रागदारी संगीताचे पांथस्थ!

    26-Jul-2025   
Total Views |

शास्त्रीय संगीत अनुभूतीच्या पातळीवर जितकं सुखावणारं आहे, तितकंच ते विश्लेषणाच्या पातळीवर विलोभनीयदेखील आहे. शास्त्रीय संगीताच्या प्रांतात अनुभवाच्या पलीकडे, विश्लेषणाचा विचार मांडणारे युवा संगीतकार म्हणजे डॉ. अतिंद्र सरवडीकर. आज दि. 26 जुलै रोजी सायंकाळी 7.30 वाजता मुंबईतील प्रभादेवीच्या रवींद्र नाट्यमंदिर येथे त्यांच्या ‘रागमुद्रा’ आणि ‘किराणा घराणं’ या पुस्तकांचे प्रकाशन पार पडणार आहे. त्यानिमित्ताने दै. ‘मुंबई तरुण भारत’शी डॉ. अतिंद्र सरवडीकर यांनी साधलेला हा विशेष संवाद.

इतक्या वर्षांच्या साधनेनंतर आज शब्दरूपात आपला विचार आपण रसिकांपर्यंत पोहोचवणार आहात, आपल्या काय भावना आहेत?

खरं सांगायचं तर समाधानाची भावना आहे. लहानपणापासून माझं कवितांवर आणि क्रमाने शब्दांवर प्रेम होतं. शास्त्रोक्त संगीतामध्ये होतं असं की, बर्‍याचदा तेच तेच विषय असतात आणि त्याच त्याच शब्दांची रचना असते. अशातच वेगळ्या अर्थाच्या बंदिशी मला सूचल्या असं मला वाटलं आणि म्हणूनच हा संग्रह रसिकांच्या समोर येत आहे. अर्थाच्या दृष्टीने, काव्याच्या दृष्टीने नवे प्रयोग केले आहेत. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन करणारी बंदिश यामध्ये आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे वर्णन करणारी बंदिश यामध्ये आहे. सांगीतिकदृष्ट्या शब्दांमध्ये नादमयता असणं महत्त्वाचं असतं. त्याचा विचार करूनच या पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे.

आपल्या संगीत प्रवासाविषयी काय सांगाल? संगीताशी नाळ कशी जोडली गेली?

माझ्या संगीत प्रवासाविषयी सांगायचं तर मला गाणं माझ्या आईकडून मिळालं. माझी आई वृंदा सरवडीकर. सोलापूरच्या सिद्धेश्वर शाळेत संगीत शिक्षिका होती, मी मूळचा सोलापूरचा आहे. आई अतिशय बाणेदार आणि शिस्तबद्ध स्वभावाची होती. त्यानंतर दत्तू सिंह गहेरबार यांच्याकडे मी पारंपरिक जे संगीत आहे ते शिकलो. त्यांचं शिकवणं अत्यंत पठडीला धरून होतं, त्यामुळे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ ज्ञान त्यांच्याकडून मिळालं, मनामध्ये कोणतीही शंका राहिली नाही. त्यांच्यामुळे परंपरागत आपल्या ज्या बंदिशी आहेत, जे राग आहेत, त्यांचा अभ्यास पक्का झाला आणि त्यामुळे योग्य वेळी मी नवनिर्मिती करू शकलो. त्यानंतर 2003 ते 2024 असा जवळपास 21 वर्षांचा काळ मला स्वरयोगिनी, ‘पद्मविभूषण’ डॉ. प्रभा अत्रे यांच्याकडे गाणं शिकायला मिळालं. भारतीय शास्त्रीय संगीतातील त्या अतिशय श्रेष्ठ अशा कलाकार होत्या. गुरूगृही राहून मला त्यांच्याकडे शिकायला मिळालं. त्यांनी दिलेल्या ज्ञानामुळे माझं आयुष्य समृद्ध झाले. प्रभाताई स्वतः खूप मोठ्या गायिका, रचनाकार, लेखिका, संशोधिका असे अनेक पैलू असणार्‍या कलाकार होत्या आणि माझ्या या गुरूंपासून प्रेरणा घेऊनच मी नवनिर्मितीची वाटचाल करायला लागलो. सुरुवातीच्या काळात प्रभाताईंकडे शिकताना सोलापूर, ते मुंबई असं येऊन-जाऊन शिकायचो, प्रवास करून शिकायचं, त्यांच्या घरी राहून शिकायचं असा अनुभव मी घेतला.

मुंबई विद्यापीठात मी संगीतात पदव्युत्तर शिक्षण घेतलं, ज्यात मला सुवर्णपदक मिळालं. त्याचबरोबर संगीतात मी मुंबई विद्यापीठात ‘डॉक्टरेट’ केलं आहे. विशेष गोष्ट म्हणजे, मुंबई विद्यापीठाने प्रदान केलेली संगीतातील पहिली ‘डॉक्टरेट’ मला मिळाली होती. या ‘डॉक्टरेट’साठी मी जो अभ्यास केला होता, तो किराणा घराण्याचा अभ्यास होता आणि त्या अभ्यासावर आधारितच मराठीमधलं ‘किराणा घराणं : परंपरा आणि प्रवाह’ हे पुस्तक 2017 साली प्रकाशित झालं. डॉ. प्रभा अत्रे, पंडित सुधीर माईनकर, मुकुंद संगोराम असे सगळे मान्यवर त्यावेळी उपस्थित होते आणि याच पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर आता प्रकाशित होत आहे.

संगीतामधील गुरू-शिष्य परंपरा पूर्वीप्रमाणेच आजसुद्धा समृद्ध आहे. याबाबतीत आपल्या प्रवासाविषयी जाणून घ्यायला आवडेल.

सुरुवातीला सोलापूर-मुंबई असा दर आठवड्याला प्रवास करून मी प्रभाताईंकडे शिकलो. त्यांनी मला अतिशय डोळसपणे शिकवलं. त्यांची शिक्षणाची पद्धत इतकी समृद्ध होती की, त्यांनी माझ्यातली प्रतिभा फुलवली आणि या फुलवण्यामुळे माझी प्रगती झाली, असं मला वाटतं. अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे, माझ्या या ज्या रचना आहेत, ज्या आता प्रकाशित होत आहेत, त्या प्रभाताईंनी ऐकल्या होत्या. त्यांना त्या खूप आवडल्या, त्यातील काव्यपक्षांचं त्यांनी स्वागत केलं आणि या प्रकाशनासाठी त्यांनी मला प्रोत्साहित केलं होतं. कारण, अलीकडच्या काळात बंदिश संग्रह प्रकाशित झालेले नाही. प्रभाताईंनी माझ्यावर पुत्रवत प्रेम केलं होतं. त्यांची कठोर संगीत साधना बघून आम्ही शिकलो.

एक अभ्यासक आणि संगीत रसिक म्हणून वर्तमान स्थितीमध्ये समाज आणि शास्त्रीय संगीत या नात्याकडे तुम्ही कसं बघता?

आजच्या समाजाला शास्त्रीय संगीताची आवश्यकता आहे. शास्त्रीय संगीतामध्ये दोन गोष्टी असतात. एक म्हणजे श्रोता, त्याची संवेदनशीलता आणि त्याच्या मनाचे शांत होणे आवश्यक असते. हे शांत होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. श्रोत्याने जर मन लावून ऐकलं, तर राग ज्याप्रकारे उलगडतो, त्यातील गंमत त्यांना लक्षात येईल. माणसाचं मन ज्यावेळेस शांत असतं ना, त्याच वेळेस तो चांगली निर्मिती करू शकतो. आपलं मन जर शांत नसेल, तर आपण चांगली निर्मिती करू शकणार नाही. आजच्या समाजाला जर स्थिर व्हायचं असेल, तर संगीतच त्याला तारू शकेल.

किराणा घराण्याचा इतिहास, त्याचे बदलते प्रवाह लोकांसमोर आपल्याला का मांडावेसे वाटले?

मी ज्यावेळेस मुंबई विद्यापीठामध्ये ‘डॉक्टरेट’साठी अभ्यास करत होतो, त्यावेळेस असं लक्षात आलं की किराणा घराणं हे भारतातील शास्त्रीय संगीतातील अत्यंत रसिकप्रिय घराणं आहे. अब्दुल करीम खाँ, हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, गंगुबाई हंगल, सवाई गंधर्व, भीमसेन जोशी असे अनेक कलाकार या घराण्यात होऊन गेले, जे अत्यंत लोकप्रिय होते. ही लोकप्रियता असूनसुद्धा या घराण्याच्या गायिकेचे विश्लेषणात्मक अध्ययन झालेले नव्हतं. आता उदाहरणार्थ भीमसेन जोशी यांची तान ऐकली की वीज कडाडल्यासारखं वाटतं. असा वर्णात्मक विचार आपल्याला ऐकायला मिळतो. परंतु, त्याचं विश्लेषण जसं त्यांनी कोणती पट्टी वापरली, कोणता ताल वापरला. कोणती लय वापरली आणि हे गाणं लोकांना का आवडलं, याचा एक शास्त्रशुद्ध अभ्यास होणे गरजेचे आहे.

या दोन्ही पुस्तकांमागची प्रेरणा नेमकी काय आहे ?

मला असं वाटतं की, समृद्ध परंपरा हीच यामागची प्रेरणा आहे. परंपरा ही कायम प्रवाही असते. निर्मिती करणारा जो कलाकार असतो, त्याची निर्मिती त्याला साद घालत असते. त्या सादेला तो नकळत प्रतिउत्तर देत असतो. ही गोष्ट अशी ठरवून होत नाही, त्या कलाकाराला ही गोष्ट आतून सूचत असते, तेव्हा ती मांडण्याची त्याला तीव्र इच्छा असते, माझ्याबाबतीतसुद्धा हेच झालं असं मला वाटतं. मुद्रा म्हणजे चेहरा, बंदिश हा रागाचा चेहरा असतो. म्हणून या ग्रंथाला ‘रागमुद्रा’ हे नाव मला सूचलं आहे. आजच्या पिढीला आवडेल, अशा काही रचना मी केल्या आहेत.

एक युवा गायक म्हणून आपण शास्त्रीय संगीताचा ध्यास घेणार्‍या युवक-युवतींना काय संदेश देऊ इच्छिता?

शास्त्रीय संगीताचा ध्यास घेऊन जगणार्‍या युवकांना आणि युवतींना मला हेच सांगायचे आहे की, भारतीय शास्त्रीय संगीत हा अत्यंत सुंदर विषय आहे. हा विषय तुमचं आयुष्य समृद्ध करतो. त्याचबरोबर सातत्याने निर्मितीशील राहण्यासाठीसुद्धा प्रेरणा देतो. एकच राग, जर वेगवेगळ्या गायकांनी गायला, तरी तो सारखा नसतो. प्रत्येकाची गायिकी वेगळी असते. हे दुसर्‍या कुठल्याही संगीत प्रकारात बघायाला मिळणार नाही. आपल्या संगीतामध्ये अनेक शक्यता निर्माण होतात. या शक्यतांचा आपण ज्यावेळेस धांडोळा घेतो, त्यावेळेस एक सुंदर प्रदेश आपल्या नजरेस येतो. एक सुंदर अनुभूती आपल्याला मिळते. शास्त्रीय संगीताचा जो मूळ गाभा आहे, त्याचं सत्त्व राखलं पाहिजे; त्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. मी वेगवेगळ्या माध्यमांना आवाहन करू इच्छितो की, आपल्या रचनेतील एक भाग आपण शास्त्रीय संगीतासाठी राखून ठेवावा, कारण हे संगीत शाश्वत आहे.

(मुलाखत : मुकुल आव्हाड)

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.