कांदळवनाच्या देशा

    21-Jul-2025
Total Views |

महाराष्ट्राची किनारी संरक्षण भिंत म्हणजे कांदळवन. खारफुटी, चिप्पीचे जंगल अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाणारे हे जंगल म्हणजे किनारी लोकांसाठी रोजगारनिर्मितीचा ठेवा. येत्या आठवड्यातील दि. 26 जुलै रोजी आंतरराष्ट्रीय कांदळवन दिनानिमित्त या समृद्ध वनाची ओळख करून देणारा हा लेख

जिथे नद्या आणि समुद्र एकत्र येतात, त्या खाडीच्या अधिवासात, निसर्गाच्या अद्भुत परिसंस्थेचा जन्म होतो. त्यालाच ‘कांदळवन’ असं म्हटलं जातं. गर्द हिरव्या पानांनी आच्छादलेल्या या वनसंपत्तीत प्राणी, पक्षी, वनस्पती, जलचर यांचे अधिवास कार्यरत असतात. जगभरातील 112 देशांचा उष्ण कटिबंधीय आणि समशीतोष्ण कटिबंधीय प्रांत कांदळवनाने व्यापला आहे. यात भारतातल्या सुमारे 6 हजार, 794 चौ. किमी क्षेत्रात आजही त्यांच्या हिरवाईने निसर्गाला सौंदर्य प्राप्त होतं.

भारतातील कांदळवनात 34 मोठ्या, तर 20 छोट्या खारफुटी वनस्पतींच्या प्रजाती आढळतात. या कांदळवनांच्या सोबतीने  अनेक वनस्पतीदेखील वाढतात. निसर्गातून माणूस शिकतो याचा खरा अर्थ खारफुटीच्या सान्निध्यात आल्यावर कळतो. साधारणतः दलदली भागात कांदळ (Rizophora mucronta) आणि (Rizophora apiculata)  हे दलदली वृक्ष बघायला मिळतात. कोकणातल्या खाडींच्या ठिकाणी यांच्या दोन प्रजाती आढळतात. पानातला फरक वगळता दिसायला दोन्ही सारख्याच. त्या आधारमुळांच्या  जोरावर वाढतात. दलदली भागात खोलवर जात काहीशा अंतरावर, पानांच्या अफाट रानसौंदर्यानं त्यांची आधारमुळे झाकून जातात. एखादी इमारत तयार करण्यासाठी जमिनीत खांब उभारण्याचं तंत्र या वनस्पतीकडूनच माणसांना मिळालं असावं. फरक इतकाच की, इमारतीखाली जसं वाहनतळ असतं वाहनांसाठी, तसंच यांच्याआधारमुळात जीवनतळ असतं पाण्यातील जीवजंतूसाठी. खारफुटीच्या या वनात पानांमध्येदेखील बदल दिसून येतो. आकाराने किंचित अंड्यासारखी, जाडसर असणारी पानं या कांदळवनात पाहायला मिळतात. तिवराच्या झाडाकडे पाहिलं, तर याची सत्यता पटते. सभोवतालच्या वातावरणाशी एकरूप होऊन आपल्या पानांमध्ये त्यांनी मीठ ग्रंथी तयार केल्या. झाडाच्या पानांवर चकाकणारा असा पांढरा थर दिसून येतो. तो त्यांनी निर्माण केलेल्या मिठाचा असतो. श्वास घेण्यासाठी चिखलातून श्वसनमुळे तयार केली. तीदेखील एक ते दोन किमी अंतरावरून. कांदळवनांसोबत मध्येच झुडपाझुडपात कडुमेहंदीच्या पांढर्‍या फुलांचा ताटवा दिसू लागतो. ती दिसायला जेवढी सुंदर, तेवढीच औषधीदेखील.


चिपीच्या सहा जाडसर हिरव्या निदलपुंजांवर गोलाकार घुमटीत, पांढर्‍या व्रुंत्तांच्या जाळ्यामध्ये बंदिस्त झालेल्या, पाकळ्याविरहित फुलांकडे सहजच मन आकर्षित होतं. आतून हिरव्यागर्द वर्तुळाला मध्येच कुक्षीव्रुंताचा  आधार मिळतो अन् त्या आधारावर सहा गडद गुलाबी रंगांच्या त्या पाकळ्या आहेत की काय, असा भास होतो. मात्र, हेच त्या फुलाचे वैशिष्ट्य आहे. काहीशा पाणथळ जागेत हिरव्या पानांच्या फांद्यांमधून किर्पा  ही वनस्पती वाढते. अन् खारफुटीच्या वनांत मधमाश्या आणि पाखरांची कृपा होते. अगदी अबोलीच्या आकाराएवढी, पाच पाकळ्यांची, पांढर्‍या रंगाची फुलं एकआड एक फुलून येतात आणि त्यांच्या तालावर मुंग्यांची, मधमाश्यांची भुणभुण सुरू होते. खारफुटीच्या वनात थोडसं आत गेल्यावर सुगंधाच्या भरगच्च तुरेदार पांढर्‍या फुलांचा सुगंध मन मोहवून टाकतो. या खारफुटीच्या जंगलात जाताना सावकाश, काळजीपूर्वक जावं लागतं. कारण मारंडीसारखी ही काटेरी पानांची वनस्पती क्षणातच आपला घात करू शकते. काही ठिकाणी या वनस्पतीला ’वाघाटी’देखील म्हटलं जातं. कमी-अधिक आकाराच्या काटेरी पानांच्या खोडावर जांभळ्या रंगाची सुंदर फुले फुलतात. पांढर्‍या रंगाच्या सततच्या जाणिवा मग या फुलामुळे पुसल्या जातात.

छोट्या छोट्या गुलाबी रंगांच्या किरकिरीच्या शेंगा फांद्यांवर वारा आला की हलतात. परिपक्व झालेली एखादी काटेरी टोकांची शेंग उन्हाळ्याच्या दिवसांत झाडापासून वेगळी होते आणि पाण्याच्या प्रवाहात वाहून चिखलात जाऊन अडकते आणि तिथेच नव्या किरकिरीचा जन्म होतो. असच अपत्यजनन र्हतभर उंच वाढलेल्या कांदळीच्या शेंगांमधूनदेखील घडून येत. हूरीचा पाला क्षणात जीवाला हुरहुर लावून जातो. कारण चुकूनदेखील या वनस्पतीच्या पानांचा चिक हातावर पडला, तर हाताची आग होते. कदाचित म्हणूनच जंगल सफारीत लोच्या करणारी ही वनस्पती शास्त्रीयदृष्ट्या ‘एक्झोकेरिया अगालोच्या’ म्हणून नावारूपास आली. कांदळवनांच्या सोबतीने आपल्या माहितीतील वृक्षवल्लीदेखील वाढते. सागरगोट्यासारखी काटेरी वनस्पती करंजीच्या आकाराच्या शेंगेमध्ये राखाडी रंगाचे दहा-बारा सागरगोटे निर्माण करते. कठीण कवचाचे सागरगोटे पूर्णत्वास येऊन पाण्यावर अलगद तरंगतात आणि पोषक वातावरण मिळाले की बरेच वर्षांनीदेखील रुजून येतात.


सागरगोटा म्हणजे बाळंतकाढ्यातील महत्त्वाची औषधी. काहीसं सागरगोट्यासारखं पुनरुत्पादनाचं तंत्र करंजाच्या  शेंगांमध्येही विकसित झालेलं दिसून येतं. मात्र, तरंगत्या करंजाच्या शेंगा, कमी-अधिक वर्षांनी रुजून येतात, त्या त्यांच्या कठीण आवरणाच्या संरक्षणामुळे. पांढर्‍या पाकळ्यांत बहरून आलेली मिरजोळी  छोट्या छोट्या पानांनादेखील आपल्या मोहराने झाकून टाकते. बोरीच्या झाडावर पिकलेल्या तपकिरी बोरांचा आस्वाद घेणारा रानपक्षी माणसांची चाहूल लागताच भुर्रकन उडून जातो. कांदळवनाच्या आश्रयात खेकड्यांच्या अनेक प्रजाती टिकून राहिल्या आहेत. नदी आणि समुद्राच्या पाण्याच्या तुलनेत खारफुटीतील पाणी गरम असते. त्यामुळे अनेक प्रकारचे जलीय जीव या खारफुटीच्या मुळांमध्ये अंडी घालण्यासाठी येतात. घार, तारवाली पाकोळी, तिबोटी खंड्या, धनेश, बुलबुल पक्षी आवर्जून या वनसंपदेला भेट देतात. ही विलक्षण अशी परिसंस्था खाडीलगतच्या परिसराचे संरक्षण करते. प्रचंड त्सुनामी असो किंवा तुफानी वादळ, मात्र कांदळवनांमुळे समुद्रकिनारे अजूनही सुरक्षित आहेत. आज ही वनसंपदा डौलाने उभी आहे. या कांदळवनांचं संवर्धन करणं तितकेच गरजेचे आहे. मागील काही वर्षांत कांदळवनांच्या क्षेत्रात मानवी हस्तक्षेप अवाजवी वाढला. माणसाच्या जमिनीच्या हव्यासापोटी कांदळवनांचं काही क्षेत्र नष्ट झालं. पर्यटनाचा पाठ घेत कांदळभुमीत हॉटेल्सचा थाट मांडला गेला. पर्यायाने या परिसंस्थेच्या आश्रयातल्या नानाविध जीवांच्या अधिवासाची वाट बंद झाली. कांदळवनांच्या शेजारीच मत्स्यपालन, कोळंबीपालन, खेकडेपालन असे प्रकल्प सुरू केले गेले खरे, पण कांदळवनांचे क्षेत्र त्यामुळे कमी झाले.

आजही काही ठिकाणी जळणासाठी कांदळवनांची तोड केली जाते. कांदळवनांचे महत्त्व अधोरेखित करताना त्यांचं पर्यावरणातलं अढळ स्थान प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवं. सुदैवाने आपल्या महाराष्ट्राच्या कांदळवनात वाढ झाली आहे. मात्र, या परिसंस्थेतील पशुपक्ष्यांची ओळख मात्र व्हायची राहिली आहे. नद्यांच्याआणि समुद्राच्या पाण्यात, काट्याकुट्यात, चिखलात निर्माण झालेल्या या परिसंस्थेतील जीवनशैली पाहणं ही निसर्गप्रेमींसाठी पर्वणीच. आपल्याच जवळ असणारी ही परिसंस्था अभ्यासणं हेदेखील तितकंच महत्त्वाचं. आजही कांदळवनं आपल्या निळ्याशार समुद्राच्या खारटपणात स्वतःची आधारमुळ घट्ट करत, हिरव्यागर्द पानांचा शृंगार करून पशुपक्षांच्याहितासाठी उभी आहेत. गरज आहे त्यांना जाणून घेण्याची, त्यांचं संवर्धन करण्याची अन् माणसातल्या निसर्गप्रेमाला पुन्हा जागं करण्याची.

परेश गुरव
(लेखक - साहाय्यक प्राध्यापक, वनस्पतीशास्त्र विभाग, गोगटे जोगळेकर महाविद्यालय, रत्नागिरी आहेत.)