ज्येष्ठ साहित्यिक रा. चिं. ढेरे यांच्या जयंतीनिम्मित 'विठो पालवीत आहे' कार्यक्रम संपन्न ! , पुस्तक प्रकाशन तथा अभिवाचन व गीत गायनाचा अनोखा कार्यक्रम संपन्न!

    24-Jul-2025   
Total Views |

पुणे, पुण्यातील टिळक रोडच्याइथल्या न्यू इंग्लिश स्कूल येथे दि. २१ जुलै रोजी प्रख्यात संशोधक, रा. चिं. ढेरे यांच्या जयंतीनिम्मित डॉ. रा. चिं. ढेरे संशोधन केंद्राच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाअंतर्गत एकूण चार पुस्तकांचे प्रकाशन झाले, त्यातील तीन पुनर्प्रकाशित होती. ' भारतीय रंगभूमीच्या शोधता ' आणि ' बोरकरांची प्रेमकविता ' या दोन पुस्तकांचे पुनर्मुद्रण प्रकाशित झाले.

डॉ. रा. चिं. ढेरे संशोधन केंद्राच्या अध्यक्षा अरुणाताई ढेरे यांनी यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. यावेळी संशोधन केंद्राच्या वेगवेगळ्या उपक्रमांची व प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची माहिती दिली. बहुरुपी रामकथा ही व्याख्यानमाला केंद्रातर्फे दीड वर्ष चालू होती, त्यातल्या ३३ व्याख्यानांचे साडेपाचशे पाणी पुस्तक म्हणजे " बहुरुपी रामायण " प्रकाशित करण्यात आले. यामध्ये वाल्मिकी रामायणापासून ते १२- १३ व्या शतकातील रामायणाबद्दल, भारतातील वेगवेगळ्या प्रदेशातल्या आणि विविध भाषांमध्ये तयार झालेल्या रामायणाबद्दलच्या व्याख्यानांचा समावेश आहे.

सदर पुस्तकाचे प्रकाशन करण्यासाठी रंगमंचावर अरुणा ढेरे, केंद्राच्या सचिव वर्षा गजेंद्रगडकर, ज्येष्ठ मूर्ती शास्त्रज्ञ डॉ गो बं देगलूरकर, पद्मगंधा प्रकाशनचे अभिजीत जाखडे, या संपूर्ण प्रकल्पाला आर्थिक सहाय्य करणारे मोहन आणि नलुताई गुजराथी हे रंगमंचावर उपस्थित होते.डॉ रा चिं ढेरे यांच्या श्री विठ्ठल एक महासमन्वय या ग्रंथाच्या इंग्रजी आवृत्तीचे पुनर्मुद्रणही या वेळी झाले.

यानंतर 'विठो पालवीत आहे' हा डॉ ढेरे यांच्या विठ्ठलविषयक लेखनावर आधारित कार्यक्रम सादर झाला. या कार्यक्रमाची संकल्पना-संपादन चंद्रकांत काळे यांची होती. चंद्रकांत काळे, गजानन परांजपे, स्वामिनी पंडित या तिघांनी अभिवाचन केले. आणि गायन स्वतः चंद्रकांत काळे आणि अंजली मराठे यांनी केले.

या कार्यक्रमाला रसिकांनी उत्तम दाद दिली. प्रेक्षकांमध्ये कथक नृत्यांगना शमा भाटे, संस्कृतज्ञ सरोजा भाटे, गायक सत्यशील देशपांडे, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, कवी वैभव जोशी, सामाजिक कार्यकर्त्या गीताली वि मं, रंगकर्मी सुषमा देशपांडे, किरण यज्ञोपवीत,नीलिमा गुंडी, श्रीराम रानडे आदी मान्यवर उपस्थित होते.

मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.