मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत! सर्व आरोपींना फाशी होणार : किरीट सोमय्या

    24-Jul-2025
Total Views |


मुंबई : मुंबई लोकल बॉम्बस्फोट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो. सगळ्या आरोपींना फाशी होणारच, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली आहे. ७/११ लोकल बॉम्बस्फोट प्रकरणातील सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

किरीट सोमय्या म्हणाले की, "सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली, मी त्याचे स्वागत करीत आहे. वर्ष २००६ बॉम्बस्फोट खटल्याच्या सगळ्या आरोपींना फाशी झाली पाहिजे. मला विश्वास आहे की, महाराष्ट्र सरकारतर्फे आता सर्वोच्च न्यायालयात जी बाजू मांडली जाणार त्यामुळे या सगळ्या आरोपींना फाशी होणार," असे ते म्हणाले.


११ जुलै २००६ रोजी मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील १२ पैकी पाच आरोपींना फाशीची शिक्षा तर उर्वरित आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने या सर्व १२ आरोपींना निर्दोष मुक्त केले होते. राज्य सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, आता सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.