उद्धव ठाकरे, शरद पवार शत्रू नाहीत!

    23-Jul-2025   
Total Views |

पंढरपूर: “उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे वैचारिक विरोधक असले, तरी शत्रू नाहीत. त्यांनी माझ्या वाढदिवसानिमित्त देलेल्या शुभेच्छांचा चुकीचा अर्थ काढू नये”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पंढरपूर दौऱ्यावर असताना दिली. तसेच, पंढरपूर विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊन आणि कोणाचेही नुकसान न करता राबवला जाईल, असे त्यांनी आश्वस्त केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यासारखे नेते वैचारिक विरोधक असू शकतात, परंतु ते शत्रू नाहीत. माझ्या वाढदिवसानिमित्त या नेत्यांनी लेखातून व्यक्त केलेल्या भावनांचा चुकीचा अर्थ काढणे अयोग्य आणि संकुचित आहे. महाराष्ट्रात चुकीच्या संस्कृतीला प्रोत्साहन देण्याची गरज नाही. शुभेच्छा व्यक्त करणे ही सकारात्मक भावना आहे आणि त्याचे आभार मानले पाहिजेत," असे फडणवीस म्हणाले.

मराठी-अमराठी वादावर भाष्य करताना राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावरही फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यपालांनी, "मराठी बोलता येत नाही म्हणून मला मारहाण केली, तर मी लगेच मराठी बोलू लागेन का?" असा सवाल केला होता. यावर फडणवीस म्हणाले, "राज्यपाल हे संवैधानिक पदावर आहेत आणि ते योग्य गोष्टीच बोलतात. त्यांना राजकीय वादात ओढणे चुकीचे आहे." कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर फडणवीस यांनी बोलणे टाळले. "मी संतांच्या भूमीत आलो आहे. येथे राजकीय प्रश्नांवर बोलणार नाही. संतांचे कार्य मोठे आहे," असे त्यांनी सांगितले.

पंढरपूरचा विकास आराखडा सर्वांना विश्वासात घेऊन!

- पंढरपूर विकास कॉरिडोरबाबत बोलताना फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हा आराखडा कोणाचेही नुकसान न करता, सर्वांना सामावून घेऊन राबवला जाईल. "पंढरपूरला कोट्यवधी भाविक येतात, त्यामुळे येथील अव्यवस्था दूर करणे आवश्यक आहे. बाधित दुकानदार आणि रहिवाशांना योग्य पद्धतीने सामावून घेतले जाईल. कोणाचेही नुकसान होणार नाही," असे आश्वासन त्यांनी दिले.

- कॉरिडोरचा आराखडा पूर्ण झाल्यानंतर सर्व बाधित व्यक्तींशी चर्चा केली जाईल. आतापर्यंत सर्व प्रक्रिया पारदर्शक आहे. राजकीय पुढाऱ्यांपेक्षा बाधित व्यक्तींशी संवाद साधण्याला प्राधान्य आहे. पंढरपूर विकास आराखड्याचे ध्येय श्री विठ्ठल मंदिर आणि परिसराचा सर्वसमावेशक विकास करणे आहे, असे त्यांनी नमूद केले.


सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.