र रात्री पूर्वेला उगवते आणि रात्रभर त्याचे आकाशात दर्शन होऊन पश्चिमेला मावळते. रक्षाबंधनाच्या दिवशी श्रावणी पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रातच असतो. हे आपल्या भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. महिन्यांच्या नावामध्येच आकाश दडलेला आहे. ऋतूचक्राच्या दृष्टीने बोलायचे झाल्यास, श्रावण महिन्यात धुवाधार पावसाची बरसात असते. त्यामुळे ऋतूंंचा आणि आपल्या सणांचा संबंध नक्कीच आहे. त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, श्रावणात सृष्टी तृप्त झालेली असते. अशा या ऋतूमध्ये निसर्गात आपण भ्रमंती केली पाहिजे.
श्रावण महिन्यात ग्रह-तार्यांची स्थिती अनुकूल असते का?ग्रह, तारे हे कुठल्याही महिन्यामध्ये अनुकूलच असतात परंतु, त्याचबरोबर ऋतू मात्र बदलत असतात. म्हणूनच पंचांग करताना, ऋतू आणि सणवार यांची सांगड घातली गेली आहे. प्राचीन काळी ज्या वेळेस पंचांगांची निर्मिती होत होती तेव्हा ऋषी मुनींना असे लक्षात आले की, सर्वांत महत्त्वाची गोष्ट काय, तर माणसाचे शरीराचे आरोग्य आणि मनाचे आरोग्य. आता शरीराचे आरोग्य कसं चांगलं राहील, जर ऋतूप्रमाणे आहार घेतला, तर चांगलं राहील. त्यामुळे सणांची रचना करतानासुद्धा, सणवार व ऋतू असा एक संयोग आपल्याला बघायला मिळतो. ज्यावेळी सण-उत्सव असतात, त्यावेळी माणसं एकमेकांना भेटतात, त्यांच्याशी संवाद साधतात, ज्यामुळे त्यांचं मानसिक आरोग्यसुद्धा चांगलं राहतं. आता आपले जे ऋतू आहेत, ते सूर्यावर अवलंबून आहेत आणि सण आहेत, ते चंद्रावर अवलंबून आहेत. म्हणून प्राचीन काळी ऋषींनी काही नियम बनवले. चांद्र-सौर पद्धतीचा मेळ आपल्या पंचांगामध्ये समाविष्ट करण्यात आला.
श्रावण मासातील पारंपरिकदृष्ट्या महत्त्वाची व्रतं कुठली?आपल्या मनावर नियंत्रण राहावे म्हणून, व्रतांची संकल्पना पुढे आली. एकभुक्त म्हणजे एकदाच जेवायचे, असे एक व्रत सांगितलेले आहे. पावसाळ्यात आपले चलनवलन कमी असते, म्हणूनच हलका आहार घ्यायचा, म्हणूनच उपवास करण्याचे सुद्धा व्रत सांगितले आहे. त्याचबरोबर यज्ञात जे आपण अर्पण करतो, तो भात सोडून इतर हलके पदार्थ आपण घ्यावेत. काही लोकं अत्यंत कडक उपवास करतात उदाहरणार्थ, पाणी पित नाही, तर तसे करू नये, अल्पाहार घ्यावा. आता वारांच्या अनुषंगाने बघायचे झाल्यास आपल्या लक्षात येईल की, वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळी व्रतं सांगितली आहे. उदाहरणार्थ, रविवारी आदित्यपूजन, सोमवारी भगवान शंकराचे पूजन, मंगळवारी मंगळागौरीचे व्रत, बुधवारी बुधपूजन, गुरुवारी ब्रहस्पतीपूजन सांगितले आहे. शुक्रवारी जराजिवंतिकापूजन, शनिवारी अश्वत्थ मारुतीपूजन संतती व आरोग्य चांगले राहावे, यासाठी हे पूजन सांगितलेले आहे. पूजन म्हणजे काय, तर या गोष्टींप्रति आदर व्यक्त करायचा व त्या आदर्शांचे गुण आपल्या अंगी यायला पाहिजे, यासाठी आपण प्रयत्न करायचा.
आहारशास्त्राच्या दृष्टीने श्रावणात काही पथ्य सांगितली जातात, त्या मागचा नेमका विचार काय आहे?श्रावण महिन्यातील आहारशास्त्राचा विचार आपल्या आरोग्याशी जोडला गेला आहे. श्रावणात पालेभाज्यांचे सेवन करणे, आरोग्यासाठी लाभदायक असते. त्याचबरोबर फळं नियमितपणे खावीत. शरीराला कुठल्याही प्रकारची व्याधी होता कामा नये, अपचन होता कामा नये, याची आपण काळजी घ्यायला हवी. श्रावण महिन्यात मांस-मच्छी खाऊ नये, असेसुद्धा सांगितले गेले आहे कारण, त्यातील जीवजंतू पोटात जाऊन आपलं आरोग्य बिघडू नये. या आहारशास्त्रामागचा कार्यकारणभाव हाच आहे की, आरोग्याचे संतुलन बिघडता कामा नये.
स्त्रियांचे आणि श्रावण मासाचे नाते कसे असते?प्राचीन काळी आपल्याकडे विवाह लवकर होत असतं. तत्कालीन समाजव्यवस्थेनुसार घरात तिचा बहुतांशी वेळ जायचा. त्या स्त्रीचं मन निरोगी राहावे, म्हणून तिला काही व्रतं सांगितली जात असे. मंगळागौरीपूजनाचं आपण जर उदाहरण घेतलं तर आपल्या लक्षात येईल की, स्त्रियांचे मन मोकळं होईल, त्या आनंदित होतील, म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. वेगवेगळ्या व्रतांच्या माध्यामातून एका बाजूला ईश्वराची उपासना केली जाते आणि दुसर्या बाजूला व्यक्तीच्या उत्कर्षाचं, त्याचं जीवन समृद्ध करण्याचासुद्धा हा विचार आहे. मी तर म्हणेन व्रतं ही केवळ स्त्रियांनी करायची गोष्ट नसून, पुरुषांनीसुद्धा करायला हवी.
उत्तर भारतात श्रावण आपल्यापेक्षा आधीच सुरू होतो. आपल्याकडे त्यानंतर काही दिवसांनी सुरू होतो. तेव्हा नेमका हा फरक काय आहे?श्रावण महिन्याच्या सुरुवातीबाबत उत्तर भारत आणि महाराष्ट्र (किंवा दक्षिण भारत) यामधील फरक, मुख्यतः पंचांगातील गणनेच्या पद्धतीवर अवलंबून असतो. उत्तर भारतामध्ये पूर्णिमांत महिने पाळले जातात आणि आपल्याकडे अमांत पद्धत पाळली जाते. आपल्याकडे आषाढ कृष्णपक्ष सुरू झाला की, त्यांच्याकडे श्रावण कृष्णपक्ष सुरू होतो. आम्ही पंचांगकर्ते या पंचांगाचे एकीकरण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आता गंमत अशी आहे की, भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला, तो श्रावण कृष्ण पक्षात परंतु, उत्तर भारतात तो भाद्रपद कृष्ण पक्ष असतो. आता आपल्याकडे भाद्रपद कृष्ण पक्ष हा श्राद्ध पक्ष म्हणून समजला जातो. उत्तर भारतात भाद्रपद कृष्ण अष्टमीला कृष्णाचा जन्म साजरा केला जातो परंतु, अधिकचा महिना बघताना पंचांगकर्ते अमांत पद्धत वापरतात, याचीसुद्धा आपण नोंद घ्यायला हवी.
श्रावण हा चातुर्मासामधील महत्त्वाचा महिना आहे. चातुर्मासात देव निद्रा घेण्यास जातात यामागचे शास्त्र काय आहे?
आपल्याकडे आषाढी एकादशीला आपण म्हणतो देवशयनी एकादशी, म्हणजे काय तर देव झोपतो आणि तो हा कारभार शंकराच्या हाती देतो, अशी आपल्याकडे समजूत आहे. आता लक्षात घ्या, उत्तर गोलार्ध हा देवांचा आणि दक्षिण गोलार्ध हा राक्षसांचा असं सांगितलं गेलं आहे. आता दि. २१ जून रोजी सूर्य कर्कवृत्तावर येतो. दि. २१ जून रोजी आपल्याकडे दिवस मोठा असतो, त्याच सुमाराला आषाढी एकादशी येते. यानंतर दक्षिणायनाला सुरुवात होते. सूर्य दक्षिणेकडे जायला सुरुवात होते, त्यामुळे देव झोपतो. आता देवउठी एकादशी कधी, तर ती सहा महिन्यांनी येते. परंतु, चातुर्मास हा तर चार महिन्यांचा असतो, यामागचं कारण म्हणजे एक तृतीयांश रात्र असताना देव उठतात. त्याचबरोबर चातुर्मासातील तिसरी एकादशी म्हणजे, परिवर्तिनी एकादशी. यादिवशी भगवान श्रीविष्णु क्षीरसागर योगनिद्रेमध्ये असतात, ते एका बाजूने वळतात. म्हणूनच ‘परिवर्तिनी एकादशी’ असे याचे नाव आहे.
आजच्या आधुनिक काळात जगताना, एका बाजूला निसर्गाचे विलोभनीय सौंदर्य आहे आणि दुसर्या बाजूला कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे जीवनात येणारा वेग आहे. यामुळे एक गुंतागुंतीचे जीवन आपल्याला भोवताली बघायला मिळते आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या संस्कृतीचे जे मूळ अधिष्ठान आहे, त्याकडे युवा पिढीने वळणे किती आवश्यक आहे?वैदिक सनातन धर्माचा मूळ उद्देश काय असेल तर, माणसाने माणसाशी माणसासारखं वागणे. त्याचबरोबर मी आणखी एक गोष्ट जोडू इच्छितो की, माणसाने निसर्गाशीसुद्धा माणसासारखेच वागणे आपेक्षित आहे. आपल्याला आपल्या आयुष्याचा आनंद तर घ्यायचा आहेच परंतु, दुसर्याच्या जीवनातसुद्धा आनंद निर्माण करायचा आहे. आजच्या युगामध्ये साहजिकच मानसिक ताणतणाव निर्माण होणार आहे. यावर आपल्याला जर मात करायची असेल, तर भारतीय संस्कृतीमधील मूळ व्रतांकडे आपण वळले पाहिजे. एक समृद्ध जीवनशैली विकसित केली पाहिजे. आपली भारतीय संस्कृती, भारतीय विचार दर्शन येणार्या काळात जगाला मार्गदर्शन करेल, यामध्ये मला शंका नाही.