मुंबई, ऑनलाइन गेमिंगमुळे युवक आर्थिक संकटात सापडत असून, गुन्हेगारी वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी चित्रपट क्षेत्रातील सेलिब्रिटींनी अशा गेमच्या जाहिराती करू नयेत, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत केले. यासोबतच केंद्र सरकारने स्वतंत्र कायदा करावा यासाठी पाठपुरावा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.
आ. कैलास घाडगे पाटील यांनी विधानसभेत मांडलेल्या लक्षवेधी सूचनेत सांगितले की, धाराशीवसह राज्यातील ग्रामीण भागात ऑनलाइन गेमिंगचे प्रमाण वाढले आहे. यामुळे युवक कर्जबाजारी होत असून, काही ठिकाणी आत्महत्या आणि फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. तेलंगणाच्या धर्तीवर राज्याने कायदा करावा, अशी मागणी त्यांनी केली.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, गेल्या चार-पाच वर्षांत ऑनलाइन गेमिंग प्रचंड वाढले आहे. हे खेळ इंटरनेटवर खेळले जात असून, त्यांचे नियंत्रण राज्याबाहेर किंवा परदेशातून होते. सध्या केंद्राच्या माहिती व तंत्रज्ञान कायद्यांतर्गत नियम-2021 लागू आहेत, पण ते पुरेसे नाहीत. स्वतंत्र कायदा करण्यासाठी केंद्राकडे पत्र पाठवून पाठपुरावा सुरू आहे. सेलिब्रिटींनी अशा गेमच्या जाहिराती टाळाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले.
ज्येष्ठ आ. सुधीर मुनगंटीवार यांनी तेलंगणा, आंध्र आणि ओडिशाने याबाबत कायदे केल्याची माहिती देत, केवळ केंद्रावर अवलंबून न राहण्याची सूचना केली. यावर फडणवीस म्हणाले, सर्व कायदेशीर पर्याय तपासून ऑनलाइन गेमिंग बंद होण्यासाठी पावले उचलली जातील, असे स्पष्ट केले.