देवेंद्र फडणवीसांच्या कामाची गती आणि झपाटा कौतुकास्पद – शरद पवार

    22-Jul-2025   
Total Views |

मुंबई : “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहून मला माझा पहिला मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आठवतो. ही गती त्यांनी माझ्या वयापर्यंत कायम ठेवावी आणि ती आणखी वृद्धिंगत होत राहावी, अशी शुभेच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त देतो”, असे म्हणत ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी फडणवीस यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून ‘महाराष्ट्र नायक’ हे कॉफी टेबल बुक प्रकाशित झाले. या पुस्तकात शरद पवार यांनी लिहिलेल्या लेखात फडणवीस यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले आहे. पवार यांनी आपल्या लेखात म्हटले आहे, “क्रियाशील राहण्यासाठी प्रकृती तंदुरुस्त हवी, पण फडणवीस यांच्या कार्यक्षमतेत स्थूलपणा कधीच आडवा आला नाही. त्यांचे कष्ट पाहून ते थकत कसे नाहीत, हा प्रश्न मलाही पडतो. हीच त्यांच्या कार्याची खरी पावती आहे. राजकारणाचे बाळकडू त्यांना घरातून मिळाले असले, तरी वडिलांच्या अकाली निधनाचा धक्का पचवून त्यांनी स्वत:ला सावरले आणि नेटाने पुढे गेले. त्यांच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय त्यांनाच जाते.”

ते पुढे म्हणाले, “कायद्याचे पदवीधर असल्याने फडणवीस हजरजबाबी आणि संवादकुशल आहेत. वागण्या-बोलण्यात तारतम्य हा त्यांचा खास गुण आहे. उपजत बुद्धिमत्ता आणि या गुणांच्या जोरावर त्यांनी सत्तेत नसतानाही आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी उल्लेखनीय होती. त्यामुळेच तरुण वयात त्यांना मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी मिळाली. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचा विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. विविध विषयांची सखोल जाण, प्रशासनावर मजबूत पकड आणि आधुनिकतेची कास धरणारा नेता म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो.”

उद्धव ठाकरेंनीही लिहिला लेख

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या लेखाचाही त्यात समावेश आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणात गंगाधरराव फडणवीस यांनी आदर्श राजकारणी म्हणून ठसा उमटवला. हा वारसा देवेंद्र फडणवीस समर्थपणे आणि मेहनतीने पुढे नेत आहेत. २०१४-२०१९ या काळात आम्ही एकत्र काम केले, तेव्हा त्यांची विषय समजून घेण्याची जिद्द, प्रश्न सोडवण्याची तळमळ आणि राज्याला न्याय देण्याचा प्रयत्न जवळून अनुभवला. विरोधी पक्षनेता म्हणूनही त्यांची धडपड लक्षणीय होती. देवेंद्र फडणवीस हे हुशार आणि प्रामाणिक राजकारणी आहेत. अडचणींना त्यांनी अभ्यासू आणि मुत्सद्दी स्वभावाने तोंड दिले. ‘मेक इन महाराष्ट्र’ आणि ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ यांसारख्या योजनांमुळे महाराष्ट्राने औद्योगिक व आर्थिक प्रगती साधली. या यशाने त्यांची पक्षातील विश्वासार्हता वाढली. फडणवीस यांची भाजपमधील प्रतिमा गतिमान, अभ्यासू आणि पक्षनिष्ठ नेत्याची आहे. आर्थिक-सामाजिक धोरणांचे यश, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक आणि केंद्रीय नेतृत्वाचा पाठिंबा यामुळे त्यांचे स्थान दृढ आहे. भविष्यात राष्ट्रीय पातळीवर महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. त्यांच्या मनातील योजनांना यश मिळो, ही शुभेच्छा!”, असे ठाकरे यांनी लेखात म्हटले आहे.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.