मतांवर डोळा ठेवून काँग्रेसची ‘विरासत’ मोहीम - उत्तर भारतीयांना साद घालणार; पालिका निवडणुकीच्या तोंडावर आली जाग

    19-Jul-2025   
Total Views |

मुंबई,  उत्तर भारतीय मतदारांचे मुंबईच्या राजकारणातील वाढते वजन लक्षात घेता काँग्रेसने ‘मुंबई विरासत मिलन’ नावाच्या विशेष अभियानाची घोषणा केली आहे. गेल्या काही वर्षांत काँग्रेसपासून दुरावलेल्या या समाजाला पुन्हा जवळ करण्याचा प्रयत्न या अभियानातून होणार आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या तोंडावर उचललेले हे पाऊल केवळ मतांवर डोळा ठेवून आहे का, असा प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

२०१४ नंतरच्या प्रत्येक निवडणुकीत उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात भाजपकडे वळल्याचे काँग्रेसला उशिरा का होईना, लक्षात आले. त्यामुळेच बहुधा ‘मुंबई विरासत मिलन’सारख्या अभियानाचे नियोजन करण्यात आले असावे. २०१७ च्या मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसला केवळ ३१ जागांवर समाधान मानावे लागले होते. यंदा त्याहूनही वाईट कामगिरीची भीती असल्याने ही मोहीम हाती घेतली गेली आहे. मात्र, राजकीय विश्लेषकांच्या मते, काँग्रेसची ही निवडणूकपूर्व धावपळ सध्याच्या राजकारणात पुरेशी ठरणार नाही.

मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी शनिवारी ‘मुंबई विरासत मिलन’ अभियानाची घोषणा करताना काँग्रेस आणि उत्तर भारतीय समाज यांच्यातील ऐतिहासिक नात्याचा दाखला दिला. “मुंबईत स्थलांतरित उत्तर भारतीयांना काँग्रेसने नेहमीच आधार दिला आहे. आजही आम्ही त्यांच्यासोबत खंबीरपणे उभे आहोत,” असे त्या म्हणाल्या. मात्र, प्रत्यक्षात गेल्या काही वर्षांत काँग्रेसने या समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. स्थानिक नेतृत्व निष्क्रिय राहिले, पक्षात गटबाजी वाढली आणि नेत्यांनी स्वतःच्या हिताला प्राधान्य देत समाजाच्या विकासाकडे पाठ फिरवली. परिणामी, उत्तर भारतीय मतदारांनी काँग्रेसपासून फारकत घेत भाजपला पाठिंबा दिला.

वर्षा गायकवाड यांनी चूक केली मान्य


- या अभियानांतर्गत उत्तर भारतीय सेलद्वारे मुंबईतील विविध भागांत कार्यक्रम राबवले जाणार असून, उत्तर भारतीय समाजाच्या ठिकाणांचे सांस्कृतिक महत्त्व, काँग्रेसचे योगदान आणि ऐतिहासिक नाते यांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाईल, असे सांगण्यात आले.

- खा. गायकवाड यांनी सांगितले की, काँग्रेसने नगरसेवक, आमदार, खासदार आणि मंत्रीपदाच्या माध्यमातून उत्तर भारतीयांना सन्मानित केले. पण त्यांनीच हेही मान्य केले की, काही नेत्यांनी या संधींचा उपयोग केवळ स्वतःच्या फायद्यासाठी केला आणि समाज विकासाच्या दृष्टीने काहीच झाले नाही.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.