केरळमध्ये मुस्लीम लीगचे राजकीय वर्चस्व?

    22-Jul-2025
Total Views |

muslim-leagues-political-dominance-in-kerala 
 
 
केरळमध्ये मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येने डाव्यांचेही धाबे दणाणले असून, आज केरळमध्ये मुस्लीम लीगचा प्रभाव वाढता आहे. ही लीग डाव्यांच्या सत्तेलाही जुमानत नाही. आगामी काळातील निवडणुका डाव्यांसोबत लढण्यासाठी त्यांनी 25 जागा मिळवण्याचे ध्येय ठेवले आहे. एकूणच केरळची ‘डेमोग्राफी’ बदलली जात आहे.
 
केरळ राज्यामध्ये मुस्लीम लीग आणि अन्य मुस्लीम संघटना यांचा राजकीय प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा इशारा, ‘श्री नारायण धर्म परिपालन’ या संघटनेचे सरचिटणीस वेल्लापल्ली नटेशन यांनी दिला आहे. या मुस्लीम संघटनांचे ‘धार्मिक हुकूमशाही’च्या दिशेने मार्गक्रमण सुरू असल्याचे नटेशन यांनी म्हटले आहे. “केरळ राज्यामध्ये इस्लामिक धार्मिक प्रभाव वाढत चालला आहे. तसेच, इंडियन युनियन मुस्लीम लीग आणि अन्य मुस्लीम संघटना; तसेच सुन्नी नेते कान्तापुरम ए. पी. अबूबाकर मुस्लीयार यांचा प्रभाव केरळमधील राजकारणात वाढत चालला आहे,” असे नटेशन यांचे म्हणणे आहे. “मुस्लीम लीगशी संबंधित असलेले धार्मिक नेते, हे खर्‍या अर्थाने केरळवर राज्य करीत आहेत,” असेही नटेशन यांचे म्हणणे आहे. या संदर्भात बोलताना नटेशन म्हणाले की, “एकेकाळी नेहरू यांनी मुस्लीम लीग म्हणजे ‘मृत घोडा’ असल्याचे म्हटले होते. पण, केरळचे माजी मुख्यमंत्री सी. एच. मुहम्मद कोया यांनी मुस्लीम लीगचा उल्लेख ‘निद्रिस्त सिंह’ असा केला होता. आज मुस्लीम लीग आपला प्रभाव दर्शवीत आहे. सत्तारूढ डाव्या लोकशाही आघाडीसही, मुस्लीम लीगपुढे झुकावे लागत आहे. उत्तर केरळमधील मलबार या बालेकिल्ल्यामध्ये चार जागा मिळाल्या पाहिजेत, अशी मागणी त्या पक्षाने केली आहे. केरळमध्ये 25 जागा मिळवायच्या आणि मुख्यमंत्रिपदावर दावा करायचा, असे त्या पक्षाचे अंतिम ध्येय आहे,” असेही नटेशन यांनी म्हटले. मात्र, “केरळमध्ये अल्पसंख्य समाजाकडून जी कृती केली जात आहे, त्याबद्दल जाब विचारण्याचे साहस एकाही राजकीय पक्षामध्ये नाही,” असे नटेशन म्हणतात.
 
“केरळ हे राज्य मुस्लीमबहुल बनण्याच्या टोकावर आहे,” असे वक्तव्य नटेशन यांनी अलीकडे केले होते, त्यावरून मोठाच वाद निर्माण झाला. केरळचे माजी मार्क्सवादी मुख्यमंत्री व्ही. एस. अच्युतानंदन यांनीही असाच इशारा काही वर्षांपूर्वी दिला होता. “हा बदल घडण्यास 40 वर्षेही लागणार नाहीत,” असेही अच्युतानंदन यांनी म्हटल्याचे नटेशन यांनी लक्षात आणून दिले. केरळ राज्य लोकशाही व्यवस्थेनुसार कार्य करीत नसून, ते राज्य ‘धार्मिक हुकूमशाही’ राज्य बनल्याची टीका नटेशन यांनी केली. नटेशन यांच्या वक्तव्यास,’हिंदू ऐक्य वेदी’चे प्रदेश अध्यक्ष आर. व्ही. बालू यांनी पाठिंबा दिला. लोकसंख्येत वेगाने होणार्‍या बदलाबाबतही बालू यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “2040 सालापर्यंत केरळ हे राज्य मुस्लीमबहुल होईल, या वक्तव्याची अत्यंत गंभीरपणे दखल घ्यायला हवी,” असे बालू यांचे म्हणणे आहे. के ‘लव्ह जिहाद’ हा राष्ट्रीय एकात्मतेला धोका एका हिंदू अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ आणि त्रास दिल्याप्रकरणी, हरियाणामधील जगधारी न्यायालयाने शाहबाझ खानला सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. त्या अल्पवयीन मुलीचा करण्यात आलेला छळ ‘लव्ह जिहाद’सारखाच असून, अशा घटनांमुळे राष्ट्रीय एकात्मतेला धोका निर्माण होत असल्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे. या प्रकरणात दोषी ठरलेला शाहबाझ हा 35 वर्षाचा आहे. जलद गती न्यायालयाचे अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रंजना अग्रवाल यांनी आपला निकाल देताना काही भाष्य केले आहे. “लव्ह जिहाद’ची हजारो प्रकरणे अजून उघडच झाली नसण्याची शक्यता आहे. मुस्लीम पुरुष हिंदू मुलींना फूस लावून, त्यांना आपल्या जाळ्यात ओढण्याचे उद्योग करीत असतात. या खटल्यातील आरोपी हा गुन्हेगारी प्रवृतीचाच आहे. यापूर्वीही त्याने अनेक निरपराध अल्पवयीन हिंदू मुलींना लक्ष्य केले आहे. अशा प्रकारांकडे दुर्लक्ष होत राहिले, तर राष्ट्रीय ऐक्य आणि एकात्मतेला धोका निर्माण होऊ शकतो,” असे न्यायालयाने म्हटले आहे. “लव्ह जिहाद’ या संज्ञेला भारतीय न्याय संहिता किंवा ‘पोस्को’ कायद्यांतर्गत कायदेशीर मान्यता नाही. पण, असे प्रकार अन्यत्र आणि विशेषतः हरियाणात घडतात ही वस्तुस्थिती आहे,” असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. या खटल्यात शिक्षा झालेल्या शाहबाझ खानने 2019 साली त्याच्यावर धार्मिक भावना भडकविल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला होता, त्याचा बदला घेण्यासाठी हे कृत्य केल्याचे पोलीस चौकशीत कबुल होते. हिंदू समाजाची बदनामी करण्याचा हेतू ठेवूनच, असे संबंध निर्माण करण्यात आल्याचेही त्याने सांगितले. ‘लव्ह जिहाद’चे प्रकार देशाच्या विविध भागांत सातत्याने घडत आहेत, त्यास पूर्णपणे पायबंद बसलेला नाही. असे प्रकार रोखण्यासाठी हिंदू समाजाने सतर्क राहून, अशा घटना रोखण्याची नितांत आवश्यकता आहे.
 
पंजाब : दहा वर्षांत हिंदू नेत्यांच्या हत्या
 
पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवादी सक्रिय असून, त्यांच्याकडून हिंदू समाजाच्या नेत्यांवर हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. या घटना 2016 ते 2025 या कालावधीत घडल्या असून, त्यातील बहुतांश घटना या पंजाबमध्ये घडल्या आहेत. ‘बब्बर खालसा’, ‘खलिस्तान लिबरेशन फोर्स’ या दहशतवादी संघटनांच्या बरोबरच, डल्ला टोळीच्या गुंडांकडूनही हल्ल्याच्या घटना घडत आहेत. पंजाबमध्ये अजूनही दहशतवादी सक्रिय आहेत, हेच या दहा वर्षांमधील घटनांवरून दिसते. पंजाबमधील मोगा जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष मंगतराम मंगा यांची ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ या संघटनेच्या दहशतवाद्यांनी हत्या केली. मंगा हे आपल्या मोटरसायकलवरून जात असताना, दहशतवाद्यांनी त्यांना गोळ्या घातल्या. याप्रकरणी तीन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. मध्य प्रदेशात ग्वाल्हेर येथे जसवंतसिंह यांचीही त्यांच्या निवासस्थानाबाहेरच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या संदर्भात फुटीरतावादी अर्शदीप डल्ला यास कॅनडामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणी डल्ला याच्याशी संबंधित दोन मारेकर्‍यांना पकडण्यात आले. एका घटनेत ‘विश्व हिंदू परिषदे’चे नेते विकास प्रभाकर यांची, त्यांच्या मिठाईच्या दुकानात ‘बब्बर खालसा’च्या दहशतवाद्यांकडून गोळ्या घालून हत्या करण्यात आली. अन्य एका घटनेत काँग्रेस नेते बलजिंदर सिंह यांचीही, त्यांच्या घरातच गोळ्या घालून हत्या करण्यात आली. डल्ला टोळीने या हत्येची जबाबदारी स्वीकारली. अमृतसरमध्ये हिंदू नेते सुधीर सुरी यांची गोपाल मंदिराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली.
 
खलिस्तानी दहशतवादी सुधीर सुरी यांच्या मागावर होते. अन्य एका घटनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते रविंदर गोसाई यांची, लुधियानामध्ये त्यांच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या करण्यात आली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पंजाब प्रांताचे एक नेते ब्रिगेडियर (निवृत्त) जगदीश गगनेजा यांचीही दि. 6 ऑगस्ट 2017 रोजी, गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी दशमेश रेजिमेंटने स्वीकारली. डेरा सचा सौदाचे दोन अनुयायी सत्पाल शर्मा आणि त्यांचा मुलगा रमेश शर्मा या दोघांची ‘खलिस्तान लिबरेशन फोर्स’च्या दहशतवाद्यांनी लुधियानामध्ये हत्या केली. दि. 14 जानेवारी 2017 या दिवशी हिंदू नेते आणि श्री हिंदू तख्तचे अध्यक्ष अमित शर्मा यांची, दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या घालून हत्या केली. ‘खलिस्तान लिबरेशन फोर्स’ने ही हत्या घडवून आणल्याचा, तपास यंत्रणांचा दावा आहे. दि. 23 एप्रिल 2016 या दिवशी पंजाब शिवसेनेचे उपाध्यक्ष दुर्गा गुप्ता यांची खन्ना येथे हत्या झाल्याप्रकरणी, पोलिसांनी काहीजणांना अटकही केली. अटक केलेल्यांचा खलिस्तानी चळवळीशी निकटचा संबंध असल्याचे आढळून आले. 2016 ते 2025 या कालावधीत घडलेल्या या हत्या लक्षात घेता, खलिस्तानी शक्ती पंजाबमध्ये पुन्हा डोके वर काढू लागल्याचे दिसून येत आहे. पंजाबमधील या फुटीर शक्तींना, कॅनडामधील खलिस्तानवादी संघटनांचे पाठबळ मिळत असल्याचे वेगळे सांगायला नको! तसेच, खलिस्तानवादी फुटीर गटांना पाकिस्तानकडून मदत मिळत आहे हे जगजाहीर आहे. पंजाबमधील या फुटीर शक्तींचा तातडीने बिमोड व्हायलाच हवा.