आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांविरोधात हक्कभंग - विधानसभा अध्यक्षांकडून प्रस्ताव विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द

    18-Jul-2025   
Total Views |

मुंबई, विधानभवनात गुरुवारी झालेल्या हाणामारीच्या गंभीर घटनेनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी कठोर निर्णय घेतला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर विधान भवन परिसरात आलेले नितीन देशमुख आणि गोपीचंद पडळकर यांच्यासमवेत आलेल्या सर्जेराव टकले यांची चौकशी करून, त्यांच्यावर विशेषाधिकार भंगाची (हक्कभंग) कारवाई केली जाणार आहे. त्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण विधानसभा विशेषाधिकार समितीकडे सुपूर्द केले आहे. तसेच या दोघांवर फौजदारी कारवाई करण्यात येत असल्याची माहिती नार्वेकर यांनी शुक्रवारी दिली.

नार्वेकर म्हणाले, “जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर या विधानसभा सदस्यांनी देशमुख व टकले या दोन अभ्यागतांना विधान भवनात आणले. त्यांच्या आक्षेपार्ह कृतीमुळे विधिमंडळाची प्रतिमा व प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे या दोन्ही विधानसभा सदस्यांनी सभागृहात याप्रकरणी खेद व्यक्त करावा. तसेच भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, याची हमी द्यावी. सभागृहाची प्रतिमा बाधित होईल असे वर्तन सभागृहात व सभागृहाच्या बाहेरही घडणार नाही अशी अपेक्षा मी सर्व सदस्यांकडून बाळगतो”, असे आवाहन त्यांनी केले.

मंत्री, आमदार, शासकीय कर्मचारी वगळता कोणालाही प्रवेश नाही!

आमदारांच्या सुरक्षेसाठी यापुढे अधिवेशन काळात आमदार, त्यांचे स्वीय सहायक आणि शासकीय कर्मचाऱ्यांनाच प्रवेश मिळेल, असे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले. गुरुवारी विधिमंडळात मुख्य प्रवेशद्वाराजवळ दोन सदस्यांच्या (आव्हाड आणि पडळकर) अभ्यागतांदरम्यान झालेल्या मारहाणीच्या घटनेची चौकशी विधिमंडळाच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात झाली असून, त्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालानुसार विधिमंडळ ही कारवाई करीत आहे. सर्व सदस्यांनी विधान मंडळाच्या उच्च परंपरेचे पालन करणे, ही आपली घटनात्मक जबाबदारी असल्याचे राहुल नार्वेकर यावेळी म्हणाले.

मुख्यमंत्र्यांचा संताप

गुरुवारी विधानसभेत झालेल्या राड्याप्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी आमदार गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांना सभागृहात खेद व्यक्त करण्यास सांगितले. मात्र, आव्हाड यांनी यावेळी त्यांना आलेल्या धमकीचा उल्लेख केला. त्यावर सत्ताधारी आमदारांनी आव्हाडांना रोखले आणि मूळ विषयावर बोलण्यास सांगितले. त्यानंतर विरोधी बाकांवरील आमदार म्हणाले, आव्हाडांना बोलू द्या, त्यांचे बोलणे थांबवू नका. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, काल इथे जे काही झाले, त्यामुळे केवळ एका माणसाची प्रतिष्ठा गेली नाही. संपूर्ण सभागृहाच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले आहे. हे काही बरे नाही. आज बाहेर एकट्या पडळकरला किंवा आव्हाडांना शिव्या पडत नाहीत. आपल्या सर्वांनाच शिव्या पडत आहे. लोक म्हणतायत की सगळे आमदार माजलेत", अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.