नवी दिल्ली : (PM Narendra Modi on India-Britain Trade Deal) भारत आणि ब्रिटनमध्ये बहुप्रतिक्षित मुक्त व्यापार करार अस्तित्वात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर यांच्या साक्षीने ऐतिहासिक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंग्लंडचे पंतप्रधान केयर स्टारमर यांच्यासोबत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मोदींनी चांगलीच फटकेबाजी केल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी या करारामुळे भारतीय कापड, पादत्राणे, रत्ने आणि दागिने, समुद्री खाद्य आणि अभियांत्रिकी वस्तूंना ब्रिटनच्या बाजारपेठेत मोठे स्थान मिळणार असल्याचे म्हटले आहे. याबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, "या करारामुळे भारतातील कृषी उत्पादनांसाठी आणि प्रक्रिया केलेल्या अन्न उद्योगासाठी नवीन संधीही उपलब्ध होतील. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा करार भारतातील तरुण, शेतकरी, मच्छीमार आणि एमएसएमई क्षेत्रासाठी विशेषतः फायदेशीर ठरेल. दुसरीकडे, वैद्यकीय उपकरणे आणि एरोस्पेस घटकांसारखी यूके-निर्मित उत्पादने भारतीय ग्राहक आणि उद्योगांसाठी अधिक सुलभ आणि परवडणारी होतील."
क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तर आमच्या भागीदारीचे उत्तम प्रतीक आहे - पंतप्रधान
दरम्यान, या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चांगलीच शाब्दिक टोलेबाजी केल्याचेही पाहायला मिळाले. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेचा संदर्भ देत ते म्हणाले की, "भारत आणि यूके एकत्र येत असताना, विशेषतः जेव्हा दोन्ही देशांमध्ये कसोटी मालिका सुरू असते, तेव्हा क्रिकेटचा उल्लेख न करणे मला चुकीचे वाटते. दोन्ही देशांसाठी क्रिकेट हा केवळ खेळ नाही, तर ती एक जिव्हाळ्याची गोष्ट आहे. हे आपल्या भागीदारीचे उत्तम प्रतीक देखील आहे. कधी कधी चेंडू स्विंग होतो, चुकतो, पण आपण नेहमीच स्ट्रेट बॅटने खेळण्याचा प्रयत्न करतो. आम्ही दोघेही एका मजबूत, उच्च धावसंख्येच्या भागीदारीसाठी कटिबद्ध आहोत."
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\