मध्य रेल्वेमध्ये अंमली पदार्थ तस्करीचा गुन्हा उघड नायजेरियन महिलेला घेतले ताब्यात

Total Views |
   

मुंबई, मध्य रेल्वेचे रेल्वे संरक्षण बल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो बंगळुरू व गुन्हे गुप्तचर शाखा कुर्ला, मुंबई यांच्या संयुक्त कारवाईत अंदाजे ३६ कोटी किमतीचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. यामुळे रेल्वे मार्गाने अंमली पदार्थ तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश करण्यात यश आले आहे.

शुक्रवार,दि.१८ जुलै रोजी मध्य रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दल (आरपीएफ), पनवेल, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) बंगळुरू आणि गुन्हे गुप्तचर शाखा (सीआयबी) कुर्ला, मुंबई यांनी संयुक्तपणे कारवाई करत एका परदेशी नागरिकाला ट्रेन क्रमांक १२६१८ हजरत निजामुद्दीन - एर्नाकुलम मंगला एक्सप्रेसमध्ये अंमली पदार्थांसह अटक करण्यात आली. अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो बंगळुरू यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे एक संयुक्त पथक तयार करण्यात आले.

पनवेल रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक ७ वर ट्रेन येताच पथकाने तातडीने शोध मोहीम हाती घेतली. शोध दरम्यान, कोच ए-२ मधील सीट क्रमांक २७ वर एका अर्भकासोबत आणि बहुरंगी ट्रॅव्हल बॅग घेऊन जाणारी एक नायजेरियन महिला आढळली. साक्षीदारांच्या उपस्थितीत चौकशी केल्यानंतर, महिलेने अंमली पदार्थ बाळगल्याची कबुली दिली. तिला आरपीएफ पोस्ट पनवेल येथे आणण्यात आले. तिच्या सामानाची कसून तपासणी करण्यात आली. बहुरंगी ट्रॅव्हल बॅगमध्ये अधिकाऱ्यांना एकूण २.००२ किलो कोकेन मिळाले. पुढील तपासणीत मुख्य कॅरी बॅगमध्ये १.४८८ किलो वजनाचे मेथॅम्फेटामाइन म्हणून ओळखले जाणारे पांढरे स्फटिकासारखे पदार्थ आढळले. जप्त केलेले अंमली पदार्थ, ज्यांचे एकत्रित बाजार मूल्य अंदाजे ३६ कोटी रुपये इतके आहे. एनसीबी बंगळुरू यांनी या महिलेला ताब्यात घेतले. तपास अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.