मुंबई : लोखंडवाला बॅक रोड परिसरात कांदळवन नष्ट करून बेकायदेशीर भराव टाकल्याप्रकरणी पर्यावरण आणि वातावरणीय बदलमंत्री पंकजा मुंडे यांनी गंभीर दखल घेतली. शनिवारी घटनास्थळाला भेट देऊन त्यांनी परिस्थितीची पाहणी केली आणि दोषींवर गुन्हे दाखल करून कांदळवनाचे मूळ स्वरूप पुनर्स्थापित करण्याचे आदेश दिले.
आमदार अनिल परब यांच्या लक्षवेधी सूचनेनंतर विधानभवनात दिलेले आश्वासन पूर्ण करत, अधिवेशन संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मुंडे यांनी पहाडी गोरेगाव येथे पाहणी केली. या वेळी आमदार परब, पर्यावरण विभागाच्या सचिव जयश्री भोज, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (एमपीसीबी) सदस्य सचिव अविनाश ढाकणे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पाहणीत बफर झोनमध्ये परवानगीविना मोठ्या प्रमाणात भराव टाकल्याचे उघड झाले. ही जागा पूर्वी नॉन-डेव्हलपमेंट झोनमध्ये होती, ती डेव्हलपमेंट झोन कशी झाली, असा सवाल उपस्थित करत मुंडे यांनी यासंदर्भात सविस्तर तपासण्याचे निर्देश दिले. तसेच, बेकायदेशीर भराव टाकणाऱ्या कंत्राटदारांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आणि भराव हटवून कांदळवन पुनर्स्थापित करण्याचे आदेश दिले.
कांदळवन नष्ट करून अतिक्रमणाच्या तक्रारी लक्षात घेता, अशा सर्व प्रकरणांचे संकलन करून त्वरित कारवाई करण्याच्या सूचना मुंडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. “पर्यावरणाचे रक्षण ही प्राथमिकता आहे. असे प्रकार थांबवण्यासाठी यंत्रणेने जलद आणि कठोर पावले उचलावीत,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.