विधान भवनात प्रवेशासाठी पैसे घेऊन पास? - विरोधकांचा आरोप; पुरावे देण्याची मंत्री शंभूराज देसाईंची सूचना

    18-Jul-2025   
Total Views |

मुंबई, आमदार जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमधील राड्यानंतर विधान भवनातील प्रवेश पासच्या मुद्यावरून विधानपरिषदेत जोरदार खडाजंगी झाली. उबाठा गटाचे आमदार अनिल परब यांनी विधान भवनात प्रवेशासाठी पैसे घेऊन पास दिले जातात, असा आरोप केला. त्यावर आक्षेप घेत मंत्री शंभूराज देसाई यांनी पुरावे सादर करण्यास सांगितले.

अनिल परब म्हणाले, “पास कसे विकले जातात, कुणाकडून पैसे घेतले जातात, पहिल्या आणि दुसऱ्या गेटवर किती पैसे द्यावे लागतात, हे आम्हाला माहीत आहे. आम्ही नावांसह सांगू शकतो. सत्ताधारी आम्हाला उचकवू नयेत, आम्हाला जास्त बोलायचे नाही.” त्यावर मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “पास वाटपाची संपूर्ण प्रक्रिया सभापतींच्या अखत्यारीत येते. सरकारचा यात सहभाग नाही. परब यांनी पासचे दर सांगितले, याचा अर्थ त्यांचा रोख सभापतींकडे आहे. त्यांनी पुरावे द्यावेत. भडक वक्तव्य करून यंत्रणेवर आक्षेप घेणे चुकीचे आहे. सभापतींच्या आदेशानुसार तपासाला आमची तयारी आहे.”

त्यावर शरद पवार गटाचे आ. शशिकांत शिंदे म्हणाले, “सभापतींनी गेटपास बंद करण्याचे आदेश दिले होते, तरीही पास कुणी दिले? विधान भवनात एवढी गर्दी कशी जमली? कोणता मंत्री कार्यकर्त्यांना आत घेण्याचे निर्देश देतो? एका मंत्र्याने पास नाकारला, तरीही एक व्यक्ती थेट त्यांच्यासमोर हजर झाला. त्या व्यक्तीने ‘कसा आलो ते विचारू नका’ असे सांगितले. ही यंत्रणेतील त्रुटी आहे.”



सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.