‘कन्यादान’ या सामाजिक संस्थेशी जोडले जात, थेट अध्यक्षपदाची धुरा सार्थपणे सांभाळत, शेकडो गरजू जोडप्यांची विवाहगाठ बांधून या जोडप्यांचे आयुष्य फुलविणार्या सुषमा सोनी यांच्याविषयी...आज सगळीकडे ‘डेस्टिनेशन वेडिंग’चा बोलबाला आहे. तर दुसरीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून, मोठमोठे विवाह सोहळ्यांचे आयाजन होते. मात्र, आजही एक सामाजिक स्तर असा आहे की, आर्थिक परिस्थितीमुळे पालक मुलींच्या लग्नासाठी मोठे कर्ज घेतात किंवा आपली आयुष्यभराची पुंजी मुलींच्या लग्नासाठी राखून ठेवतात. अशा गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सामूहिक लग्न सोहळे लावून देणार्या संस्था आशेचा किरण ठरतात. अशाच मुंबईतील मिरा-भाईंदर येथील ‘रायपूर धर्मलक्ष्मी जनसेवा संस्थान’ने ‘कन्यादान’ या उपक्रमातून, पाच हजार जोडप्यांच्या सामूहिक विवाहाचा विडा उचलल्याचे संस्थेच्या पूर्व अध्यक्ष आणि ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ या उपक्रमाच्या जिल्हा प्रकोष्ठ सुषमा सोनी सांगतात.
मिरा-भाईंदर येथे वास्तव्यास असणार्या सुषमा सोनी यांचा जन्म हैद्राबाद येथे झाला. हैद्राबाद येथे चौथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांचे कुटुंबीय मुंबईत स्थलांतरित झाल्याने, सुषमा आणि त्यांची सर्व भावंडे मुंबईत आली. हैद्राबाद येथील शिक्षणव्यवस्था आणि महाराष्ट्रातील शिक्षणव्यवस्था यामध्ये फरक असल्याने, सुषमा यांना शिक्षण पूर्ण करताना मोठ्या संघर्षाचा सामना करावा लागला. चौथीपर्यंत शिक्षण पूर्ण करूनही त्यांना, महाराष्ट्रात आल्यावर पुन्हा पहिल्या इयत्तेत प्रवेश घ्यावा लागला. त्यामुळे केवळ दहावीपर्यंतच शिक्षण घेऊन, सुषमा यांचा विवाह झाला. स्थलांतरणामुळे आपण चार वर्षे मागे पडल्याने, पदवीचे शिक्षण पूर्ण करू न शकल्याची खंत त्या आजही व्यक्त करतात.
विवाहानंतर एक गृहिणी म्हणून दैनंदिन कामातच रमणार्या सुषमा, २०१६ साली ‘कन्यादान’ या उपक्रमाशी जोडल्या गेल्या. सुषमा यांच्याच सोसायटीमध्ये राहणार्या एका गृहस्थांमुळे, त्यांचा या संस्थेशी परिचय झाला. त्यावेळी या संस्थेला सुरू होऊन केवळ एक वर्षाचा कालावधी लोटला होता. अशावेळी त्यांनी सुषमा यांना संस्थेच्या कार्यात हातभार लावण्याबाबत विचारणा केली. सुषमा यांनीही त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा करून, त्यांच्या संमतीने संस्थेच्या कार्यात सहभागी होण्यास होकार दिला. तेव्हापासून आजतागायत त्या संस्थेच्या कार्यात उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. सुषमा यांच्या सासरच्या मंडळींनीदेखील त्यांच्या या कार्यासाठी कायमच भक्कम पाठींबा दिला.
"एक लाख, ११ हजार रुपये किमतीच्या वस्तू या विवाह सोहळ्यात प्रत्येक नवविवाहित दाम्पत्यांना संसार सुरू करण्यासाठी दिल्या जातात. याचसोबत त्यांचा लग्नसोहळाही चांगल्यारितीने विधिवत संपन्न होतो. सर्व हिंदू जाती समूहांचे विवाह येथे एकाच मंडपात केले जातात. ’या विवाहसोहळा म्हणजे अत्यंत भावुक क्षण असतो. जेव्हा आम्ही त्या मुलींचे कन्यादान करतो, तेव्हा मी माझ्याच मुलीचे कन्यादान करते आहे, असे वाटते. आम्ही मुलींच्या सासरकडील कुटुंबीयांनाही या मुलींची काळजी घ्या, अशी विनंती करतो. त्या जोडप्यांच्या प्रत्येक सुख-दुःखात आम्ही सहभागी असतो,” असे सुषमा सोनी सांगतात.
इतकी वर्षे आज ‘बेटी बचाव, बेटी पढाव’चे काम आणि याचबरोबरीने ‘कन्यादान’ या उपक्रमात शेकडो जोडप्यांचा विवाह, या कार्यातून सुषमा यांना समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली. आज चार हजार महिलांच्या समूहाचे नेतृत्व सुषमा करतात. हे कार्य करत असताना, त्यांची मुले आणि कुटुंबीयांनाही सुषमा यांचा अभिमान वाटतो. "आईवडील जे कार्य करतात, यातूनच मुलांना संस्कार मिळतात. मुलंही चांगल्या कार्याचे अनुकरण करतात. समाजात आपली प्रतिमा चांगली असेल, तर आपल्या मुलांनाही सन्मान मिळतो. त्यामुळे नेहमी चांगले आणि निर्मळ कार्य करावे,” असे सुषमा आवर्जून सांगतात. आजतागायत ३५० जोडप्यांचे विवाह यशस्वीरित्या संस्थेच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत. तीन हजार महिला संपूर्ण देशातून या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. यात सर्वाधिक संख्या ही महाराष्ट्र आणि त्यातही मुंबईत आहे.
आज ‘कन्यादान’ या संस्थेच्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात आणि कोरोना काळातही सुषमा यांनी केलेल्या कार्याची दाखल घेत, स्थानिक आ. नरेंद्र मेहता यांनी सुषमा यांचे नाव ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ मोहिमेसाठी निवडले. गेली दोन वर्षे सुषमा या मोहिमेच्या जिल्हा प्रकोष्ठ अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. भविष्यातही लहान मुली, बालके आणि गरजू मुलींच्या शिक्षण, विवाह अशा विषयांवर काम करत राहणार असल्याचे, सुषमा आवर्जून सांगतात. ‘बेटी बचाव, बेटी पढाव’सारख्या अभियानातून, मुलींच्या जन्मापासून ते प्रौढ वयापर्यंत त्यांच्या शिक्षणाची काळजी घेत, पुढे ‘कन्यादान’ या उपक्रमातून मुलींची वैवाहिक जबाबदारी पार पडत, अनोखे मातृत्व जपणार्या सुषमा या समाजातील अनेक महिलांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहेत. त्यांचे हे कार्य असेच फुलत राहावे, यासाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून त्यांना अनेकानेक शुभेच्छा!