कल्याण : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मंगळवारी वाढदिवस. त्यानिमित्ताने भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याचाच एक भाग म्हणून कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील 5 ही मंडळांमध्ये रक्तदान शिबिर राबवण्यात आले. तर कल्याण विकास फाउंडेशनच्या माध्यमातून जलशुद्धीकरण आणि परिसर स्वच्छता अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आज राज्यभरात अनेक सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र भाजपातर्फे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यातील भाजप मंडळांकडून रक्तदान शिबिर घेण्यात आले. कल्याण पश्चिमेतील जुने कल्याण मंडळाचे अध्यक्ष अमित धाक्रस, नविन कल्याण मंडलाचे अध्यक्ष स्वप्निल काठे, मध्य कल्याण मंडल, मोहने मंडल अध्यक्ष नवनाथ पाटील आणि टिटवाळा मंडल अध्यक्ष शक्तीवान भोईर यांच्याकडूनही या पाच ही मंडलांमध्ये रक्तदान शिबिर संपन्न झाले. ज्यामध्ये अनेक रक्तदात्यांसह भाजपच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होत सामाजिक बांधिलकी जपल्याचे दिसून आले.
कल्याण विकास फाउंडेशनतर्फेही सामाजिक उपक्रमांद्वारे मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा...
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कल्याण विकास फाउंडेशनच्या माध्यमातूनही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. माजी आमदार नरेंद्र पवार आणि कल्याण विकास फाउंडेशनच्या अध्यक्ष हेमलता पवार यांच्या पुढाकाराने कल्याण पश्चिमेमध्ये जलशुद्धीकरण आणि परिसर स्वच्छता अभियानाला आजपासून प्रारंभ झाला. या उपक्रमांतर्गत शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांच्या पाण्याच्या टाक्यांची नामांकित कंपनीमार्फत स्वच्छता केली जाणार आहे. यासाठी संबंधित गृहनिर्माण सोसायटीला एक छापील अर्ज भरून कल्याण विकास फाउंडेशनकडे द्यायचा आहे. याचसोबत गृहनिर्माण सोसायटी परिसरात कीटक नाशक आणि धूर फवारणीही या उपक्रमांतर्गत केली जाणार आहे.
पावसामुळे बऱ्याचदा अशुद्ध आणि गढूळ पाणी पुरवठा येऊ लागतो. ज्याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होऊन विविध साथीचे आजार पसरण्याची भीती असते. नागरिकांच्या आरोग्याचा धोका हा धोका टाळण्यासाठी कल्याण विकास फाउंडेशनने हा सामाजिक उपक्रम सुरू केल्याची माहिती माजी आमदार नरेंद्र पवार यांनी दिली. तर त्यासोबतच परिसराची स्वच्छता हादेखील आरोग्याच्या बाबतीत सर्वात महत्त्वाचा घटक असून हे दोन्ही उपक्रम आयोजित करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
या सर्व उपक्रमांमध्ये भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.