सुनिल तटकरेंनी टोचले ; माणिकराव कोकाटेंचे कान

    23-Jul-2025   
Total Views |

मुंबई : “जबाबदार नेतृत्वाने खूप विचारपूर्वक वक्तव्ये केली पाहिजेत”,अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंचे कान टोचले आहेत.

तटकरे म्हणाले, “माझे माणिकराव कोकाटे यांच्याशी बोलणे झालेले नाही. मी दौऱ्यावर होतो, आताच परत आलो आहे. कोकाटे यांचे आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणे झाले असेल, तर मला त्याबद्दल माहिती नाही. परंतु, जबाबदार नेतृत्वाने खूप विचारपूर्वक वक्तव्ये केली पाहिजेत, असे मला वाटते.”

“माणिकराव कोकाटे यांच्याबद्दल आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बोलतील. विरोधकांनी जरी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली असली, तरी तो त्यांचा अधिकार आहे. त्यावर मला काही बोलायचे नाही. सशक्त लोकशाहीत प्रत्येकजण आपापले काम करीत राहतो. विधान भवनात जे काही घडते, त्यावर अध्यक्षांचे लक्ष असते. विधानभवनाच्या परिसरातील सर्व घडामोडी या विधानसभा अध्यक्ष व विधान परिषदेच्या सभापतींच्या नियंत्रणात येतात. माणिकराव कोकाटे यांचा व्हिडिओ कोणी चित्रित केला, त्याबद्दल ते तपास करतील. परंतु, ती गोष्ट उचित नव्हती. सभागृहात जे काही घडले ते निंदनीय आहे. सभापती व अध्यक्षांनी याची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे. कदाचित त्यांनी चौकशी करण्यास सुरुवातही केली असेल. यासह विधानभवनात अलिकडे घडलेल्या घटना खूप क्लेषदायक आहेत. या घटना महाराष्ट्राच्या सुसंस्कृत विधान मंडळाच्या परंपरेला गालबोट लावणाऱ्या आहेत”, असेही ते म्हणाले. 

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.