
गडचिरोली : पिकविम्याबाबत यापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी मंगळवारी पुन्हा वादग्रस्त विधान केले. “शासन शेतकऱ्यांकडून एक रुपया घेते, पण शेतकऱ्यांना एक रुपया देत नाही. मग भिकारी कोण? शासन भिकारी आहे, शेतकरी नाही”, असे ते म्हणाले.
कोकाटे यांच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, “कोकाटे यांचे वक्तव्य मी ऐकलेले नाही, पण असे वक्तव्य केले असेल तर ते चुकीचे आहे. कोणत्याही मंत्र्याने असे बोलणे अयोग्य आहे. पिकविम्याबाबत चुकीची माहिती पसरली आहे. पिकविम्याची जुनी पद्धत शेतकऱ्यांपेक्षा विमा कंपन्यांना जास्त फायदेशीर होती. त्यामुळे आम्ही त्यात सुधारणा केल्या. याशिवाय, कृषी क्षेत्रात दरवर्षी ५ हजार कोटी, म्हणजेच पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल.”
महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीबाबत फडणवीस म्हणाले, “इतर विकसनशील राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था चांगली आहे. आम्ही वित्तीय तूट ३ टक्क्यांपेक्षा कमी ठेवली आहे, तर इतर अनेक राज्यांची तूट ४-५ टक्के आहे. कर्जाच्या बाबतीतही महाराष्ट्र २५ टक्क्यांपेक्षा कमी आहे. आव्हाने असली, तरी आपली स्थिती स्थिर आहे”, असेही त्यांनी सांगितले.