पालघरच्या डहाणूतील जनजाती समाजाच्या विशेषतः येथील शाळकरी मुलांच्या विकासासाठी झटणारे हरेश्वर वनगा यांच्याविषयी...
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुयात आगर येथे जन्मलेले हरेश्वर वनगा समाजकार्यात गेली अनेक वर्षे हिरिरीने सक्रिय आहेत. डहाणूतील जनजाती समाजाचा विकास व्हावा, येथील मुलांनी शिकून आपल्या समाजाचे नाव मोठे करावे, हे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून हरेश्वर मोठ्या उत्साहाने जनजाती समाजासाठी समर्पण भावनेतून कार्यरत आहेत.
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. आईवडील, सात भावंडे... पाच बहिणी, दोन भाऊ असा त्यांचा परिवार. आईवडील तेव्हा मोलमजुरी करून घर चालवायचे. वडिलांनी ३० रुपये, तर आई सात रुपये पगारावर काम करायची. अशा परिस्थितीत खडतर आयुष्य ते त्याकाळी जगत होते.
गावातल्या शाळेतच हरेश्वर यांचे शालेय शिक्षण झाले. मात्र, पुढील शिक्षण पाहता आर्थिक परिस्थिती पुरेशी नसल्याने हरेश्वर यांनी शिक्षण अर्ध्यातच सोडायचा निर्णय घेतला. मात्र, तेव्हा माधव काणे यांनी त्यांना तलासरी येथे असलेल्या ‘विश्व हिंदू परिषदे’च्या शाळेत ठेवून घेतले. तलासरीत शिकत असताना शिक्षणाबरोबर सामाजिक कार्याचे ज्ञान मिळत गेले. इथूनच पुढे समाजकार्याची ओढ निर्माण होत गेली.
समाजकार्य करायचे म्हटले तर पैसा हवा. कारण, जनाजाती क्षेत्रातील मुलांना पुरेसे शिक्षण मिळत नव्हते, त्याकरिता आर्थिक गरज भासत होती. म्हणून मग हरेश्वर यांनी आपल्या दैनंदिन व्यवहारातील काही गोष्टी कमी केल्या. असे करत करत त्यांनी हळूहळू मुलांसाठीचा मदतनिधी उभारण्यास सुरुवात केली. मुलांच्या शिक्षणाचा खर्च, परीक्षा आल्यावर त्यांना पेन्सिल, पेन, वह्या-पुस्तके अशा विविध शालोपयोगी वस्तू पुरवणे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे या गोष्टी सुरू झाल्या. कधीकधी तर ते रद्दीत टाकलेल्या वह्या गोळा करून त्यामधून कोरी पाने वेगळी करून, ते जोडून पुन्हा नवीन वही तयार करायचे. यापलीकडे जाऊन त्यांनी शिक्षणासाठी लांबून येणार्या मुलांच्या सायकली दुरुस्त करणे, त्यांना कपडे देणे अशा अनेक गोष्टी केल्या आहेत.
आरोग्याच्या दृष्टीने त्यांनी केलेली मदत खरंच विलक्षण स्वरूपाची होती. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांसोबत कोणी नातेवाईक तेव्हा येत नव्हते. कारण, मजुरी करून घर चालवण्यापलीकडे काही पर्यायच नव्हता. त्यामुळे अशा रुग्णांना जेवणाचा डबा देण्याचे, त्यांची काळजी घेण्याचे काम हरेश्वर करायचे. वेळप्रसंगी त्यांनी कित्येक जनजातींसाठी रक्तदानसुद्धा केले. आपल्या समाजाला वैचारिकदृष्ट्या कसे सुधारायचे, हे त्यांना आता चांगलेच कळू लागलेय, असे ते म्हणतात.
मधल्या काळात ‘भारत विकास परिषद’ आणि ‘बी. व्ही. पी. फिल्मसिटी चॅरिटी ट्रस्ट, मालाड, मुंबई’च्या सहकार्यातून तलासरी, डहाणू परिसरात कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाते. या माध्यमातून जनजाती मुलांचा विकास व्हावा, या उद्देशाने त्यांनी मोलाची कामगिरी केली. हरेश्वर यांचा परिसस्पर्श ज्या मुलांना झाला, आज ती मुले निरनिराळ्या क्षेत्रांत स्वकर्तृत्वावर यशस्वी झाली आहेत. कोण ब्युटीपार्लरमध्ये काम करते, तर कोणी मेकॅनिक आहे. एक गोवा तर एक लोणावळा येथे हाऊस किपिंगमध्ये सक्रिय आहे. काही मुलींनी नर्सिंगचे प्रशिक्षण घेतले. ज्या मुलांनी कधी साधा केकही खाल्ला नाही, ते आज स्वतः केक तयार करून इतरांना खाऊ घालत आहेत. या सगळ्याचा एक फायदा असा झाला की, मुलांमध्ये झालेल्या कौशल्य विकासामुळे घरी आईवडिलांमध्येसुद्धा वैचारिक बदल होत गेले.
साधारण ३० वर्षांपूर्वीचा एक प्रसंग. एका मुलाला घेऊन त्याचे वडील गावातील दवाखान्यात गेले. मात्र, तिथे उपचार होणे शय नसल्याने त्यांना पुढे मोठ्या दवाखान्यात जावं लागलं. तिथे डॉटरांनी लाखभर खर्च होईल म्हणून सांगितले. त्या वडिलांची परिस्थिती अशी होती की, घर-शेती विकली तरी इतके पैसे उभे राहणे अशक्य होते. हे जेव्हा हरेश्वर यांना कळले, तेव्हा त्यांनी त्या मुलाच्या उपचारांसाठी पैसा उभा केला. त्यानंतर त्या मुलावर उपचार झाले आणि तो बराही झाला. काही वर्षे उलटल्यानंतर त्या मुलाच्या वडिलांना हरेश्वर पुन्हा भेटले. तेव्हा हरेश्वर यांनी त्यांना ओळखले नाही. त्यांनी मात्र नीट ओळखलं होतं. हरेश्वर यांच्यामुळे आपल्या मुलाला जीवनदान मिळाले, या भावनेने वडिलांनी अक्षरशः त्यांना मिठी मारली. हरेश्वर म्हणतात, "हे त्यांनी नाही केले, तर परमेश्वराने त्यांच्याकडून करवून घेतलेले समाजकार्य आहे.” अशा कित्येक हृद्य आठवणी त्यांच्या स्मृतिपटलावर आजही तरळतात.
पत्नी विमल वनगा यांच्या खंबीर पाठिंब्यामुळेच समाजकार्य करणे शय होत असल्याचे हरेश्वर कायम म्हणतात. ज्या गरजूंना दवाखान्यात ते जेवण घेऊन जायचे, जे जेवण स्वतः विमल करायच्या. मुली चित्रगंधा सुतार आणि धनश्री पंडित दोघींवरही चांगले संस्कार घडले असून, त्या दोघींचाही सामाजिक क्षेत्रात कल आहे. चित्रगंधा यांनी ‘एमएफए’ केले असून, त्या चांगल्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून आहेत, तर धनश्री यांनी ‘बीडीएस’ पूर्ण केले असून त्या दंतवैद्यक आहेत. हरेश्वर या सर्वांव्यतिरिक्त पौरोहित्यसुद्धा करतात. हरेश्वर वनगा यांना पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्यावतीने अनेक शुभेच्छा!
(अधिक माहितीसाठी संपर्क - ९६३७७३३५२४)