विक्रमी १०२ रोजगार मेळावे घेत साजरा झाला मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस - कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांची अभिनव संकल्पना

    22-Jul-2025   
Total Views |

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कौशल्य, रोजगार व नाविन्यता विभागाने आयोजित केलेल्या महाराष्ट्रव्यापी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यात विक्रमी ५७ हजार तरुणांनी नोंदणी केली. या १०२ मेळाव्यांमधून २७ हजार तरुणांना एकच दिवशी रोजगार मिळाला. राज्यातील तरुणांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस अविस्मरणीय ठरावा, त्यांच्या करिअर मध्ये नवा अध्याय सुरु व्हावा, या उद्देशाने कौशल्य विभागाने हा अभिनव उपक्रम राबवला असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.

मुंबईतील गावदेवी येथील शारदा मंदिर हायस्कूलमध्ये आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात ते बोलत होते. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मुंबई शहर व शारदा मंदिर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला असून राज्यभर १०० मेळावे आयोजित करण्यात आले होते.

विकासाची दूरदृष्टी असलेले आणि महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर पोहचवणारे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांच्या रोजगारावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने हा उपक्रम राबवला असल्याचेही मंत्री लोढा यांनी सांगितले. महाराष्ट्र आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यातून राज्यातल्या हजारो तरुणांचे स्वप्न साकार होत असून उज्जवल भविष्याकडे त्यांची वाटचाल सुरू झाली आहे.

मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनात यापुढे ही असे उपक्रम सुरूच राहतील असा विश्वास मंत्री लोढा यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात विविध ठिकाणी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यातून हजारो तरुणांना खाजगी तसेच शासकीय महामंडळात काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे. औद्योगिक, माहिती तंत्रज्ञान, विमा, लॉजीस्टिक, व्यवस्थापन आणि सेवा क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध होत आहेत. मुंबईतील गावदेवी इथल्या शारदा मंदिर हायस्कूल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात एकूण २५ अस्थापणांनी सहभाग घेतला यात पाच शासकीय महामंडळाचा ही सहभाग होता. तसेच पाचशे युवक युवतींनी या मेळाव्यात नोंदणी केली.

रोजगार मिळवून देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असला तरी, तरुणांना शासकीय योजनांची माहिती तसेच स्वयं रोजगाराबाबत समुपदेशन ही कौशल्य विभागा मार्फत सुरू असल्याची माहिती कौशल्य विभागाचे सहायक आयुक्त शैलेश भगत यांनी यावेळी दिली. कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी विद्या शिंगे आणि मुकेश संखेही यावेळी उपस्थित होते.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.