"मी फसवणूक केली असे कुणाला सांगितलेस तर तुला मंत्राने बकरी बनवेन,” अशी धमकी देणार्या मदारी मोहम्मद खान ऊर्फ खानबाबाला नुकतेच पोलिसांनी पकडले. दुसरीकडे बलरामपूरमध्ये १ हजार, ५०० मुलींचे धर्मांतरण करणार्या छांगूरबाबा पीरच्या भयंकर घटनेने अवघा देश हादरला. त्यानिमित्ताने पुण्यातील त्या घटनेचा धांडोळा घेणारा आणि पीरबाबा-बुवा यांच्या जाळ्यात नेमक्या हिंदू महिला का फसतात, याचा मागोवा घेणारा हा लेख...
बघ, जास्त बोलू नकोस. तुझी फसवणूक झाली, हे तू कुणाला सांगितलेस, तर मंत्र फुकून तुला बकरी बनवेन!” असे त्या खानबाबाने ऊर्फ मदारी मोहम्मद खानने म्हटल्यावर ती महिला घाबरली. न जाणो हा खानबाबा मंत्र फुंकेल, काही काळी जादू करेल आणि मला बकरी बनवेल, अशी भीती त्या महिलेला वाटली. बकरी बनण्यापासून सुरक्षित राहावे, म्हणून तिने पोलिसात तक्रार केली. आता याला काय म्हणावे? अंधश्रद्धा? हव्यास? भीती? अज्ञान की आणखी काही? ही घटना कुठे घडली, तर आपल्या पुण्यात!
ही घटना सविस्तर अशी की, ती गरीब विधवा होती. संसाराचा डोलारा सांभाळताना तिला नाकीनऊ आले. अशातच तिची ओळख खानबाबा ऊर्फ मदारी मोहम्मद खान याच्याशी झाली. या महिलेला त्याने जादू चमत्कार वगैरे सांगायला सुरुवात केली. मानसिकरित्या एकाकी असलेल्या या महिलेने तिची व्यथा सांगितली की, गरिबीमुळे तिला आणि तिच्या कुटुंबाला जगणे मुश्किल झाले. तिला या सगळ्यातून सुटण्यासाठी पैसे हवे होते, तर या खानने तिला सांगितले की, तो एक विशिष्ट पूजा करेल. त्यानंतर तो त्या महिलेला काळ्या कपड्यात बांधलेले एक मडके देईल. १७ दिवसांनंतर रात्री ११ वाजून २१ मिनिटांनी मडक्यावरचे कापड त्या महिलेेने काढायचे. खानबाबाच्या कृपेने त्या मडक्यात सोन्याची खाण मिळेल. सोन्याची खाण मिळावी, म्हणून या महिलेने या खानला २ लाख, ६० हजार रुपये दिले होते. तिने १७ दिवसांनतर बरोबर ११ वाजून २१ मिनिटांनी मडक्यावर बांधलेले काळे कापड काढले. मडक्यात सोन्याची खाण असेल, या विचारांनी ती आनंदी झाली. मात्र, मडके तर रिकामे होते. अर्थात, ते रिकामेच असणार होते. कारण, खानने तिला फसवले होेते. तिला अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढले होते. पुढे तिला "मंत्राने बकरी बनवेन,” ही धमकी दिली होती. पोलिसांनी त्याला पकडले. पण, त्याच्या जाळ्यात ही एकटीच महिला फसली असेल का? या अशा लोकांच्या जाळ्यात महिला का फसतात? गरिबी आहे, एकाकी जगणे आहे, या समस्या असूच शकतात. पण, या समस्या आहेत म्हणून सारासार विचार करण्याची कुवतच मेलेली असते का?
या बाबांचे गौडबंगाल काय असेल? पुण्यातली ही घटना पाहून ‘ती’ सत्य घटना आठवली. त्यावेळी ‘लव्ह जिहाद’ शब्द ऐकला नव्हता, त्याबद्दल काही चर्चाही नव्हती. मैत्रिणीच्या मैत्रिणीचे एका मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. काही वर्षांनी ते दोघे विवाह करणार होते. पण, तिला खात्री हवी होती की भविष्यात तो तिच्याशीच विवाह करेल. ही खात्री कोण देणार? तिने ट्रेनमध्ये एक पोस्टर वाचले. ‘करणी, वशीकरण, प्रेमसंबधांत १०० टक्के खात्री-बाबा बंगाली.’ तिने या बंगाली बाबाची मदत घ्यायचे ठरवले. १६-१७ वर्षांचे वय. सगळ्या मैत्रिणी त्याच वयाच्या. कोण कुणाला समजावणार? ती त्या बंगाली बाबाकडे गेली. नंतर अनेकदा पूजा करायची आहे वगैरे सांगत ती त्या बाबाकडे जाऊ लागली. एकदा मैत्रिणींनी तिला विचाराले, "काय गं, तुझी जादू तुझ्या बॉयफ्रेंडवर चालेल, अशी दिली का त्या बाबाने खात्री? झाले का वशीकरण?” ती मुलगी नेहमी म्हणे, "चालू आहेत प्रयत्न.” मात्र काही महिन्यांनंतर कळले की, त्या १७ वर्षांच्या मुलीने त्या ४०-४५ वर्षांच्या बंगाली बाबासोबत निकाह केला. पुढे काय झाले, हे कळले नाही...
हिंदू महिला आणि मुलींना फसवण्याचे षड्यंत्र कसेही आणि कुठेही रचले जाऊ शकते, हेच सांगणार्या या दोन प्रातिनिधिक सत्य घटना. या दोन घटनांमध्ये स्पष्ट आहे की, समोरच्या गुन्हेगाराने त्यांची ओळख लपवलेली नव्हती. पीडित महिला-मुलींनी भावनेच्या आहारी जाऊन या लोकांचा आश्रय स्वतःच घेतला होता. आजही मोठ्या प्रमाणावर समाज अंधश्रद्धेचा बळी ठरताना दिसतो.
बलरामपूर, उत्तर प्रदेशची घटना सर्वश्रुत आहेच. मुंबईच्या हाजीअली दर्ग्याबाहेर जादूई अंगठी विकणारा छांगूरबाबा हा प्रत्यक्षात १ हजार, ५०० मुलींचे धर्मांतरण करणारा गुन्हेगार होता. हे सगळ्या माध्यमांवर प्रसिद्ध झाले, तरीसुद्धा गावखेडे तर सोडाच, शहरांमध्ये काय दृश्य आहे? गल्लोगल्लीच्या पीरबाबा मजारवर डोके ठेवून तिथल्या कोणत्यातरी बाबा-बुवाने फुंकर मारून पवित्र (?) केलेले पाणी घेण्यासाठी हिंदू महिलांची झुंबड उडते. चर्च आणि मजार यांच्या जादूवर डोळे बंद ठेवून विश्वास करणार्यांमध्ये आपले हिंदू बांधव, त्यात भगिनी जास्तच आहेत. नवरा लक्ष देत नाही, नवरा दुसर्या बाईच्या नादाला लागला, मूल होत नाही, मुलीच जन्माला येतात किंवा घरात बरकत नाही वगैरे वगैरेसाठी कोणत्यातरी बाबा-बुवावर आणि त्यांच्या जादूटोण्यावर विश्वास ठेवणार्या आयाबायांना पाहिलेले आहे. हिंदू असूनही कोणातरी बाबा किंवा फादरने सांगितले म्हणून मुस्लीम किंवा ख्रिस्ती धर्मंपरंपरा पाळत असलेल्या या आयाबाया. त्यांनी हिंदू धर्म त्यागलेला नाही, पण त्या केवळ कागदोपत्री हिंदू आहेत. अंधश्रद्धेपायी त्यांचा गैरहिंदू धर्मावरचा विश्वास वाढत चालला आहे. अनेकदा या महिलांच्या पतींचे म्हणणे असते, तिचा विश्वास आहे, सगळे देव सारखेच! बाबा-बुवाच्या आशीर्वादाने एखादवेळेस भलेही होऊ शकते.
पण, तसे काही होत नसते. पुढे-मागे या विवाहित महिलांनी धर्मांतरण तरी केलेले असते किंवा त्या बाबा-बुवाच्या सर्वार्थाने शोषणाच्या साधन तरी बनलेल्या असतात. ‘लव्ह जिहाद’ची पाळेमुळे इथेही कुठेतरी रूजलेली असतातच. तसेही महिलांच्या शोषणाचा मागोवा घेतला, तर त्यातल्या अनेक घटनांची मुळे ‘लव्ह जिहाद’वरच येऊन थांबतात. नुकतीच घडलेली ती घटना.
पुण्याहून परभणीला जाणार्या ट्रॅव्हल बसमध्ये ते युवक-युवती आणि त्यांच्यासोबत नवजात अर्भकही होते. बस सुरू झाली. काही वेळाने त्या युवतीने तिच्याकडच्या नवजात अर्भकाला चक्क बसबाहेर फेकले. अर्भकाला रस्त्यावर फेकताना एका महिलेने ते पाहिले आणि तिने पोलिसांशी तत्काळ संपर्क साधला. पोलीस त्या ट्रॅव्हल्सच्या मागावर निघाले. त्यांनी त्या जोडप्याला पकडले. एका आईने आपल्या बाळाला असे का फेकले असेल? या घटनेचा मागोवा घेताना आढळले की, स्वतःच्या लेकराला असे निष्ठूरपणे बसबाहेर फेकणारी ती तरुणी ही ‘लव्ह जिहाद’च्या विळख्यात सापडलेली दिसते. या १९ वर्षीय तरुणीचे नाव होते, रितिका मिलिंद ढेरे आणि ती ज्याच्यासोबत पुण्यात राहात होती, त्या पुरुषाचे नाव आहे, अल्ताफ मेहुद्दीन शेख. पोलिसांनी या दोघांनाही पकडले. हे दोघे मूळचे परभणीचे. पुण्यात ते दीड वर्षांपूर्वी राहायला आलेे. याचाच अर्थ ती मुलगी तेव्हा साडे-सतरा वर्षांची असणार. अल्पवयीन रितिका घरदार, समाज, शहर सगळं सगळं सोडून अल्ताफसोबत पुण्याला आली. पण, काय झाले? एक बाळ झाले आणि मग अल्ताफने हात वर केले, असेच म्हणावे लागेल. मुलाचे भरणपोषण कसे करावे, अशी विवंचना होती. त्यातूनच या बाळाची जबाबदारीच नको, म्हणून त्यांनी या बाळाला बसबाहेर फेकले, असे रितिकाचे म्हणणे.
परभणीचे हे दोघे पुण्यात राजरोसपणे राहात होते. पुण्यातच का जवळजवळ सगळ्याच शहरांत अशा अनेक मुली सापडतील. या मुलींचे पुढे काय होते, हा एक गंभीर प्रश्न आहे. कोणत्यातरी बाबा-बुवाच्या मजारीवरच्या पूजेमुळे सोन्याची खाण सापडेल, अशी अंधश्रद्धा बाळगणार्या महिला आणि कोणत्यातरी अल्ताफ-अब्दुलवर आंधळा विश्वास ठेवून सगळं घरदार सोडणार्या या मुली वेगवेगळ्या शहरांतल्या असतात. ना त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी सारखी, ना त्यांची शैक्षणिक अर्हता समान असतेे. मात्र, त्यांच्यात समानता आहे ती म्हणजे, त्यांच्या स्वतःच्या धर्माबद्दलचे या मुली-महिलांमध्ये असलेले अज्ञान, भोळेपणाच्या आडचा मूर्खपणा आणि त्यांच्याबाबत त्यांच्या घरच्यांची असलेली उदासीनता आणि या सगळ्यातून उद्भवणारी दयनीय परिस्थिती. समानता असते, ती महिलांच्या या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेणार्या त्या गुन्हेगारांच्या मानसिकतेची. तीच मानसिकता ज्या मानसिकतेमध्ये त्या गुन्हेगारांच्या मनात, विचारांत आणि कृतीमध्येही रूजलेले असते की, हिंदू मुलींना फसवले की सवाब (पुण्य) मिळते. ते त्यांना जे शिकवले जाते, त्याला जागतात.
असो. गरीब, एकाकी पडलेल्या बांधवांचे दुःख ऐकण्यासाठी, त्यातून त्याची सोडवणूक करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? अर्थात ‘ऐसी कळवळ्याची जाती| करी लाभेंविण प्रीती॥’ म्हणजे कोणत्याही लाभ स्वार्थाशिवाय काम करायचे, असे सूत्र असणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संबंधित संघटना, व्यक्ती हे हिंदू समाजकल्याणासाठी वर्षानुवर्षे काम करत आहेत. पण, त्यापलीकडे जाऊन वैयक्तिकरित्या बहुसंख्य समाजांत काय दृश्य दिसते, तर रोटी, कपडा और मकान बस! त्यापुढे काय? बहुसंख्य महिला आणि पुरुषांनाही धार्मिकतेचे, सामाजिकतेचे शिक्षण शून्य आहे. हे चित्र भयंकर आहे. हो, या भयंकर चित्राला उद्दातीकरणाचे स्वरूप यावे, म्हणून मग अनेकदा निधर्मीपणा, पुरोगामित्व आणि खोट्या माणुसकीचा मुखवटाही लावला जातो. ‘लव्ह जिहाद’ किंवा ‘जादूटोणा जिहाद’ यामध्ये हेच तर आढळते.
या अनुषंगाने मुस्लीम समाजाचे काय चालले आहे, हे बघणे गरजेचे. इस्लामचे, कुराणचे शिक्षण घेतलेल्या मुस्लीम महिला गटागटाने मुस्लीम कुटुंबांना दुपारच्या वेळी भेट देतात. (त्याला ‘इजतिमा’ म्हणतात) गृहिणींना आणि त्यांच्या मुलींना या महिला इस्लाम शिकवतात. त्यांच्या रितीरिवाज, परंपरा शिकवतात. ते सगळे पाळणे का गरजेचे आहे, हे कुराणचा, अल्लाचा हवाला देऊन शिकवतात. बुरखा आणि ‘शरिया’ कसे महत्त्वाचे, हे त्यात ओघाने आलेच! त्यांचे पुरुष अगदी लहान मुलंही पाच वेळचा नमाज आणि शुक्रवारची मोठी नमाज अदा करत एकमेकांना त्यांच्या धर्मासाठी भेटतात. दुसरीकडे ख्रिश्चनांचीपण अशीच व्यवस्था. आपणही धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक किंवा अगदी मानसिकरित्याही दुर्बल, शोषित, वंचित असलेल्या बंधु-भगिनींना साथ द्यायची वेळ आली आहे. नाहीतर, छांगूरबाबा किंवा खानबाबासारखे गुन्हेेगार मुली-महिलांचे शोषण करायला गल्लोगल्ली आहेतच! या पार्श्वभूमीवर वाटते की, आपल्या हिंदूंचे काय सुरू आहे?
९५९४९६९६३८