कल्याणच्या खाजगी रुग्णालयात रिसेप्शनिस्टचे काम करणाऱ्या मराठी तरूणीला परप्रांतीय तरूणाकडून बेदम मारहाण

    22-Jul-2025   
Total Views |

कल्याण : ‘डॉक्टराकडे एमआर बसले आहेत तुम्ही जरा थांबा’ असे रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट तरूणींनी उच्चरताच परप्रांतीय तरूणाने त्या तरूणीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना शहराच्या पूर्व भागातील बालचिकित्सालय रुग्णालयात सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. रिसेप्शनिस्ट मराठी तरूणीला मारहाण करणाऱ्या तरूणाचे नाव गोकूळ झा असे आहे. त्याच्या विरोधात मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोकूळ झा या तरुणाचा शोध पोलिस घेत आहेत.

कल्याण पूर्वेतील नांदिवली परिसरात बाल चिकित्सालय रुग्णालय आहे. या रुग्णालयात एक तरूणी रिसेप्शनिस्टचे काम करते. तीन दोन शिफ्टमध्ये काम करते. सायंकाळच्या शिफ्टमध्ये रिसेप्शनिस्ट तरुणी रुग्णालयात कामावर कार्यरत होती. त्याचवेळी एक महिला तिच्या बाळाला घेऊन डॉक्टराकडे आली होती. परंतु त्यावेळी डॉक्टर आले नव्हते. डॉक्टर येण्याची वाट चार ते पाच रुग्ण पाहत होते. त्याचवेळी डॉक्टरांच्या केबीनमध्ये एमआर बसले होते. तरूणी काम करीत असताना बाळाच्या उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत गोकूळ झा हा तरूण देखील होता. तो अचानकपणे डॉक्टरांच्या केबीनमध्ये घुसू लागला. तेव्हा तरूणी त्याला म्हणाली डॉक्टरांच्या केबीनमध्ये एमआर बसले आहेत जरा थांबा. इतकेच म्हणता संतप्त झालेल्या तरूण गोकूळ झा याने तरूणीला शिवीगाळ सुरू केली. त्याने तरूणीचा हात धरून बाहेर ओढले. तिला लाथा बुक्काने मारहाण केली. ही सगळी घटना रुग्णालयाच्या सीसीटीव्हीत कैद झाली होती. या प्रकरणी तरूणीने मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी तरूणीला मारहाण करणाऱ्या गोकूळ झा याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. मानपाडा पोलिस गोकूळ झा या तरुणाचा शोध घेत आहे. मराठी तरूणीला परप्रांतीय तरूणाकडून मारहाण झाल्याने कल्याण पूर्वेत एकच खळबळ माजली आहे.

सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास हेमाडे यांनी सांगितले, आरोपीच्या मित्रांच्या माध्यमातून त्यांच्यार्पयत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. आरोपीवर यापूर्वी ही काही गुन्हे दाखल आहेत का याबाबत देखील विविध अंगाने तपास सुरू आहे. आता गोकूळ झा यांच्यावर विनयभंग आणि मारहाण हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.