कालिदासांच्या लेखणीतून भारतीय संस्कृतीचे सौंदर्य उलगडते!  प्राध्यक मेधा सोमण यांचे प्रतिपादन

    19-Jul-2025   
Total Views |

ठाणे, "महाकवी कालिदास यांच्या लिखाणामध्ये अलौकिक प्रतिभा डोकावते. कालिदासांच्या लेखणीतून भारतीय संस्कृतीचे सौंदर्य उलगडते" असे प्रतिपादन प्राध्यापक मेधा सोमण यांनी केले. महाराष्ट्र साहित्य परिषद ठाणे जिल्हा शाखा आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

दि. १९ जुलै रोजी, ठाण्याच्या मराठी ग्रंथ संग्रहालयच्या वा. अ. रेगे सभागृह येथे महाराष्ट्र साहित्य परिषद ठाणे जिल्हा शाखेच्या ४६ व्या वर्धापनदिनानिम्मित ' महाकवी कालिदासाच्या साहित्यातील निसर्ग ' या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ प्राध्यापिका, लेखिका मेधा सोमण यांनी यावेळी महाकवी कालिदास यांच्या कलाकृती मधील निसर्ग वेध घडून सांगितला. त्याचबरोबर महाकवी कालिदास यांच्या लिखाणातील सौंदर्यस्थळांचे दर्शन सुद्धा त्यांनी रसिकांना घडवले. महाकवी कालिदासांच्या ७ कलाकृतींच्या माध्यमातून मेधा सोमण यांनी हा विचार मांडला.महाकवी कालिदासांच्या साहित्य विषयी बोलताना त्या म्हणाल्या की महाकवी कालिदास यांनी तत्कालिन परिस्थिती मध्ये वेद, उपनिषदे, या वाड्मयाचा अभ्यास केला होता असे आपल्याला त्यांच्या साहित्यातून दिसून येते. भारतीय संस्कृती, परंपरा यांचा त्यांना अभिमान होता. या संस्कृती प्रती असलेली त्यांची निष्ठा आणि प्रेम त्यांच्या साहित्यातून डोकावते.

आपल्या लेखणीच्या माध्यमातून कालिदासांनी केलेलं सूक्ष्म अवलोकन वाचकाला अचंबित करणारा आहे. महाकवी कालिदासांच्या लिखाणातील स्त्रियांवर भाष्य करताना मेधा सोमण म्हणाल्या की " कालिदासांनी रेखाटलेल्या स्त्रिया वात्सल्य आणि मायेने बहरलेल्या आहेत. त्यांच्यात मातृत्वाचा अंकुर आपल्याला बघायला मिळतो. त्याचबरोबर निसर्ग संवर्धनाचा विचार सुद्धा आपल्याला बघायला मिळतो." त्याचबरोबर त्या म्हणाल्या की महाकवी कालिदासांवर अध्ययन करण्यासाठी साहित्य विषयक काम करणाऱ्या संस्थांनी एकत्र यावे आणि आपला हा समृद्ध विचार वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा.



मुकुल आव्हाड

मुंबईच्या डी.जी. रुपारेल महाविद्यालयातून इतिहास आणि राज्यशास्त्र विषयात पदवी प्राप्त.
राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. आकाशवाणीच्या युवा वाणी साठी विविध विषयांवर कार्यक्रम सादर केले.वाचनाची आवड. कथाकथन, काव्य वाचन,कथा लेखन यात विशेष रुची तसेच पुरस्कार प्राप्त. महाविद्यालयात असताना, नाटकात काम केले त्याच सोबत नाट्यलेखनाचा अनुभव.