
मुंबई : गडचिरोलीसारख्या मागास भागातील समुदायाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य शासन आणि कॉर्पोरेट फाउंडेशनच्या सहकार्याने ‘बाएफ’ संस्थेमार्फत विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामुळे स्थानिकांना रोजगार संधी, शाश्वत शेती आणि जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने या प्रकल्पांना गती मिळत आहे.
राज्य शासनाच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात कॉर्पोरेट फाउंडेशनच्या आर्थिक सहाय्याने बाएफ संस्थेमार्फत राबवल्या जाणाऱ्या प्रकल्पांद्वारे स्थानिक रोजगार संधी वाढवण्याचे आणि समुदायाचे कल्याण साधण्याचे प्रयत्न होत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, या प्रकल्पांमुळे गडचिरोलीच्या मागास भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यास आणि समृद्धी साधण्यास मदत होत आहे.
गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील २० गावांमध्ये एसबीआय फाउंडेशनच्या प्रायोजकत्वाखाली दि. १ एप्रिल २०२५ पासून समन्वित उपजीविका विकास कार्यक्रम राबवला जात आहे. हा उपक्रम पुढील तीन वर्षांसाठी (२०२५-२८) राबवला जाईल, ज्यामध्ये १ हजार ५०० कुटुंबांना लाभ मिळेल. या प्रकल्पासाठी ४.९५ कोटी खर्च अपेक्षित आहे. यामध्ये हवामान सुसंगत शेती, मृदा व जलसंधारण, जलस्रोत विकास, बोडी आधारित शेती, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, महिला उद्योजकता आणि समुदाय आरोग्य व पोषण यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या भागातील समुदाय कल्याणाला प्राधान्य दिले आहे. २०२५-२६ या वर्षासाठी ३० जून २०२५ पर्यंत ५०० कुटुंबांची नोंदणी पूर्ण झाली असून, १५ बोडी (नैसर्गिक शेती तलाव) गाळमुक्त करण्यात आल्या आहेत. यामुळे शेतीसाठी पाण्याचा साठा वाढला आहे. बोडी आधारित शेती पद्धतीत मासे आणि कुक्कुटपालनासह पाण्याचा कार्यक्षम वापर केला जातो, ज्यामुळे उपजीविकेचे विविध स्रोत निर्माण होतात.
२०२७-२८ पर्यंत या प्रकल्पात सहभागी कुटुंबांचे उत्पन्न दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. यामुळे शेती उत्पादकता वाढेल, शेतकरी गटांद्वारे सामूहिक खरेदी-विक्री व्यवस्था निर्माण होईल आणि पोषण व आरोग्याविषयी जनजागृतीमुळे जीवनमानात सुधारणा होईल. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पाठपुराव्यामुळे आणि कॉर्पोरेट फाउंडेशनच्या सहकार्याने गडचिरोलीत प्रेरणादायी बदल घडत आहेत.