नवी दिल्ली : (PM Narendra Modi breaks Indira Gandhi's record) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक नवीन विक्रम केला आहे. देशाच्या माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडीत काढून आपल्यानावे केला आहे. सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषवणारे नरेंद्र मोदी हे दुसरे नेते ठरले आहेत. त्यांनी आज म्हणजेच शुक्रवार, दि. २५ जुलै रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस पूर्ण केले आहेत. सलग सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषवण्याच्या बाबतीत भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आघाडीवर आहेत. त्यांच्यानंतर इंदिरा गांधी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधान भूषवले होते. मात्र, मोदींनी इंदिरा गांधींना मागे टाकले आहे.
सलग हे पद भूषवत असताना नरेंद्र मोदी यांनी राज्य आणि केंद्रातील कारभार मिळून २४ वर्षांहून अधिक काळ सरकारचे नेतृत्व केले आहे. हा देखील सर्व पंतप्रधानांमधील मोठा विक्रम आहे. इंदिरा गांधी यांनी २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ असे सलग ४०७७ दिवस म्हणजेच ११ वर्षे ५९ दिवस भारताच्या पंतप्रधान म्हणून कारभार पाहिला होता. तर मोदी २६ मे २०१४ पासून या पंतप्रधान पदावर आहेत. २५ जुलै २०२५ रोजी त्यांनी पंतप्रधान म्हणून ४०७८ दिवस म्हणजेच ११ वर्षे ६० दिवस पूर्ण केले आहेत.
सर्वाधिक काळ पंतप्रधान पद भूषवणाऱ्यांमध्ये पंडित नेहरु हे पहिल्या क्रमांकावर आहेत. त्यांनी देश स्वतंत्र झाल्यापासून म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ ते २७ मे १९६४ पर्यंत सलग ६,१२६ दिवस म्हणजेच १६ वर्षे २८६ दिवस भारताचे नेतृत्त्व केले आहे. नरेंद्र मोदी यांना नेहरूंचा हा विक्रम मोडण्यासाठी आणखी २०४८ दिवस भारताचे नेतृत्त्व करावे लागेल. त्यासाठी त्यांना आणि भाजपला आगामी म्हणजेच २०२९ ची लोकसभा निवडणूक देखील जिंकावी लागेल.
सर्वाधिक काळ पद भूषवणारे बिगर-काँग्रेसी पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत. ते स्वतंत्र भारतात जन्मलेले पहिले आणि एकमेव पंतप्रधान आहेत. तसेच सर्वाधिक काळ भारताचे पंतप्रधानपद भूषवणारे बिगर-काँग्रेसी नेते आहेत. मोदींच्या नेतृत्वात भाजपने २०१४, २०१९, २०२४ च्या लोकसभा निवडणुका लढवल्या. या तिन्ही निवडणुकांमध्ये भाजप विजयी झाली आहे. तसेच, आजवरील भारतातील सर्व पंतप्रधान व वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपैकी मोदी हे एकमेव असे नेते आहेत, ज्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाने सलग सहा निवडणुका जिंकल्या आहेत. मोदींच्या नेतृत्वात भाजपाने २००२, २००७ व २०१२ च्या विधानसभा निवडणुका लढवल्या होत्या. या तिन्ही निवडणुकांमध्ये भाजप विजयी झाली होती.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\