बंदुका टाका, मुख्य प्रवाहात या ! वाढदिवशी मुख्यमंत्री फडणवीसांचे माओवाद्यांना आवाहान

    22-Jul-2025   
Total Views |

गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी आपला वाढदिवस गडचिरोलीत साजरा करताना, माओवाद्यांना बंदूक टाकून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “गडचिरोलीत माओवाद्यांची नाळ तुटली असून, आता जंगलात मोजके लोकच राहिले आहेत. त्यांनी बंदूक टाकून मुख्य प्रवाहात सामील व्हावे, त्यातच त्यांचे भले आहे. आम्ही गडचिरोलीला माओवादमुक्त करू”, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गडचिरोली येथील लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडच्या विविध प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणी कार्यक्रमात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, “गडचिरोलीत विकासकामांचे भूमिपूजन झाल्यावर दुसऱ्या दिवशी सोशल मीडियावर आदिवासींच्या जमिनी लुटल्या जात असल्याच्या पोस्ट प्रसारित झाल्या. चौकशीत असे आढळले की, या पोस्ट कोलकात्यातून केल्या गेल्या आणि त्यात महाराष्ट्रातील कोणीही नव्हते. अशा लोकांपासून सावध राहावे. गडचिरोलीतील जल, जमीन आणि जंगलाचा विनाश होऊ देणार नाही. महाराष्ट्रातील पहिली स्लरी पाइपलाइन आणि ग्रीन ट्रान्सपोर्टेशनद्वारे प्रदूषणमुक्त वाहतूक सुरू झाली आहे. गडचिरोली हा महाराष्ट्रातील ग्रीन जिल्हा आहे. येत्या दोन वर्षांत २ कोटी झाडे लावण्याचे आणि आज ४० लाख वृक्षलागवडीचा शुभारंभ करत आहोत”, असेही फडणवीस म्हणाले.

“गडचिरोलीला स्टील हब बनवण्याचे स्वप्न साकार होत आहे. २०१५ मध्ये येथे खाणकाम सुरू झाले, पण स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी स्टील इकोसिस्टम विकसित करण्याचे निर्देश लॉयड्स मेटल्सला दिले. कोनसरी गावातील लोकांनी जमिनी दिल्या, आणि आज १४ हजार तरुण-तरुणी येथे काम करत आहेत. यापैकी १२ हजार महिला व्हॉल्व्हो ट्रक चालवून ५५ हजार रुपये कमावत आहेत”, असेही त्यांनी सांगितले.

चीनपेक्षा कमी किमतीत दर्जेदार स्टील निर्माण करू

- फडणवीस यांनी सांगितले की, गडचिरोलीत राजमुंदरीसारखी नर्सरी विकसित होत असून, १ कोटी झाडांपैकी ८० टक्के झाडे जगतील. येत्या ३० महिन्यांत एकात्मिक स्टील प्लांटमुळे २० हजार लोकांना रोजगार मिळेल. गोंडवाना विद्यापीठातून प्रशिक्षित अभियंते येथेच नोकऱ्या मिळवतील.

- “ऑस्ट्रेलियातील कर्टिन विद्यापीठातून विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. शेअर सर्टिफिकेट्समुळे स्थानिक भागधारक होतील. आरोग्यासाठी सरकारने ५ लाखांचा विमा दिला आहे, पण हॉस्पिटल नसेल तर त्याचा उपयोग काय? त्यामुळे लॉयड्स मेटल्सच्या हॉस्पिटलमध्ये ५ लाखांच्या विम्याचा लाभ देऊ,” अशी घोषणा फडणवीस यांनी केली.

- फडणवीस म्हणाले, “चीनपेक्षा कमी किमतीत दर्जेदार स्टील निर्माण करू. कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा प्रयत्न आहे. गडचिरोली हा माओवादी जिल्हा म्हणून ओळखला जायचा, पण आता अधिकारीही येथे येण्यास तयार आहेत. बाबासाहेबांच्या संविधानासोबत आम्ही आहोत, हे जनतेने दाखवून दिले.”


सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.