नागपूर : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतील प्रलंबित निधीला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. नागपूर जिल्ह्यातील ३२ अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना याद्वारे आर्थिक मदत मिळणार आहे. महसूलमंत्री आणि नागपूर तथा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निधी मिळणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.
राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजनेतंर्गत शालेय विद्यार्थ्यांचा अपघात किंवा अपघाती मृत्यु झाल्यास राज्य सरकारकडून आर्थिक मदत दिली जाते. नागपूर जिल्ह्यातील 32 अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना या योजनेअंतर्गत मंदत मिळावी यासाठी नागपूर जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी (योजना) यांनी शिक्षण संचालक पुणे यांच्याकडे ४३ लक्ष रुपये निधीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. येथून हा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाचे सचिवांकडे पाठविण्यात आल्यानंतर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पाठपुरावा केला होता. या संदर्भात शालेय शिक्षण विभागाने राज्यासाठी ४ कोटी ८१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे नागपूर सह राज्यातील अपघातग्रस्त विद्यार्थ्यांना शासनाकडून आर्थिक निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विषेश म्हणजे हा निधी अपघातग्रस्त विद्यार्थ्यांच्या थेट बँक खात्यात जमा होणार असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आभार मानले आहे.