नवी दिल्ली : (Donald Trump On India-Pakistan Conflict) भारत-पाकिस्तान यांच्यातील संघर्ष निवळून जवळपास दोन महिने झाले असले तरी त्याबाबतच्या चर्चा मात्र अद्याप सुरूच आहेत. यामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे वारंवार या संघर्षावर भाष्य करताना दिसून येतात. आता पुन्हा एकदा ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान संघर्षाबाबत नवा दावा केला आहे. शुक्रवारी १८ जुलेला रात्री व्हाइट हाऊसमध्ये रिपब्लिकन खासदारांसोबत डिनरच्यावेळी ट्रम्प यांनी मे महिन्यात भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान चार ते पाच लढाऊ विमानं पाडण्यात आली होती, असे म्हटले आहे.
विमानं पाडली...पण कोणाची?
डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, "अमेरिकेने अनेक युद्धे थांबवली आहेत आणि ही सगळी युद्धे खूप गंभीर होती. भारत आणि पाकिस्तान दरम्यानही असेच युद्ध सुरू होते. तिथे विमाने पाडली जात होती. मला वाटते की, प्रत्यक्षात पाच लढाऊ विमाने पाडण्यात आली होती. हे दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत आणि एकमेकांवर हल्ले करत होते." व्हाईट हाऊसमध्ये ते बोलत होते.
परंतु, कोणत्या देशाची किती लढाऊ विमाने पाडली गेली, हे ट्रम्प यांनी स्पष्ट केलेले नाही.
यापूर्वी पाकिस्ताननेही भारताची पाच लढाऊ विमानं पाडल्याचा दावा केला होता. परंतु, भारताचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी पाकिस्तानसोबत झालेल्या लष्करी संघर्षा दरम्यान भारताची लढाऊ विमानं पाडल्याच्या प्रश्नांना ३१ मे रोजी उत्तरे दिली होती. त्यांनी पाकिस्तानचा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं सांगून तो फेटाळला होता.
मुंबईतील पाटकर-वर्दे महाविद्यालयातून अर्थशास्त्र विषयातत पदवी. सध्या दै. मुंबई तरुण भारत मध्ये वेब उपसंपादक पदावर कार्यरत. लिखाण, वाचन आणि निवेदनाची विशेष आवड. मराठी साहित्य, इतिहास, राजकारण, आणि मनोरंजन विषयांत रस. महाविद्यालयीन काळात वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन स्पर्धांमध्ये सहभाग आणि पारितोषिके.\