बारामतीत मॅनेजरने बँकेतच गळफास लावून संपवलं आयुष्य! मागे सोडलेल्या चिठ्ठीने खळबळ

    19-Jul-2025   
Total Views |

पुणे : (Baramati News) पुणे जिल्ह्यातील बारामती येथे गुरुवारी १७ जुलैच्या रात्री उशिरा एका बँक मॅनेजरने बँकेच्या शाखेतच गळफास लावून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवशंकर मित्रा असे या बँक मॅनेजरचे नाव आहे. मित्रा हे मूळचे उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत. बँकेच्या अतिरिक्त दबावामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे घटनास्थळी सापडलेल्या एका चिठ्ठीमध्ये मित्रा यांनी म्हटले आहे.

बारामतीमधील भिगवण रोडवरील एका राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत ते व्यवस्थापक म्हणून काम करत होते. आरोग्याच्या समस्या आणि कामाचा प्रचंड ताण या दोन्ही कारणांमुळे ११ जुलै रोजी मुख्य व्यवस्थापक पदाचा राजीनामा देऊन शिवशंकर मित्रा यांनी स्वेच्छानिवृत्ती मागितली होती. घटनेच्या वेळी ते नोटिस कालावधी पूर्ण करत होते.

मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत काय म्हटलंय?

मृत्यूपूर्वी लिहलेल्या चिठ्ठीत शिवशंकर मित्रा यांनी लिहिले आहे की, "मी शिवशंकर मित्रा, आज बँकेच्या अतिरिक्त दबावामुळे आत्महत्या करत आहे, माझे बँकेला आवाहन आहे की, कर्मचाऱ्यांवर इतका दबाव टाकू नये. सर्वांना आपल्या जबाबादाऱ्यांची जाणीव आहे, प्रत्येक जण आपले १०० टक्के देण्याचा प्रयत्न करत आहे. मी पूर्णपणे जाणीवपूर्वक माझ्या स्वेच्छेने आत्महत्या करत आहे. माझ्या कुटुंबाची यात कोणतीही जबाबदारी नाही. बँकेच्या प्रचंड दबावामुळे मी हे करत आहे. बायको प्रिया, मला माफ कर, माही माझी मुलगी, मला माफ कर. शक्य असल्यास, कृपया माझे दोन्ही डोळे दान करा", असे शिवशंकर मित्रा यांनी आपल्या चिठ्ठीत म्हटले आहे.

नेमकं काय घडलं?

बारामती पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी बँकिंगचे तास संपल्यानंतर, मित्रा यांनी ते शाखा बंद करतील, असे सांगून सर्व कर्मचाऱ्यांना घरी जाण्यास सांगितले. रात्री ९:३० च्या सुमारास वॅाचमनही निघून गेला. काही वेळापूर्वीच, मित्रा यांनी एका सहकाऱ्याला दोरी आणण्यास सांगितले होते. रात्री १० वाजताच्या सुमारास मित्रा यांनी बँकेच्या आवारात दोरीने गळफास घेऊन जीवन संपवले.

जेव्हा मित्रा घरी परतले नाहीत आणि त्यांनी फोन कॉलला उत्तर दिले नाही, तेव्हा त्यांची काळजीत असलेली पत्नी मध्यरात्री शाखेत आली. तिला दिसले की, लाईट अजूनही चालू आहेत पण आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. घाबरून तिने इतर बँकेच्या कर्मचाऱ्यांना कळवले. शाखा उघडताच, मित्रा आत छताला लटकलेल्या अवस्थेत आढळले. घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली आहे ज्यामध्ये मित्रा यांनी कामाच्या ताणामुळे हे टोकाचे पाऊल उचलल्याचे कारण सांगितले आहे.

ही घटना बँकेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे माहिती आहे. बारामती पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि सध्या तपास सुरू आहे. घटनेच्या आधीच्या क्षणांचे तपशील गोळा करण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत.




अनिशा डुंबरे

मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\