एअरटेलचा‘परप्लेसीटी एआय’ फक्त टीझर!

    21-Jul-2025   
Total Views |

समोर एखादा दिग्गज खेळाडू किंवा स्पर्धक असेल, तर तुमचे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी तुम्हाला नव्या रणनीतींची आवश्यकता असते. ‘एअरटेल’ आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी सध्या तशीच पद्धत अवलंबत आहे, त्याचे हे आकलन.


टेलिकॉम क्षेत्रात जिओच्या येण्याने क्रांती घडली, अनेक दिग्गज कंपन्यांचे कंबरडे मोडले. भारतात ’टुजी स्पेट्रम’नंतर आलेल्या एअरटेल, आयडिया, व्होडाफोन, युनिनॉर, हच, ऑरेंज यांसारख्या कंपन्यांनी बाजारात चांगलाच जम बसवला होता. त्यातून निर्माण झालेल्या स्पर्धेमुळे, ग्राहकांनाही वाजवीदरात टेलिकॉम सेवा मिळू लागली होती. सर्वांत आधी तर टाटा इंडिकॉम या कंपनीने, दोन वर्षे मोफत ‘इनकमिंग सेवा’ ही विपणन रणनीती बाजारात आणली. या कारणास्तव भारताच्या गावाखेड्यांपर्यंत जिथे नेटवर्क जाईल, तिथवर मोबाईल सेवा पोहोचली. देशातील दळणवळण क्षेत्रात यापूर्वी पोस्टकार्ड, टपाल इत्यादी उपलब्ध होतीच मात्र, त्यावेळी एसटीडी आणि पीसीओ सेवाही नायानायावर दिसत असे. मध्यमवर्ग आणि उच्चभ्रू वर्गाकडेच त्याकाळी टेलिफोन सेवा होती.

टाटा इंडिकॉमनंतर रिलायन्स टेलिकॉमने ‘लाईफ टाईम फ्री’ ही सेवा बाजारात आणली. सुरुवातीला या दोन्ही सेवा ‘सीडीएमए’ प्रणालीवर उपलब्ध होत्या, कालांतराने ‘जीएसएम’ सेवाही सुरू झाली. याद्वारे मोबाईल क्षेत्रात भारताने पुढचे पाऊल टाकले आणि वर नमूद केलेल्या एअरटेलसहित सर्व कंपन्यांनी आपली पाळेमुळे रोवण्यास सुरुवात केली. प्री-पेड आणि पोस्टपेड सेवा देणार्या या कंपन्यांचा भार हा विपणन, वितरण आणि ब्रॅण्डिंगकडे असे. शिवाय ग्राहकांना पोस्टपेड सेवा घेण्यासाठी मोठमोठी कॉलसेंटर्स, बीपीओ ऑफिसमधील यंत्रणा कामी लागे. याकाळात येणार्या बिलांची रक्कम पाहून तर, कधीकधी ग्राहकांना घाम फुटायचा. हा ट्रेंड सुमारे दीड दशकांहून अधिक काळ सुरू राहिला. बाजारात तोपर्यंत जिओसारखा विशालकाय खेळाडू अवतरला नव्हता. त्याकाळी मोबाईल रिचार्ज करण्यासाठी दहा रुपयांपासून ते ५०० ते एक हजार रुपयांपर्यंत कुपन विक्री केली जात असे. ज्यात कधी रोमिंग सेवा, इंटरनेट सेवा, फ्री कॉलिंग, फ्री एसएमएस अशा प्रकारचे कुपन उपलब्ध होते.

दि. ५ सप्टेंबर २०१६ रोजी जिओने सर्वांत आधी फोर-जी सेवा बाजारात आणली. ही सेवा त्यांच्या कर्मचार्यांसाठी डिसेंबर २०१५ सालापासूनच उपलब्ध होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, इतर कंपन्यांनी या काळात येणार्या आव्हानाकडे दुर्लक्ष का केले? की ‘फोर-जी’ स्पेट्रमकडे दुर्लक्ष का करत राहिले? हा प्रश्न नेहमी पडतो. जिओची घोडदौड जेव्हा ‘फोर-जी’कडे सुरू होती, त्याकाळात वरील सर्वच कंपन्या आपला ‘थ्री-जी’ बाजारातील हिस्सा वाढविण्यासाठी धडपडत होत्या. एअरटेलसारखी कंपनी जिचा बाजारपेठेतील हिस्सा हा २३.३ टक्के होता, त्यांच्याकडूनही रिलायन्स जिओचे आव्हान समजण्यास कसली चूक झाली? हादेखील प्रश्न पडतो. या खालोखाल वोडाफोन (१८.९५ टक्के) आणि आयडिया (१६.२७ टक्के) बाजारात तग धरून होते.

अर्थात जिओने वर्षभर मोफत सेवा देऊ केली आणि वेगवान ‘फोर-जी’ इंटरनेटसुद्धा. अर्थात याकाळात बाजारात ड्युअल-सिम (दोन सिमकार्ड) असलेले मोबाईलही उपलब्ध होऊ लागले होते. हा बदलही जिओच्या पथ्यावर पडला. जिओने बाजारपेठेत आपले स्थान मिळवले परंतु, ग्राहकांनी नवे जिओ सिमकार्ड खरेदी करत, आपला जुना क्रमांकही तोच ठेवला. हा बदलता ट्रेंड एव्हाना प्रत्येक शहरात पोहोचला होता. कॉलिंग आणि इंटरनेट मोफत असल्यामुळे, वेगाने या सेवेचा विस्तार देशभरात झाला.

कुपनद्वारे रिचार्ज करण्याच्या मानसिकतेत आता ग्राहक नव्हते. याकाळातच फिनटेक कंपन्यांनी बाजारात प्रवेश केला. या शर्यतीत वर्चस्वाची लढाई लढण्याऐवजी, नवे मैदान आणि नवा खेळ फोर-जीच्या रूपाने खेळवला. आता या शर्यतीत इतर कंपन्यांना तयारी शून्यातून करायची होती. याचदरम्यान ‘मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी’च्या नियमात आमूलाग्र बदल झाले. बाजाराशी स्पर्धा न करू शकल्याने, अनेक कंपन्यांनी आधीच बाहेरचा शोधला. त्यात उरले फक्त मोठे खेळाडू. त्यांनीही आपल्या ‘फोर-जी’ सेवेत उडी घेतली, तितयात जिओ ‘फाईव्ह-जी’कडे वळला. पूर्वीची व्होडाफोन-आयडिया आता ‘व्ही’ झाली. एअरटेलने जिओला टक्कर देण्यात आघाडी घेतली. कंपनीने फक्त टेलिकॉम क्षेत्रावर अवलंबून न राहता, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात क्रांतिकारी पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. त्याचदरम्यान फायबर नेटवर्कसहित एसट्रीम फायबर आणि एअर फायबर क्षेत्रात ही एअरटेल उतरला. एअरटेल आता मोबाईल सेवेसहित ब्रॉडबॅण्ड आणि मनोरंजन क्षेत्रातही आघाडीचा ब्रॅण्ड आहे. अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मचा पर्याय एअरटेलने ग्राहकांपुढे उपलब्ध करून दिला आहे. ‘फाईव्ह-जी’ विस्तारासाठी नोकिया, स्टारलिंक यांच्याशीही एअरटेलने भागिदारी केली आहे. एअरटेल लाऊड आणि सायबरसुरक्षा क्षेत्रातही आहे. डिजिटल व्यवहार क्षेत्रातही या कंपनीने विस्तार केला असून, यामध्ये फास्टटॅग, युपीआय, ई-वॉलेट, ई-विमा अशा सुविधाही दिल्या जातात. एसेफ सुविधेद्वारे एअरटेल सीसीटीव्ही कॅमेरा सुविधाही उपलब्ध करून देते.

या सर्व पसार्यात एअरटेलने विक्रमी पाऊल उचलले आहे. ‘एआय’ टूल असलेल्या ‘परप्लेसिटी’चे वार्षिक १७ हजार रुपयांचे सबस्क्रिप्शन मोफत देऊ केले आहे. तुमच्याकडे जर एअरटेलचे प्री-पेड, पोस्ट-पेड, ब्रॉडबॅण्ड आणि डीटीएच सेवा यापैकी काही असेल अर्थात तुम्ही ग्राहक असाल, तर तुम्हाला १७ हजारांची वार्षिक वर्गणी माफ होऊन ‘परप्लेसिटी’ची पेड सेवा वापरता येणार आहे. यासाठी ‘एअरटेल थॅस’ अॅप डाऊन लोड करावे लागेल. ज्यात रिवॉर्ड्स आणि ओटीटी यापैकी रिवॉर्ड हा पर्याय निवडून, ‘परप्लेसिटी प्रो ऑफर’ हा पर्याय निवडावा लागेल. ज्यात तुमच्या गुगल आयडी किंवा अॅपल आयडीद्वारे तुम्ही साईनअप करू शकता. ही ऑफर दि. १७ जानेवारी २०२६ रोजीपर्यंत उपलब्ध असणार आहे. वरकरणी पाहता हा छोटा बदल वाटेल मात्र, यापूर्वीचा इतिहास लक्षात घेता ही बदलत्या टेलिकॉम क्षेत्राची नांदी असू शकते.

अनेक रिसर्च आणि माहिती संशोधनासाठी ‘परप्लेसिटी’ हे ‘एआय’ टूल उत्तम पर्याय आहे. अनेक संशोधक, पत्रकार किंवा डेटा क्षेत्रात कार्यरत असणार्यांच्या गळ्यातील ताईत मानले जाते. प्रत्येक माहिती तीही योग्य स्रोतासहित उपलब्ध करून देणारे टूल. संशोधनाच्या भाषेत सायटेशनसहित माहिती उपलब्ध करून देणारे ‘एआय’ टूल म्हणून हे प्रसिद्ध आहे. अचूक माहिती, अचूक पडताळणी, संशोधनासाठी योग्य अशी या टूलची वैशिष्ट्ये आहेत. एअरटेलने जाहीर केलेल्या या ऑफरची चर्चा संपूर्ण समाजमाध्यमांसहित बाजारात आहे. त्याद्वारे एअरटेल भविष्यात आपला बाजारपेठेतील हिस्सा मजबूत करण्याचा प्रयत्न करणारच आहे मात्र, येत्या काळात ही स्पर्धा आणखी सकारात्मकतेकडे जाईल. ‘एआय’ हे भविष्य टेलिकॉम क्षेत्राला दिसले असून, त्यात नव्या बदलांची नांदी खुणावत आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे फिचर फोन ते ‘फाईव्ह-जी’पर्यंतचा प्रवास, आता ‘एआय’च्या एका नव्या वळणावर येऊन ठेपलेला आहे.

तेजस परब

मुंबई विद्यापीठातून एमएसीजेपर्यंत शिक्षण. वाणिज्य शाखेतून पदवी. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (वेब) म्हणून कार्यरत. पाच वर्षांपासून विविध वृत्तपत्रांमध्ये वार्ताहर व उपसंपादक पदाचा अनुभव. दोन प्रमुख वृत्तपत्रांतील निनावी सुत्रांच्या बातम्यांबद्दल संशोधन. डिजिटल मीडियासाठी लेखन. डिजिटल मार्केटींग विषयाचा अभ्यासक.